
जगातील आघाडीचे समाजमाध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकची पालक कंपनी असलेली मेटा पुन्हा एकदा गोपनीयतेच्या मुद्द्यावर चर्चेत आली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच व्हॉट्सॲपवर उपलब्ध असलेले मेटा एआय हे टूल चॅटजीपीटीप्रमाणे काम करते; परंतु अनेक जण त्याचा वापर प्रामुख्याने फोटो एडिटिंग किंवा एआय फोटो जनरेशनसाठी करतात. सामान्यतः वापरकर्त्याकडून दिलेल्या सूचनांनुसार, मेटा एआय काम करते. मिळालेल्या सूचनांवर प्रक्रिया करून संबंधित उत्तर त्याकडून दिले जाते. मेटा एआयला त्यासंदर्भात प्रशिक्षित करण्यासाठी हजारो फोटो, व्हिडिओ तसेच मजकूरवजा माहितीची आवश्यकता भासत असते. वास्तववादी निकालासाठी मेटाला पूरक माहितीही वास्तविकच लागते. त्यासाठी मेटाकडून वापरकर्त्यांच्या डेटाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.