मेटाव्हर्समध्ये तुमचे स्वागत आहे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेटाव्हर्समध्ये तुमचे स्वागत आहे!}
मेटाव्हर्समध्ये तुमचे स्वागत आहे!

मेटाव्हर्समध्ये तुमचे स्वागत आहे!

रवी मुंबईतील आपल्या अत्याधुनिक कार्यालयात दैनंदिन काम करत बसलाय. सायंकाळचे सहा वाजले आहेत. तासाभरात घरी पोहचण्याचा त्याचा विचार आहे. तेवढ्यात न्यूयॉर्कमध्ये वित्तीय सेवा पुरविणाऱ्या मोठ्या कंपनीचा तांत्रिक प्रमुख असलेल्या जॉनचा संदेश रवीच्या हातातील घड्याळात चमकतो. मोठी तांत्रिक अडचण आली असल्याने तातडीने प्रत्यक्षात भेटले पाहिजे असा आशय त्या संदेशाचा असतो. जॉन त्यावेळी ऑफिसच्या कामासाठी पॅरिसमध्ये असतो. त्यांच्या न्यूयॉर्क कार्यालयातील मुख्य सर्व्हरला जोडलेल्या यंत्रणेत बिघाड झालेला असतो. अमेरिकेतील कार्यालये सुरू होण्यापूर्वी ती अडचण दूर करण्याची गरज असते. अन्यथा कोट्यवधी डॉलरचा फटका जॉनच्या कंपनीला बसण्याची शक्यता असते. त्याचबरोबर शहरातील वित्तीय सेवा ठप्प पडतील हे वेगळेच.

हेही वाचा: आनंददायी मुलं वाढवा, सुदृढ समाज घडवा

जॉनचा संदेश पाहून काहीतरी मोठा घोळ झालाय हे रवीच्या लक्षात येते. आपण १५ मिनिटांत भेटू असा संदेश तो जॉनला पाठवितो. लगेचच तो आपल्या संगणकावर जॉनच्या कंपनीशी संबंधित फाइल उघडतो. विविध यंत्रांचे आराखडे, यंत्रांची तांत्रिक माहिती, त्याच बरोबर त्यांच्यासाठी तयार केलेल्या विशेष प्रोग्रॅमची माहिती उघडून तयार ठेवतो. बरोबर १५ व्या मिनिटाला तो आपल्या संगणकावरूनच जॉनशी संपर्क साधतो. जॉनही आपल्या हातातील मोबाईलवरूनच रवीच्या पुढ्यात येतो. आवश्यक ते आराखडे त्याच्या मोबाईलमध्ये त्याने तेवढ्यात मागवून घेतलेले असतात. दोघेही मग न्यूयॉर्कमधील कार्यालयातील मुख्य सर्व्हर रूममध्ये एकत्रच अवतीर्ण होतात. न्यूयॉर्क कार्यालयातील वरिष्ठ सहकारी रीड त्यावेळी तेथे प्रत्यक्षात उपस्थित असतो. रवी आणि जॉन तेथे व्हर्चुअली उपस्थित होतात. पुढच्या साधारण तासाभरात चर्चा करून समस्येतून तोडगा काढला जातो. एक सहकारी भारतात, दुसरा फ्रान्समध्ये आणि तिसरा अमेरिकेत तिघेही एकमेकांसमोर असल्याप्रमाणे व्हर्चुअली भेटतात, चर्चा करतात, तोडगा काढतात….

`मेटाव्हर्स`च्या दुनियेत आपले स्वागत आहे!

आपण एकमेकांपासून हजारो मैल दूर असलो, तरी एकाच टेबलावर बसून एकमेकांशी बोलतोय असा अनुभव घेऊ शकू, त्रिमितीय तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा अत्याधुनिक अवतार असलेल्या मेटाव्हर्सच्या साह्याने हे शक्य होईल. त्यामुळे मनातील विचारांच्या वेगाने जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपल्याला मेटाव्हर्सच्या साह्याने पोहोचता येऊ शकेल. सध्या अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट येत्या दहा वर्षांत प्रत्यक्षात येऊ शकणार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील मोठी कंपनी असलेल्या `फेसबुक`ने यासाठी पुढाकार घेतला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात यासाठी पाच कोटी डॉलरची गुंतवणूक यासाठी फेसबुक करणार आहे. तसेच संपूर्ण युरोपातून किमान दहा हजार जणांची भरती या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे.

दरी मिटणार

प्रत्यक्षातील जग आणि आभासी जग यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न मेटाव्हर्स करणार आहे. हे असे एक तंत्रज्ञान असेल, ज्याद्वारे माणूस डिजिटल जगात व्हर्चुअली प्रवेश करू शकेल. रचनात्मक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मेटाव्हर्समुळे नवे आयाम जोडले जाऊ शकतील. व्हर्चुअल रिॲलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानाचीही जोड त्यासाठी घेतली जाणार आहे.

प्रत्यक्षातील जग आणि आभासी जग यांच्यातील दरी कमी करण्याच्या दृष्टीने काही प्रयोग झाले आहेत. पॉपस्टार आर्यना गांद्रे आणि रॅपर ट्रॅव्हिस स्कॉट यांनी फोर्टनाईट या व्हिडिओ गेमच्या माध्यमातून आपला कार्यक्रम सादर केला. लोकांनी तो आपल्या घरी बसून बघितला. आणखी एक प्रयोग डीसेंट्रालँड नावाच्या कंपनीने व्हर्चुअल कॅसिनो विकसित केला आहे. त्या व्हर्चुअल कॅसिनोमध्ये लोकांना नोकऱ्याही त्यांनी दिल्या आहेत.

संकल्पनेचा पहिला वापर

मेटाव्हर्स या शब्दाचा पहिल्यांदा वापर विज्ञानकथा लेखक नील स्टीफन्सन यांनी १९९२मध्ये आपल्या `स्नो क्रॅश` या कादंबरीत केला होता. मात्र, त्यापूर्वी स्टार ट्रेक मालिकेत अथवा नंतर आलेल्या मॅट्रिक्स या चित्रपटात आभासी आणि प्रत्यक्षातील जग एकत्र आल्याचे चित्र रंगविले होते. तसेच व्हीआर गॉगलचा किंवा ऑगमेंटेड रिॲलिटीचा (एआर) वापर करून अनेक व्हिडिओ गेमही उपलब्ध आहेत. सेकंड लाइफ या गेममध्येही दोन्ही जगतांचा मेळ होता. सेकंड लाइफमध्ये आपल्याला एक `अवतार ` (कॅरेक्टर) घ्यावा लागतो. तो अवतार मानवीय नाहीये. म्हणजे आपण खेळातील ती व्यक्ती नियंत्रित करत असतो, पण तेथे आपण असल्याचा भास उत्पन्न होत नाही. वस्त्रोद्योगातील अनेक कंपन्यांनी आता व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. म्हणजे एखादा कपडा आपल्या अंगावर कसा दिसेल, हे आपल्याला त्यांच्या वेबसाइटवरच तपासता येईल. मग ते कपडे खरेदी करायचे की नाही हे ठरवता येईल. फोर्टनाइट आणि रेडिप्लेअर वन हे दोन्ही गेम खेळण्यासाठी आपल्याला आभासी जगाचा हिस्सा बनावे लागते. काही खेळांमध्ये आपले आभासी जग आपल्याला निर्माणही करता येते.

पुढची पायरी

मेटाव्हर्स म्हणजे या सगळ्याच्या पुढची पायरी आहे. त्यात आपण प्रत्यक्ष घटनास्थळी असल्याचा अनुभव आभासी पद्धतीने घेता येईल. म्हणजे लुव्र सारखे संग्रहालय आपण व्हीआर हेडसेटच्या साह्याने तेथे उपस्थित असल्याप्रमाणे पाहू शकू. मेटाव्हर्समध्ये नॉन फंजीबल टोकन (एनएफटी) आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करून व्यवहारही करता येऊ शकतील. मेटाव्हर्स वापरण्यासाठी संगणकाचा वापर अत्यावश्यक नसेल. व्हीआर ग्लास सारख्या उपकरणाचा वापर करून आभासी जगात आपल्याला वावरता येऊ शकेल. आणखीही नवी उपकरणे त्यासाठी उपलब्ध असतील.

हेही वाचा: आनंददायी मुलं वाढवा, सुदृढ समाज घडवा

जाणीवांची जाणीव

आपल्याला आजूबाजूच्या सर्व जगाची जाणीव ही पंचेद्रियांच्या माध्यमातून होते. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ यांच्या माध्यमातून आपण सगळे अनुभव घेत असतो. आभासी जगात वापरताना याचा अनुभव आपल्याला घेता येत नाही. म्हणजे एखाद्या उत्तराचा सुगंध आपल्याला इंटरनेटवरून घेता येत नाही. तसेच स्पर्श किंवा चवही अनुभवता येत नाही. आपल्या पंचेंद्रियांचा अनुभव आपल्याला घेता येईल का? यादृष्टीने संशोधन सुरू झाले आहे. मेटाव्हर्स प्रत्यक्षात येण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत कदाचित यातील एखाद्या गोष्टीचा अनुभव आपल्याला मेटाव्हर्समधून घेता येऊ शकेल. थोडक्यात चौथी किंवा पाचवी मिती त्यात विकसित केली जाऊ शकते.

सर्व व्यवहार व्हर्चुअल

मेटाव्हर्स हे पूर्ण जग असेल. त्यात प्रत्येकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असेल, त्यावर एकमेकांना भेटता येईल, संवाद साधता येईल, व्यवहार करता येतील, खरेदी-विक्री करता येऊ शकेल, खेळ खेळता येतील, ऑफिसची कामेही त्याद्वारे करता येतील, वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घेता येईल, पुस्तके वाचता येतील अशा अनेक गोष्टी करता येऊ शकतील. प्रत्यक्ष जगात आपल्याला ज्या गोष्टी करता येत नाहीत अशा गोष्टीही त्यात करता येतील. उदाहरण द्यायचे झाले, तर एखाद्या शरीरसौष्ठवपटूसारखी आपली शरीरयष्टी असावी, असे आपल्याला वाटत असेल, तर तसा `अवतार` आपल्याला मेटाव्हर्समध्ये घेता येऊ शकेल. एखाद्या उंच शिखरावर भ्रमंती करायची इच्छा असेल, मात्र ते प्रत्यक्षात आपल्याला शक्य होत नाही, मेटाव्हर्समध्ये ते शक्य होऊ शकते. ज्या गोष्टींची आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा गोष्टी कदाचित शक्य होऊ शकतील.

नेमका उपयोग कशासाठी?

वैद्यकीय क्षेत्रापासून शिक्षण क्षेत्रापर्यंत, क्रीडा क्षेत्रापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रात याचा वापर होऊ शकेल. प्रशिक्षणासाठी मेटाव्हर्सचा सर्वाधिक वापर होऊ शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. ज्या क्षेत्रात ग्राहकांना प्रत्यक्ष अनुभव द्यायचा असेल, अशा प्रत्येक क्षेत्रात मेटाव्हर्स वापरता येऊ शकेल. उत्पादन, आरोग्य, अवकाश संशोधन, औषधनिर्मिती अशा क्षेत्रांत याचा वापर होऊ शकेल. उदाहरण द्यायचे झाले तर ऑलिंपिकचे देता येईल. आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचे मूल्यमापन करण्याची सर्वांत चांगली सोय मेटाव्हर्सच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. किंवा अवकाश प्रवासाला जाणाऱ्या अवकाशवीरांना एखाद्या ग्रहावरील अनुभव आभासी जगाद्वारे देता येऊ शकेल. अशा अगणित क्षेत्रांची द्वारे मेटाव्हर्समुळे खुली होऊ शकतील.

काळजीही महत्त्वाची

मेटाव्हर्सचे संपूर्ण जग हे इंटरनेटवर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे इंटरनेट वापरताना घ्यावी लागणारी सर्व प्रकारची काळजी मेटाव्हर्स वापरतानाही घ्यावी लागणार आहे. यात ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहारांचा संबंध येईल, त्या त्या वेळी संबंधित देशांनी त्याला मान्यता देणे कदाचित गरजेचे असेल. जस जसा याचा विकास होत जाईल, तस तशा जगभरातील अनेक मोठ्या कंपन्याही यात प्रकल्पात सहभागी होतील. एनव्हिडिया कॉर्पोरेशन, मायक्रोसॉफ्ट, रोब्लॉक्स कॉर्पोरेशन, फेसबुक, युनिटी सॉफ्टवेअर, स्नॅप इन्कॉर्पोरेशन, ऑटोडेस्क, अमेझॉन, टेन्सेंट, सी या मोठ्या कंपन्यांनी मेटाव्हर्ससाठीचे संशोधन सुरू केले आहे.

बराच पल्ला गाठायचाय

मेटाव्हर्सची संकल्पना सध्या प्राथमिक स्तरावर आहे. परंतु, पुढील दहा वर्षांत प्रचंड मोठी झेप या क्षेत्रात घेतली जाण्याची आशा आहे. माणसाच्या शरीरावर आणि मनावर होणाऱ्या चांगल्या-वाईट परिणामांचा अभ्यासही करावा लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षातील भौतिक जगाला व्हर्चुअल जग हे पूर्णपणे पर्याय कधीच ठरू शकणार नाही. असे असले तरी नव्या आभासी जगाची दारे मेटाव्हर्सद्वारे उघडली जातील. त्याचे डोळे उघडे ठेवून स्वागताची तयारी आपणही केली पाहिजे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top