
‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटात अँथॉलॉजीसारख्या अनेक कथा आहेत. त्या भावनिक आणि नाट्यमय आहेत. त्याच वेळेला तो एक म्युझिकल सिनेमाही आहे. प्रेमकहाणी दाखवताना त्यातही खूप वेगवेगळे प्रयोग करतो. त्यावर अनुराग बासूची स्वतःची अशी वेगळी छाप आहे आणि ती त्याच्या जादूने युक्त आहे.
‘मेट्रो इन दिनों’ नक्की काय आहे? हा एक फार गमतीशीर प्रश्न आहे. शहरी जीवनासोबतच प्रसिद्ध झालेल्या हायपरलिंक सिनेमा (एकाच कथेत प्रत्येक पात्राच्या वेगवेगळ्या कथा गुंफलेल्या असणं) किंवा अँथॉलॉजीसारख्या त्यात अनेक कथा आहेत. त्या भावनिक (इमोशनल) आणि नाट्यमय (ड्रामा) कथा आहेत. त्याच वेळेला तो एक म्युझिकल सिनेमाही आहे. तोही केवळ तद्दन फक्त हॉलीवूड किंवा फक्तच बॉलीवूडचे असतात तसा म्युझिकलही नाही. त्यात स्वतःचा मुलगा गेल्याचं कॉम्प्लेक्स दुःखही गाण्यात सांगितलं जातं, कधी नाच-गाण्यात प्रेमकथा येते. कधी संगीतकार, गायक मागे येऊन सादर करतात; तर कधी ते फक्त पार्श्वसंगीत आहे. ‘मेट्रो इन दिनों’ एकाच सिनेमात एवढं सगळं एकत्रित करू इच्छितो. हे भयंकर महत्त्वाकांक्षी आहे. (महत्त्वाकांक्षी हे फक्त पैशांच्या अर्थाने नसतं) आणि हे सगळं अनुराग बासू या दिग्दर्शकाची स्वतःची छाप सोडणारं सादरीकरण आहे.