
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी व ‘नेशन फर्स्ट’ हा विचार रूजविण्याच्या उद्देशाने इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नुकतीच केली. शासनाची सैनिकी शिक्षणाची ही कल्पना देशाच्या संरक्षण भविष्यासाठी पथदर्शक आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा ‘श्रीगणेशा’ निर्माण करणारीही आहे.
सैनिकी प्रशिक्षण हा शब्द केवळ लष्कर, युद्ध एवढ्यांपुरताच मर्यादित नाही, तर व्यापक दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाकडे पाहण्याची गरज आहे. इयत्ता पहिलीपासून ही सुरुवात करत असताना या वयोगटात प्रामुख्याने बोजड अशा अवघड अध्ययन पद्धतीचा समावेश न करता, त्या अभ्यासक्रमात सैन्यदलांचा इतिहास, तोंडओळख, पूर्वीच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराज, महाराणाप्रताप, बाजीराव पेशव्यांच्या काळातील युद्ध, पारंपरिक युद्ध आणि युद्धनीती, सैनिकी विभाग, कामकाज पद्धती, अधिकारी वर्गाची पदे आणि श्रेणी (रँक), शस्त्रास्त्रांची माहिती, ते हाताळण्याच्या पद्धती यांसारख्या छोट्या-छोट्या बाबींना प्राधान्य द्यावे. त्यातूनच विषयांतील नावीन्यता स्पष्ट होऊन विद्यार्थ्यांमध्ये त्याची गोडी निर्माण होण्यास मदत होईल.