
‘‘जन्माला येताना खेळाडू या विचारांची देणगी घेऊन येत नाही. खेळून खेळून हा विचार मनात बाणवावा लागतो. निकाल काय लागेल यापासून दूर राहून सुनियोजित प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित करायला शिकावे लागते. ते सोपे नाहीये. त्याला वेळ द्यावा लागतो...’’ हे सांगतो आहे, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतल्या पाचव्या कसोटीत हीरो ठरलेला मोहम्मद सिराज...
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतला तो प्रसंग मला मनाला खूप भावला होता. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील चौथा कसोटी सामना रंगला होता. इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत होते. फलंदाजीला पोषक खेळपट्टी गोलंदाजांची सत्त्वपरीक्षा बघत होती. इंग्लंडच्या तुलनेत हवाही कमालीची गरम होती. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज जीव तोडून मारा करत होते. सिराजच्या माऱ्यात धार होती, तसेच त्याची देहबोलीही आक्रमक होती. बऱ्याच वेळा त्याने टाकलेल्या चांगल्या चेंडूवर फलंदाज चकत होते; पण बहुतेक क्रिकेट देव सिराजचा संयम तपासत होता. काही केल्या चेंडू बॅटची कड घेत नव्हता. परिणामी, सिराजला फलंदाज बाद करायचे यश मिळत नव्हते.