
बालपणी आलेलं पोरकेपण, घरी असलेलं दारिद्र्य, लहान वयात पडणारे कष्ट आणि समाजात मिळणारी वागणूक... असं असूनही एकाही प्रसंगात किंवा अभंगात मुक्ताई कोमेजलेली दिसत नाही, एकाकी वाटत नाही. उलटप्रसंगी विजेसारखी तळपते. मोजकेच प्रसंग आणि मोजकेच अभंग; पण खरंच आजही अक्षरशः प्रेरणास्रोत होते मुक्ताई.
कवयित्री बहिणाबाई चौधरींचे शब्द मुक्ताबाईंचं वयानं असलेलं बालपण आणि त्याच वेळी ज्ञानाच्या अधिकारानं आलेलं थोरपण नेमकेपणानं व्यक्त करतात.
माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साचं लेकरू
चांगदेव योगीयानं
तिले मानला रे गुरू
संत मुक्ताबाई म्हणजे खरंतर परकरी पोर, चिमुरडीच आणि अभंगांनी तर अर्धशतकही गाठलं असेल-नसेल; पण अधिकार काय वर्णावा! मोठेपण हे कधी वय किंवा साहित्यपसारा किती यावर कधी नसतंच! त्यांचं चरित्र आठवलं, तरी आपोआप हात जोडले जातात.
आता मुक्ताबाई म्हणताच खरंतर चार भावंडं एकत्रच डोळ्यासमोर येतात, इतकी त्यांची चरित्र गुंफलेली आहेत. मातापित्यांचं छत्र हरपलेली ही चार मुलं बहुतेक प्रसंगात एकत्रच दिसतात. या चौघांच्या नावातूनही किती अर्थपूर्ण बोध होऊ शकतो, याबद्दल साधारण असं काहीसं वाचनात आलं होतं, ‘मनाने निवृत्त झाल्यावरच ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञानाच्याच सोपानावरून मुक्तीपर्यंत पोहोचता येतं.’ अर्थात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई! विविध प्रकारे, शब्दांची वेगवेगळी रचना करून ही नावं गुंफली जातात; पण आशय साधारण हाच, मनाला स्पर्शून जाणारा! या चौघांत मुक्ताई शेंडेफळ, एकुलती एक बहीण, त्यात तिची ओजस्वी वाणी... ती चांगलीच उठून दिसते.