

Mumbai rail protest
esakal
रेल्वेच्या आंदोलनामुळे गोंधळलेल्या दोन मुंबईकरांचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबांची जबाबदारी आता कोण घेणार? कदाचित सरकार मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना काही मदत करेलही; पण तेवढ्याने ते कुटुंब सावरणार नाही. मुळात ठरवून अशा प्रकारच्या आंदोलनांचे आयोजन करणाऱ्यांच्या नावावर हे बळी नोंदवायला हवेत. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या जीवाचा सौदा करणाऱ्या या भस्मासुरांना कठोर शासन व्हायला पाहिजे. प्रसंगी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायला हवेत.
गेल्या काही वर्षांत आंदोलनांच्या पद्धती बदलताना आपण पाहिल्या आहेत. हल्ली सुपारीबाज आंदोलनांचे पेव आले आहे. लोक सुपाऱ्या वाजवण्यासाठीदेखील आंदोलने करतात.
माणसांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक असण्यात काही गैर नाही. प्रत्येकाला आपल्या हक्कांची जाणीव असायला हवी आणि कुणी आपल्या स्वातंत्र्यावर किंवा हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करीत असेल तर वेळीच त्याला प्रत्युत्तरदेखील द्यायला हवे; मात्र त्यासाठीच्या लढ्यात इतर कुणाला त्रास होणार नाही, हे पाहणेदेखील आपलेच कर्तव्य असते. जर आपल्या हक्कांच्या लढ्यात सर्वसामान्य माणसांचे हाल होणार असतील; प्रसंगी ते त्याच्या जीवावर बेतणार असेल तर मात्र अशा लढ्यांना काही अर्थ उरत नाही. ते लढे पोकळ, निष्फळ ठरतात. अशा संघर्षाला तिरस्काराची बाधा झाली तर त्यातून पुढे येणारे परिणाम भीषण असू शकतात, याची आंदोलनजीवींनी जाणीव ठेवायला हवी.