
१५२७ मध्ये जेव्हा पोर्तुगालने मुंबईवर ताबा मिळवला, त्या वेळी त्यांनी मुंबईचा उल्लेख ‘जिथे चांगले जीवन जगता येते असे बेट’ म्हणून केला होता. आज आपण असं म्हणू शकतो का? आपण मुंबईचं काय करून ठेवलंय?
जीवाची मुंबई करणं हा वाक््प्रचार एकेकाळी खूप वापरला जायचा. हळूहळू मुंबईचं कौतुक कमी झालं. अतिक्रमण आणि ट्रॅफिक हीच मुंबई झाली. पण मुंबई एकेकाळी एवढी भरभराटीला कशी आली? देशाची आर्थिक राजधानी कशी झाली? अशाच मे महिन्यातली गोष्ट...
मे १६६२ साल होतं. पोर्तुगीज राजकन्या आणि इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यांचं लग्न झालं या दिवशी आणि हुंड्यात काय दिलं? मुंबई. हो. तोपर्यंत मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. त्यांना मुंबईचं महत्त्व नीट कळलेलं नव्हतं. तसेही पोर्तुगीज लोक धर्मांध जास्त. चर्च उभारणं वगैरे पलीकडे त्यांची दृष्टी गेली नाही. तर मुंबई हुंड्यात दिली खरी; पण ताबा मात्र दिला नाही. म्हणजे मुंबईत जे पोर्तुगीज अधिकारी होते त्यांना मुंबई सोडायची नव्हती. आता महापालिकेत जसा सगळ्या पक्षांचा जीव गुंतलेला असतो तसं. म्हणजे इंग्रज मुंबईचा ताबा घेण्यासाठी वर्षभर झटत होते. किनाऱ्यावर चकरा मारत होते आणि पोर्तुगीज अधिकारी टाळाटाळ करत होते.