

Voyager 1 Mission and Gravity Assist
esakal
डाॅ. विनिता नवलकर - sakal.avtaran@gmail.com
नासाचे ‘व्हॉयेजर-१’ बुधवारी पृथ्वीपासून एक प्रकाश-दिवस अंतरावर पोहोचले! इतके अंतर गाठणारी ही पहिलीच मानवनिर्मित वस्तू आहे. अवकाशातील अंतरे इतकी प्रचंड आहेत की किलोमीटर हे एकक तिथे अपुरे पडते. म्हणून शास्त्रज्ञ प्रकाशाच्या वेगाचा आधार घेतात. प्रकाशाचा वेग सुमारे २,९९,७९२ किमी प्रतिसेकंद एवढा आहे. म्हणजे २४ तासांत प्रकाशलहरी सुमारे २५.९ अब्ज किमी एवढे अंतर पार करतात. या अंतराला शास्त्रज्ञ ‘एक प्रकाश-दिवस’ म्हणतात. पृथ्वी ते सूर्य या अंतराच्या (खगोलीय एकक) तुलनेत ‘एक प्रकाश-दिवस’ हे अंतर १७३ पट जास्त आहे. १९७७ मध्ये प्रक्षेपित झालेले ‘व्हॉयेजर-१’ सध्या ताशी ६१ हजार किमी (सेकंदाला सुमारे १७ किमी) वेगाने आंतरतारकीय (Interstellar) अवकाशातून प्रवास करत आहे. तरीही एक प्रकाश-दिवस हे अंतर गाठण्यासाठी त्याला ४९ वर्षे लागली!
सूर्यप्रकाश पृथ्वीवर सुमारे ८ मिनिटे २० सेकंदांत पोहोचतो. चंद्रावरून येणारा प्रकाश सव्वा सेकंदात येतो. मात्र, अजूनही कार्यरत असलेल्या ‘व्हॉयेजर-१’ने पाठवलेला प्रत्येक रेडिओ प्रकाशलहरींचा संदेश आता पृथ्वीवर पोहोचायला पूर्ण २४ तास घेईल. म्हणजेच, पृथ्वीवरून पाठवलेल्या संदेशाचे उत्तर मिळायला आता किमान ४८ तास वाट पहावी लागेल. तरीही हे अंतर ताऱ्यांच्या तुलनेत अगदीच लहान आहे. सूर्यापासून सर्वांत जवळचा तारा प्रॉक्सिमा सेंटॉरी सुमारे ४.२ प्रकाशवर्षे दूर आहे. म्हणजे ‘व्हॉयेजर-१’ला प्रॉक्सिमा सेंटॉरीपर्यंत पोहोचायला तब्बल सुमारे ७४ हजार वर्षे लागतील. मात्र, हे यान प्रॉक्सिमा सेंटॉरीच्या दिशेने जात नसून भुजंगधारी (ऑफियुकस) तारकासमूहाच्या दिशेने प्रवास करीत आहे.
‘व्हॉयेजर’ मोहिमेची संकल्पना एका दुर्मिळ खगोलीय योगामुळे मांडण्यात आली. १९६०-१९७० च्या दशकात गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बाह्य ग्रह एका विशिष्ट मांडणीत येणार होते. या काळात यानाला एका ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून पुढच्या ग्रहाकडे पाठवणे सोपे होते. या तंत्राला गुरुत्वीय सहाय्य (Gravity Assist) म्हणतात. असे केल्यास कमीत कमी इंधन वापरून यान जास्त अंतर कापू शकते.