

National Pension System
esakal
निवृत्तीनंतर सुखाची झोप लागण्यासाठी आपल्याकडील पैशाची निर्धोक गुंतवणूक करणे, सर्वांत महत्त्वाचे असते. यामध्ये सरकारी नॅशनल पेन्शन सिस्टीम अर्थात राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) हा पर्याय निवडता येऊ शकतो. अलीकडच्या काळात ‘एनपीएस’विषयी अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत; ते दूर करून या पेन्शन योजनेमध्ये आपण गुंतवणूक करण्याची आज गरज आहे.
पल्या अनेक स्वप्नांच्या पूर्तीसाठी योग्य ती आर्थिक तरतूद करणे गरजेचे असते. बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक समीकरणाचा विचार करता, निवृत्तीनंतरच्या सोनेरी वर्षांमध्ये कोणावरही अवलंबून न राहाता आनंदात जगणे हेसुद्धा आपले महत्त्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे. नवनव्या वैद्यकीय सुविधांमुळे सरासरी आयुर्मान वाढत आहे. आपल्याला त्याचा मनमुराद आनंद लुटता आला पाहिजे. खरेतर आपली निवृत्तीची तारीख ही एकमेव अशी तारीख असते, जी आपल्या नोकरीच्या सुरुवातीलाच निश्चित झालेली असते. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी आपल्या हाती भरपूर वेळ असतो; पण दुर्दैवाने याकडे दुर्लक्ष केले जाते. कमावत असताना लवकर सुरुवात केली, तर अत्यंत थोडक्या रकमेच्या नियमित बचतीत आपण हे उद्दिष्ट सहजपणे गाठू शकतो. अर्थात, निवृत्तीच्या वेळी किती रक्कम यासाठी आपल्या गाठी असली पाहिजे ते आर्थिक नियोजनकारांच्या सल्ल्याने ठरवून एक पाऊल उचलण्याची गरज असते. निवृत्तिनियोजनासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी आपल्या जोखीमक्षमतेचा विचार करून कोणते साधन योग्य त्याचा विचार करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने एक महत्त्वाचा पर्याय असलेल्या ‘एनपीएस’ची माहिती आपण घेणार आहोत; तसेच या योजनेमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या सुधारणा, या योजनेविषयीचे गैरसमज आणि सत्यता यांचाही आढावा घेणार आहोत. योग्य माहिती घेतल्यास या योजनेचा योग्य वापर आपल्या निवृत्ती-नियोजनासाठी करता येईल.