
डॉ. प्रणिता अशोक
शरीराला योग्य पोषणमूल्ये मिळण्यासाठी, प्रतिकारशक्ती चांगली राखण्यासाठी प्रोटीन (प्रथिने), कर्बोदके, जीवनसत्त्वे यांचे योग्य प्रमाण राखणे आवश्यक आहे. यासाठी संतुलित आहार असायला हवा. या संतुलित साखळीत प्रोटीनचे स्वतःचे असे महत्त्व आहे. पण, केवळ प्रोटीन म्हणजे संतुलित आहार नाही. निरोगी शरीरासाठी प्रोटीनसोबत इतर अन्नघटकही तेवढेच महत्त्वाचे आहेत.
यामासोबत प्रोटीन सप्लिमेंट्स घेणे कसे आवश्यक असते हे काही जिममधून अलीकडच्या काळात प्रकर्षाने सांगितले जाते. पावडरने भरलेले डबे तुमच्यासमोर ठेवले जातात. त्या दबावाखाली आणि लगेच पिळदार शरीर होईल, या आशेने आपण ते घेतोही. पण हे करण्याआधी जरा आपल्याला त्याची खरेच गरज आहे का, हे तपासून घ्यायला हवे.