

Bihar Assembly Election Results 2025
esakal
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी संयुक्त जनता दल-भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मोठे यश प्राप्त करत विरोधी महाआघाडीला धोबीपछाड दिला आहे. या आघाडीच्या विजयाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. २०२ विरूद्ध ३५ हा आकडाच कोण प्रबळ व कोण दुर्बल हे सांगून जातोच. मात्र प्रत्येक मतदारसंघातील विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतांतील अंतरही ही स्पर्धा कशी एकतर्फी झाली हे सुचित करतो. सत्ताधाऱ्यांना अधिक जबाबदारीने तर विरोधकांना गांभिर्याने काम करण्याचा कौल मतदारांनी दिला आहे.
कुठल्याही निवडणुकीच्या राजकारणात असे फार क्वचित घडते, पण बिहारमध्ये मात्र ते घडले आहे. वीस वर्षे सत्ता उपभोगल्यानंतरही पुन्हा एकदा संयुक्त जनता दलाचे नेते व मुख्यमंत्री नितीशकुमार नव्या दमाने ते सत्तेवर येणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या विजयी करिष्म्याबद्दल देशातील राजकीय वर्तुळात आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे. हे असे कसे घडले, याबाबत विरोधी पक्षाला विश्वासच बसेनासा झाला आहे. आणि केवळ विरोधकांना नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्या एका गटालाही या विजयाबद्दल आश्चर्य वाटत आहे. पण असो, असे काहीही असले तरी बिहारच्या अठराव्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला आहे, तो आता एक वास्तव बनला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधीनंतरही बिहार निवडणुकीच्या सुरस कथा अनेक दिवस ऐकवल्या जातील.