

Netoji Palkar Adilshahi Campaign
esakal
अफजलवधानंतर ११ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर या ४७ दिवसांत शिवसैन्याने वाई ते कोल्हापूर व कोकणात चौल ते साटवली अशा सुमारे १५,००० चौ.कि.मी. प्रदेशावर आक्रमण केले होते. कोल्हापूर युद्धाच्या (२८ डिसेंबर) विजयानंतर शिवरायांनी पुनश्च एकदा आपल्या सैन्याला आदिलशाही मुलुखावर धाडले.
नेतोजींचा झंझावात ः जानेवारी १६६०च्या सुमारास नेतोजी आपल्या स्वारांसह पन्हाळ्याहून प्रथम उत्तरेच्या दिशेला निघाले. अंबप, किणी व घुणकी ही ठाणी लुटून त्यांनी वारणा नदी ओलांडली. कृष्णेकाठच्या कुंडल, घोगाव, येडे (मच्छिंद्र) येथून खंडणी मिळविल्या व आपला मोर्चा पूर्वेकडे वळविला. येरळा नदीकाठचे कमळापूर व पारे या ठिकाणांवरून महसूल जमा केला. पुन्हा आग्नेयेस जाऊन अग्रनी नदीकाठच्या बोरगाव व कवठे गावांवर धाडी टाकल्या. येथून दक्षिण-नैऋत्येस गेलेल्या सैन्यतुकडीने कृष्णेकाठच्या संपन्न अशा आदिलशाही मुलूखातून यथेच्छ लूट मिळविली. त्यांनी माळगाव, सांगली, मिरज, आरग, म्हैसाळ, कनवाड, कुरुंदवाड व खिद्रापूरपर्यंत धडक दिली. येथपर्यंत नेतोजींच्या तुकडीस फारसा प्रतिकार न झाल्याने राजांनी त्यांना विजापूरापावेतो धडक देण्याचा आदेश दिला.
नेतोजींच्या रौद्ररुपी झंझावाताने आता आपली नजर पूर्वेकडे वळविली आणि ते विजापुराच्या रोखाने निघाले. अथणी, तेलसंग, होनवाड भागातून महसूल मिळवून १६ जानेवारीच्या सुमारास हे सैन्य विजापुराच्या २० कि.मी. अलीकडील तिकोटा या ठाण्यावर येऊन धडकले. राजधानीच्याजवळ शिवसैन्य पोहोचल्याने विजापुरात प्रचंड घबराट पसरली. त्यामुळे अली आदिलशाह दिवसेंदिवस खिन्न होऊन संकटसागरात बुडाला. आदिलशाही सैन्य तब्बल ८०० कि.मी. दूर असल्याने, राजांनी नेतोजींना आणखी दक्षिणेत घुसून शत्रूचा मुलूख उद्ध्वस्त करण्याचा निरोप दिला. त्यावरून तिकोट्याहून नेतोजींच्या तुकडीने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळविला. केरुर, हनुमानहळ्ळी, गदग, लक्ष्मेश्वरापर्यंत धडक दिली. येथून माघारी फिरून हुबळी, धारवाड, दोदवाड, सत्तीगेरी, गोकाक, हुक्केरी इत्यादी प्रांतातून खंडण्या गोळा केल्या व सर्व सैन्य रायबागला येऊन पोहोचले.