
ऋचा नामजोशी
अंधाराची अनेकविध रूपं मला वेळासमधल्या माझ्या वास्तव्यात बघायला मिळाली. आपल्या मनातल्या भीतीला, कल्पनांना बाजूला ठेवून त्या अंधाराला शरण गेल्यावर त्याचे अनेक मनोहारी आविष्कार अनुभवायला मिळाले. मात्र अंधारवाटांतल्या त्या सोबत्यांमुळेच वेळाससारखं गाव उजळून जातं.
सूर्यास्तानंतर दिशा काजळू लागल्या. दिवसा प्रत्येक बारीकशी गोष्टही ठळकपणे दाखवणारा भवताल त्या काळोखात जणू विरघळू लागला. काळ्या आकाशात उठून दिसणाऱ्या उंचच उंच वाढलेल्या माडांच्या झावळ्या, बाकीची झाडं, घरांची छपरं, दूरवर पसरलेल्या डोंगररांगा, वाटा... सगळं सगळं काळोखाची झूल पांघरून झोपी गेलं होतं. भवतालाला आता दोनच मिती होत्या, एक काळी आणि दुसरी गडद काळी.