
वाहतूककोंडी संपूर्ण देशासाठी एक ज्वलंत प्रश्न आहे. अगदी लडाखपासून लखनौपर्यंत आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंत वाहतूक कोंडी शहराचा वेग मंद करते. त्यातच रस्त्यावरचं किंवा अवैध पार्किंग ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळेच प्रत्येक राज्यातील प्रशासन, परिवहन मंडळं वाहतूक कोंडीवर काहीतरी उपाययोजना शोधत असतात.
मुंबईसारख्या महानगरात वाहतूक कोंडी ही फक्त त्या रस्त्यावरच्या वाहनांची कोंडी नसते. ती अर्थव्यवस्थेची, प्रशासनाचीही कोंडी होते.
सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन आणि मोटार वाहन विभागाने एक क्रांतीकारी धोरण आखलं आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितलं की, नवीन वाहन नोंदणीपूर्वी वाहनतळ म्हणजेच पार्किंगची सुविधा आहे ना याची चाचपणी करण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर ते नसल्यास वाहन नोंदणी करता येणार नाही. हा नियम दुचाकी आणि चारचाकी सर्व वाहनांना लागू होणार आहे. अजून हे धोरण अमलात आलेलं नाही तर प्रस्तावित आहे.