

Rehabilitation Of Nomadic Tribes
esakal
‘राजकारणात अनेक आंदोलने केली, अनेक प्रश्नांसाठी लढलो, हजारो लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला; पण एखाद्या कुटुंबाच्या डोक्यावर कायमस्वरूपी छप्पर उभे राहते आणि त्या घराच्या अस्तित्वाचा स्पर्श त्यांच्या हातात जातो, तेव्हा मिळणारे समाधान वेगळेच असते. कारण घर म्हणजे फक्त विटा, रेती आणि सिमेंटचा ढिगारा नसतो. घर म्हणजे माणसाच्या आयुष्याला मिळालेली ओळख असते, सुरक्षितता असते, स्वाभिमान असतो आणि मुला-बाळांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी असते.’
भटक्या-विमुक्त समाजासाठी काम करीत असताना आम्हाला सर्वाधिक अस्वस्थ करणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे या समाजाच्या डोळ्यांमध्ये कायम दिसणारी असुरक्षितता. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आम्ही पालांमध्ये राहणारी कुटुंबे जवळून पाहिली होती. उन्हाळ्याच्या कडक उन्हात भाजणारे आयुष्य, पावसाळ्यात गळणारे पाल, हिवाळ्यात कुडकुडत काढलेल्या रात्री आणि उद्या कुठे मुक्काम असेल, याचीही खात्री नसलेले जीवन. हे दृश्य पाहिल्यावर मनात एकच प्रश्न निर्माण व्हायचा, स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, विकासाच्या मोठमोठ्या घोषणा झाल्या, मग या समाजाचा विकास कुठे हरवला?