
Education statistics India
esakal
ऑगस्ट २०२५ मध्ये सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या (एनएसएस) अहवाल क्रमांक ५९५ नुसार ‘सर्वसमावेशक मॉड्युलर सर्वेक्षण - शिक्षण’ (सीएमएस : ई)- २०२५’ प्रकाशित करण्यात आला. हा अहवाल राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या ८० व्या फेरीवर आधारित असून एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत घेण्यात आला. या विशेष आवृत्तीत केवळ शालेय शिक्षणाचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणापासून उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत ज्यात नावनोंदणीचे नमुने, कुटुंबाचा शैक्षणिक खर्च आणि खासगी शिकवणींचे प्रमाण या बाबींचा समावेश आहे. या सर्वेक्षणात देशभरातील ५२ हजार ८५ कुटुंबे आणि दोन लाख २१ हजार ६१७ व्यक्तींचा समावेश करण्यात आला आणि ५७ हजार ७४२ सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली.
या सर्वेक्षणासाठी स्तरनिहाय बहुपदस्थ नमुना रचना वापरण्यात आली होती. यामध्ये गाव व शहरी विभाग हे पहिले स्तर (प्राथमिक एकक) होते आणि निवडलेली कुटुंबे ही अंतिम एकक होती. याद्वारे यादृच्छिक पद्धतीने प्रत्येक एककातून १२ कुटुंबांची निवड करण्यात आली. ही रचना ग्रामीण आणि नागरी भागांतील तसेच विविध आर्थिक स्तरांतील प्रतिनिधित्व सुनिश्चित करत होती. यामुळे शैक्षणिक खर्चाचे शिक्षण शुल्क, गणवेश, स्टेशनरी, वाहतूक व खासगी शिकवणी असे घटकनिहाय संकलन करता आले. याशिवाय विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारच्या शाळांत नावनोंदणी केली आहे (शासकीय, अनुदानित, स्वयंअनुदानित, खासगी आणि अन्य) त्यांचेही वर्गीकरण करण्यात आले. या लेखात आपण अहवालातील शाळांतील नावनोंदणीविषयक भागाचे सखोल विश्लेषण पाहणार आहोत.