
Origin of life
esakal
सहाव्या शतकातील ग्रीक तत्वज्ञ ॲनाक्सिमँडर म्हणायचा, जगातील गोष्टी एकमेकांवर अन्याय करतात; पण कालांतराने त्या न्याय मिळवतात. उष्णतेने पाणी आटले तर पावसाळा पुन्हा पाणी देतो. हा एक प्रकारचा वैश्विक न्याय आहे तो अपरिऑन संतुलन राखतो. एकंदरीतच काय, तर निसर्ग न्यायप्रिय आणि संतुलन मानणारा आहे; पण मग त्याच संतुलनाचा माणसाला का विसर पडतो, हे मात्र एक कोडेच आहे.
पहिला सजीव कसा जन्माला आला, याविषयी आजवर अनेक तर्क व्यक्त करण्यात आले आहेत. काहींच्या तर्कांना शास्त्रीय आधार होता; तर काही तर्क केवळ अनुमानाच्या भरवशावर तोलण्याचा प्रयत्न झाला. बहुतेक वेळा जेव्हा विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्या उत्तराची दिशा ही एखाद्या अनैसर्गिक, अनादी, अनंत अशा शक्तींकडे अंगुलीनिर्देश करणारी असते. जेव्हा माणसाला आपल्या उत्क्रांतीच्या प्रश्नांची हवी तशी उत्तरे मिळत नव्हती; तेव्हा तो दैवाचा आधार घ्यायचा. कुणीतरी या सृष्टीचा रचेता आहे वगैरे कल्पना मांडल्या जायच्या. त्याला कारणही तसेच होते. माणसाला नेमकेपणाने याविषयीची मांडणी करण्यासाठी वेळ जावा लागणार होता. त्यासाठी त्याच्या ज्ञानकक्षा रुंदावणे गरजेचे होते.