ऑन स्क्रीन - फक्त चकचकीत, स्टायलीश!

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीज आता अनेक प्रकारचे जॉनर एकत्र आणण्याच्या प्रयत्नात असून,
 वेब सिरीज
वेब सिरीजsakal

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीज आता अनेक प्रकारचे जॉनर एकत्र आणण्याच्या प्रयत्नात असून, त्यासाठी परदेशी सिरीजना भारतीय वातावरणात आणून सादर करण्याची परंपरा सुरू झालेली दिसते आहे. ‘डिस्ने हॉटस्टार’वरील ‘द नाईट मॅनेजर’ ही वेब सिरीजमध्ये हत्यारांची तस्करी करणाऱ्यांच्या टोळीची व तिला भेदू पाहणाऱ्या गुप्तहेराची गोष्ट सांगण्यात आली आहे. बडी स्टार कास्ट, चकचकीत लोकेशन्स, चटपटीत संवाद आणि ॲक्शनमुळं या वेब सिरीजचा पहिला सीझन पाहण्यासारखा झाला आहे. मात्र, कथेच्या पूर्वार्धात फारसं काही घडत नाही व दुसऱ्या सिझनची तयारी करतानाच लेखक-दिग्दर्शकांची दमछाक झालेली दिसते.

‘द नाईट मॅनेजर’ची सुरवात बांगलादेशमध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर होते. कथा ढाक्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन पोचते. अपहरण झालेल्या एका बालवधूला (अर्सिता मेहता) फ्रेडी रेहमान या बांगलादेशी तस्कराच्या ताब्यातून सोडविण्याची जबाबदारी शान दासगुप्ता (आदित्य रॉय कपूर) या अंडरकव्हर एजंटवर येते. अधिक खोलात गेल्यावर रेहमान हा शैलेंद्र रुंगठा (अनिल कपूर) या व्यवसायाच्या नावाखाली हत्यारांची तस्करी करणाऱ्या आणि विविध देशांना शस्त्रपुरवठा करून तिथं बंडाळी माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तस्कराची असल्याचं शानच्या लक्षात येतं. ‘रॉ’ची ऑफिसर लिपिका सैकियानं (तिलोत्तमा शोम) रुंगठाला जेरबंद करण्याची जबाबदारी स्वीकारते व त्यासाठी ते सर्व नियम धुडकावून त्याच्या मागावर असते. शानला रुंगठाच्या गॅंगपर्यंत पोचवण्याचे आणि त्याचा विश्‍वास संपादन करण्याची जबाबदारी सोपवली जाते. यामध्ये रुंगठाची पत्नी व त्याचा पार्टनर ब्रिजपाल (शाश्‍वत चटर्जी) यांचा अडथळा असतो. तिथपर्यंत पोचण्यासाठी शान एक नाट्य उभं करतो. काय असतं हे नाट्य, शानला रुंगठापर्यंत पोहोचता येतं का, शस्त्रास्त्रांच्या तस्करीची मुळं कोठपर्यंत पोचलेली असतात या प्रश्‍नांची उत्तरं सिरीजच्या पहिल्या सिझनच्या शेवटी मिळतात व दुसऱ्या भागाची तयारी केली जाते.

परदेशात गाजलेल्या वेब सिरीज भारतात आणताना त्याला योग्य पार्श्‍वभूमी देणं महत्त्वाचं असतं, इथं बांगलादेशातील रोहिंग्यांच्या प्रश्‍नानं सुरवात केली जाते. मात्र, तो संघर्ष लगेचच सोडून दिला जातो. (कदाचित दुसऱ्या भागात त्याचे अधिक संदर्भ मिळतील.) भारतीय हेराला एखाद्या आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीत घुसवून त्यांचा खातमा करण्याचा प्रयत्न करणं, हे कथाबीज अनेक सिनेमांमध्ये वापरण्यात आलं आहे. त्यामुळं या कथेत फारसं नावीन्य सापडत नाही. शानचं रुंगठाच्या टोळीत घुसण्यासाठीचे प्रसंग थरारक असले, तरी ते खूपच लांबले आहेत. शानबद्दल शंका येऊनही रुंगठा आणि ब्रिजपाल फारशी पावलं उचलत नाहीत, हे पटत नाही. सर्व ॲक्शन (कदाचित) दुसऱ्या भागासाठी राखून ठेवल्यानं पहिला सीझन अत्यंत संवादी आणि त्यामुळं रटाळ झाला आहे.

बड्या कलाकारांनी फौज हे सिरीजचं वैशिष्ट्य ठरतं. आदित्य रॉय कपूरच्या वाट्याला आलेली भूमिका मोठी आहे आणि धडाकेबाज एजंटच्या भूमिकेत तो शोभून दिसला आहे. अनिल कपूरनं दोन चेहऱ्यांनी फिरणारा तस्कर रुंगठा झोकात उभा केला आहे. तिलोत्तमा शोमनं लिपिकाच्या अनेक पैलू असलेल्या भूमिकेत रंग भरले आहेत. शाश्‍वत चटर्जीकडून मोठ्या अपेक्षा असताना त्याची भूमिका मात्र रसहीन झाली आहे. इतर कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. एकंदरीतच, या सिरीजचा पहिला भाग फक्त चकचकीत आणि स्टायलीश झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com