
तमिळनाडूत कांचीपुरम नावाचं एक सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक गाव आहे. ते हल्ली जास्तच सुप्रसिद्ध झालं आहे. कारण भारतातलं सर्वात भानगडबाज याने की सर्वाधिक विवाहबाह्य संबंध असलेलं गाव ठरलं ते! पण मुंबई या भानगडकऱ्यांच्या यादीत पहिल्या विसातही स्थान मिळवू शकलेली नाही. काय हे? लानत है!!
‘पिंजरा’ शिणुमात येक लई न्यारं गाणं आहे. ऐक्का :
हे गाव लई न्यारं हितं थंडगार वारं,
ह्याला गरम शिणगार सोसंना,
ह्याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हाई कोरा,
हितं शाहिरी लेखनी पोचंना,
हितं वरणभाताची गोडी रं, नको फुक्कट छेडाछेडी रं
अरे, सोंगाढोंगाचा बाजार हितला, साळसूद
घालतोय आळीमिळी
सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन भाईर नळी... गंगंगंगंगंगं!!
...हुश्श!! थोर गीतकार जगदीश खेबुडकरांनी हे गीत लिहिलं तेव्हा कुठल्या न्याऱ्या गावाबद्दल लिहिलं कुणास ठाऊक. पण त्यांनी वर्णिलेल्याप्रमाणे आपलं वर्तन झालंच पाहिजे, असा संकल्प सोडून तमिळनाडूतलं गाव बसावं? छे, हे काहीतरी भलतंच झालंय...
कांचीपुरम गावाची नवी गोष्ट ऐकल्यानंतर अनेकांनी रेल्वे टाइम टेबलं उघडली म्हणतात; पण तिकिटं इल्ले! सगळी वेटिंग लिस्टवर आहेत. कांचीपुरमला कुठल्या कुठल्या गाड्या जातात? तिथं राहण्याची सोय काय आहे? बरं जेवण कुठे मिळतं? अशा चौकशा इंटरनेटवर सुरू झाल्याचंही ऐकिवात आहे. खरं तर कांचीपुरमची ही नवी गोष्ट तुम्हाला सांगू नये. तशी ती सांगण्यासारखी नाही; पण केवळ तुम्हाला म्हणून कानात सांगतो.
...तर तमिळनाडूत कांचीपुरम नावाचं एक सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक गाव आहे. ते हल्ली जास्तच सुप्रसिद्ध झालं आहे. वास्तविक हे गाव तीन गोष्टींसाठी आधी प्रसिद्ध होतं. एक, कांजीवरम साडी. आता कांजीवरम साडी कोणाला माहीत नसते? हे रेश्मी वस्त्राभरण गेली दोन हजार वर्षं या गावात तयार होतंय. साडी हा विषय लौकर गुंडाळता येण्यासारखा नाही. सबब, त्याची घडीच मोडायला नको.