
इराण अण्वस्त्रप्रसारबंदी कराराचे उल्लंघन करत असून, त्याचा अणुकार्यक्रम पूर्णपणे शांततेच्या उद्देशाने असल्याचे सांगता येत नाही, असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने जाहीर केले. त्यानंतर इस्राईल व नंतर अमेरिकेने इराणचे युरेनियम समृद्धीकरण प्रकल्प नष्ट केले. इराणच्या अणुआकांक्षांवर आघात करणाऱ्या या घडामोडींचा हा अन्वयार्थ...
अमेरिकेच्या तकलादू मध्यस्थीनंतर अखेर २४ जून २०२५ला इस्राईल आणि इराणमध्ये भडकलेल्या युद्धाचा वणवा शांत झाला. दोन्ही देशांकडून युद्धविरामाच्या कराराला मान्यता दिल्या गेल्यानंतर १२ दिवसांचा संघर्ष थांबला. यामुळे संपूर्ण पश्चिम आशियाचा भाग युद्धात ओढला जाण्याचा धोका निर्माण झाला होता. अमेरिकेने इराणमधील फोर्दो, नतान्झ आणि इस्फहान येथील अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर इराणने कतारमधील अल-उदेद येथील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केला.
या हल्ल्यानंतर हा युद्धविराम झाला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. फोर्दो हा इराणचा महत्त्वाचा युरेनियम समृद्धीकरण प्रकल्प असून, तो तेहरानच्या नैऋत्येस भूमिगत आहे. नतान्झ हे आणखी एक प्रमुख युरेनियम समृद्धीकरण केंद्र असून, ते तेहरानच्या आग्नेय दिशेला आहे. इस्राईलने केलेल्या हल्ल्यांपूर्वी येथे युरेनियमचे ६० शुद्धीपर्यंत समृद्धीकरण करण्यात आले होते. युद्धाच्या आगीत इस्राईलने केवळ इराणच्या प्रमुख आण्विक स्थळांनाच लक्ष्य करून उडवले नाही, तर इराणच्या लष्करी नेतृत्वालाही ठार मारले. इस्राईलने ३१ पैकी २० प्रांतांवर हल्ला केला आणि इराणच्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांना, शास्त्रज्ञांना ठार मारले. इराणमधील देशांतर्गत तेल, वायू उत्पादन आणि वितरणाच्या सुविधांनाही लक्ष्य केले. काही तज्ज्ञांचे मत असे आहे की, इस्राईलचा हेतू सत्तापालट करण्याचा होता, परंतु आता या हल्ल्यातून होणारे अप्रत्यक्ष नुकसान म्हणून सत्तापालट होऊ शकतो.