

Space Data Centers
esakal
दुसऱ्या ग्रहावर जाणं हे आता फार नावीन्याचे राहिले नाही. उलट आता अंतराळात डेटा सेंटर उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही गरज का भासू लागली, काय आहे हा नेमका प्रकल्प? कुठले देश यात आघाडीवर असून, कुणाची तयारी कशी सुरू आहे? या स्पर्धेत भारताला किती संधी आहे आणि आपल्याला यात काय करता येईल, या सगळ्या प्रश्नांचा वेध...
दक्षिण कॅलिफोर्नियाचं संध्याकाळचं आकाश हे प्रशांत महासागरावरचे रोजचे सूर्यास्त आणि आकाशात दिसणाऱ्या ‘हॉट-एअर बलून्स’साठी आजवर ओळखलं जायचं. पण गेल्या काही वर्षांत व्हॅनडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून होणारी एलॉन मस्कच्या स्पेस-एक्स कंपनीची रॉकेट प्रक्षेपणंसुद्धा आता एक नेहमीची गोष्ट झाली आहे. सुरुवातीला काही वर्षांपूर्वी जेव्हा हे अग्निबाण आकाशात एक अद्भुत, पांढऱ्या धुराची नक्षी आणि प्रकाश सोडत जायचे, तेव्हा जवळपासची संपूर्ण शहरं थबकून पाहायची. सुरुवातीला ‘यूएफओ’सारख्या वाटणाऱ्या ह्या रॉकेट्सची आता लोकांना हळूहळू सवय झाली आहे. आजकाल लोक फक्त एक नजर वर टाकतात आणि ‘अनादर स्पेस-एक्स लाँच’ म्हणत खांदे उडवून परत कामाला लागतात. आता साधारण वाटणारे हे बदल मात्र एक मोठ्या परिवर्तनाच्या नांदीच्या वार्ता आहेत, हे नक्की. १९६९ मध्ये मानव चंद्रावर पोहोचल्यापासून सॅटेलाइट टीव्ही, कॉल, इंटरनेट, मायक्रो सॅटेलाइट अशा अनेक क्रांती होत राहिल्या. तरीही सामान्य माणसाला मात्र अंतराळ हा केवळ शास्त्रज्ञ आणि संशोधनाचा विषय वाटायचं. पण आता मात्र अंतराळ हे आपल्या दैनंदिन जीवनाचा, अर्थव्यवस्थेचा आणि आता चक्क आपल्या हातातल्या ‘डेटा’चाही अविभाज्य भाग बनणार आहे आणि आता मानवासाठी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, याचं कारण आहे लवकरच येणारे अंतराळातले डेटा सेंटर्स!