
Dussehra celebration in maharashtra
esakal
अनादी काळापासून मानवजातीचा प्रवास हा सातत्याने नव्या क्षितिजांचा शोध घेत आणि सीमोल्लंघनाच्या अखंड प्रेरणादायी कहाण्या सांगत आला आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष हा आपल्या अस्तित्वाच्या आणि ओळखीच्या सीमा ओलांडण्याचा अद्भुत प्रवास असतो. शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक किंबहुना तात्त्विक अशा कोणत्याही स्तरावर जेव्हा आपण या सीमा ओलांडतो, तेव्हा नावीन्याची अनुभूती मिळते, नवी जाण होते आणि नव्या दृष्टिकोनाची कवाडे खुली होतात. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे सीमोल्लंघन अधिक अर्थपूर्ण ठरते; कारण दसरा हा विजयाचा आणि नवनिर्मितीचा तेजस्वी उत्सव आहे. म्हणजे केवळ बाह्य संघर्ष नव्हे, तर अंतर्मुखी परिवर्तनाचादेखील संदेश हा सण देतो.