

Oversimplification Bias in Investing
esakal
अभिजित कोळपकर - abhijeetjk.ca@gmail.com
आपल्या मनाला सगळं सोपं वाटायला आवडतं; पण प्रत्येकच गोष्ट सोपी नसते... किंवा एका पायरीपेक्षा सोपी करता येत नाही. काही गोष्टी समजूनच घ्याव्या लागतात. आर्थिक विषय हे खूप सुलभ करता येत नाहीत आणि जेव्हा आपण त्यांना जबरदस्तीने सोपं करतो, तेव्हा मोठं आर्थिक नुकसान होतं. यालाच म्हणतात अति-सुलभीकरणाचा पूर्वग्रह! त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत...
समीरला ऑफिसमधल्या सहकाऱ्याने सांगितलं, ‘‘शेअरमध्ये पैसे गुंतवले, की खूप श्रीमंत होता येतं. बँकेत पैसे ठेवून तू कायम गरीबच रहाशील.’’ समीरने झटपट श्रीमंत होण्यासाठी शेअर बाजाराबाबतचे काही व्हिडीओ पाहिले, काही पोस्ट वाचल्या आणि निष्कर्ष काढला- ‘शेअरमधील गुंतवणूक म्हणजे खूप मोठा परतावा. बस्स! त्याला शेअर घेणं, विकणं, पैसे कमावणं सर्व काही सोपं वाटायला लागलं. सुरुवातीला बाजार चांगला होता. पोर्टफोलिओ हिरवा दिसत होता. समीरचा आत्मविश्वास वाढत गेला; पण काही महिन्यांनी बाजार घसरला. अडचणीत असल्यावर अजून अडचणी येतात, या न्यायाने त्याच काळात समीरच्या घरात वैद्यकीय खर्च आला. तोट्यात शेअर विकून पैसे काढावे लागले आणि मग समीरला वाटायला लागले, की शेअर बाजार म्हणजे जुगार आहे! इथे समस्या शेअर बाजारात नव्हती; समस्या समीरच्या विचार करण्याच्या पद्धतीत होती. शेअर बाजार आहे तसाच होता.
शेअर बाजार चांगला की वाईट, हा प्रश्नच चुकीचा आहे. योग्य प्रश्न असा आहे, की कोणासाठी? तुमचे वय काय? तुमचं उत्पन्न किती? किती कालावधीसाठी गुंतवणूक करणार आहात? कोणत्या उद्दिष्टासाठी? किती जोखीमक्षमतेसह? आपत्कालीन निधी वेगळा ठेवून का? समीरच्या अति-सुलभीकरणाने नेमके हेच प्रश्न दुर्लक्षित केले होते.
सध्या अति-सुलभीकरणाचा सर्वांत मोठा कारखाना म्हणजे सोशल मीडिया आहे. अवघ्या ३० सेकंदांच्या रीलमध्ये एखाद्या कंपनीचे बॅलन्सशीट, कर्जाची रचना, १० वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड, प्रवर्तकांची ओळख किंवा कंपनीचे खरे मूल्य समजावून सांगता येत नाही; पण आकर्षक पार्श्वसंगीत लावून ‘हा शेअर घ्या आणि करोडपती व्हा’ हे प्रभावीपणे नक्की सांगता येतं. परंतु, पैसा कमावणं आणि व्हिडीओ पाहून उत्साहित होणं या दोन संपूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. अति-सुलभीकरण करून कोणतेही आर्थिक निर्णय मनोरंजन करता करता घेणं म्हणजे तुमचा पैसा आणि भविष्य पणाला लावणं असतं.