

निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या आणि पर्यटकांनी फुललेल्या काश्मिरातील पहलगामला दहशतवादी हल्ल्यानं रक्तलांच्छित केलं. २७ पर्यटकांचा पाकिस्तान पुरस्कृत इस्लामी दहशतवाद्यांनी बळी घेतला. ही घटना काश्मीर नावाच्या नंदनवनातलं भय संपत नसल्याचं सांगते. हा हल्ला घृणास्पद आहे आणि भारतानं त्याचा पुन्हा असं धाडस होणार नाही, असा बदला घ्यावा ही जनभावना रास्तच पण या हल्ल्यानं काश्मिरात निवांत राहणं किती धोकादायक याची जाणीव राज्यकर्त्यांना करून दिली.
काश्मिरात दहशतवाद संपला आणि स्थिती साधारण शांततापूर्ण असल्याचे दावे किती तकलादू आहेत, याचं दर्शन या हल्ल्यानं घडवलं आहे. यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते हल्लेखोरांना टिपलं पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, त्याचबरोबर यातून राजकीय पोळ्या शेकणारे ध्रुवीकरणाचे डाव मांडू नयेत तेवढा विवेक तरी ठेवावा. हा हल्ला भारतावरचा आहे. त्यात हा धर्म विरुद्ध तो धर्म असं द्वंद्व शोधणं पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारं असल्याचं भान निदान राज्य करण्याची जबाबदारी असलेल्यांनी ठेवायला हवं. हल्ल्यानंतर भारत-पाक संबंध नीचांकी स्तरावर गेले आहेत.