Pakistani Toxicant Girls on Facebook Part
Pakistani Toxicant Girls on Facebook Part

फेसबुकवरच्या पाकिस्तानी विष कन्या भाग-1

निशांत अगरवाल आणि सेजल कपूर यांची फेसबुक मैत्री. ती ब्रिटनमधली. मॅचेस्टरमधल्या ‘ग्रोथ कंपनी’त काम करायची. निशांत नागपूरच्या उज्ज्वल नगरमध्ये राहायचा. बुटिबोरीत ब्राह्मोस एरोस्पेसचं युनिट आहे. तिथं हायड्रॉलिक-न्यूमॅटिक्स आणि वॉरहेड इंटिग्रेशन विंगचा प्रमुख होता तो. अत्यंत हुशार असा वैज्ञानिक. 2017-18 मध्ये केंद्र सरकारच्या यंग सायंटिस्ट पुरस्काराचा मानकरीही होता तो. नुकतंच लग्न झालं होतं त्याचं. सगळं छान चाललं होतं. सुंदर पत्नी होती. चांगली नोकरी होती. सेजलसारखी फेसबुक मैत्रिण होती. तिची आणि त्याची आधीची ओळख असण्याचं काही कारणच नव्हतं. पण फेसबुक मैत्रीत अशा अडचणी येतच नसतात. तिथं काय कोणीही कुणाचा मित्र वा मैत्रिण असू शकतं.

सेजलची आणि त्याची मैत्रीही अशीच झाली. एके दिवशी त्याच्या फेसबुक खात्यावर तिची मैत्रीविनंती आली. त्याने तिचं प्रोफाईल पाहिलं. पाहताक्षणी कुणालाही आवडावी अशीच होती ती. सुंदर. टंच. जरा जास्तच मोकळी-ढाकळी. कपड्यांच्याबाबतीतही तसंच. निशांतनं तिची मैत्री स्वीकारली आणि त्यांच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या. ही 2016ची गोष्ट. हळुहळू तो तिच्याकडं मोकळा होऊ लागला. मन रमत नव्हतं त्याचं भारतात. त्याला अमेरिकेत जायचं होतं. तिथं मोठा शास्त्रज्ञ बनायचं होतं. सेजलनं त्याला सांगितलं, हे काम काय, सहज होईल. तिची अमेरिकेतल्या एका कंपनीत चांगली ओळख होती. तिथं लठ्ठ पगारावर निशांतचं काम होऊन जाईल...

पण हे फेसबुकवरून आपण किती दिवस गप्पा मारणार? एके दिवशी सेजलने त्याला एक संदेश पाठवला. ‘तुझ्या लॅपटॉपवर व्हिस्पर अॅप इन्स्टॉल कर. मग डेस्कटॉप आयकॉन येईल. त्यावर क्लिक करून ते ओपन कर आणि मला त्याचा कोड पाठव. आपण व्हिस्परवरच बोलत जाऊ या. ड्यूड, आम्ही यूकेमध्ये एकमेकांशी चॅट करायला हेच अॅप वापरतो...’तिच्या सौंदर्याने, अमेरिकेतील नोकरीच्या आमिषाने आधीच घायाळ झालेल्या निशांतनं ते अॅप डाऊनलोड केलं. त्यावरून त्यांच्या मोकळ्या-ढाकळ्या गप्पा सुरू झाल्या. छायाचित्रांची देवाणघेवाण सुरू झाली. आता सेजल तिची जरा अधिकच मोकळी-ढाकळी छायाचित्रं, चित्रफिती पाठवू लागली. पण, एकटी सेजलच त्याची फेसबुक मैत्रिण नव्हती. नेहा शर्मा आणि प्रिया रंजन या दोन तरुणींशीही त्याची ऑनलाईन घसट होती. या नादातून आपल्याला किती मोठा फटका बसणार आहे याची कल्पनाही तेव्हा निशांतला नव्हती. उत्तर प्रदेश एटीएस, महाराष्ट्र एटीएस आणि मिलिट्री इंटेलिजन्सचे अधिकारी त्याच्या दारात उभे राहिले, तेव्हाच त्याला ती कल्पना आली. पण तोवर खूपच उशीर झाला होता. 

निशांतच्या दारात पोलिस आणि गुप्तचर आले ते अच्युतानंद मिश्रमुळे. त्याचीही कहाणी काहीशी निशांतसारखीच होती. फरक एवढाच, की निशांत हा ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्मितीशी निगडित असा वैज्ञानिक होता आणि अच्युतानंद हा सीमा सुरक्षा बलातील (बीएसएफ) एक साधा कॉन्स्टेबल. तो मुळचा मध्य प्रदेशातल्या रेवाचा. अभ्यासात यथातथाच. नापास होत होत तो कसाबसा हायस्कूलमधून एकदाचा सुटला. घरची शेती होती. वडिल बीएसएफमध्ये. एक भाऊ पोलिसांत. त्यांच्या पगारावर गुजराण होत होती. याच काळात त्याने बीएसएफची परीक्षा द्यायला सुरूवात केली. त्यातही शेवटच्या प्रयत्नांत तो सुटला. स्वभावाने तो आधीच रंगिला. आता नोकरी लागली. एका निवृत्त सैनिकाच्या मुलीशी लग्न लागले. पण तो स्वभाव काही बदलला नाही. गांजा, दारू यांबरोबरच वेश्यागमन. सारे शौक होते त्याला. 

स्वस्त मोबाईल आणि स्वस्त इंटरनेट डेटामुळे त्याच्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात यूट्यूब, फेसबुक, व्हाट्सअॅप आणि अश्लील संकेतस्थळांचे एक नवेच जग प्रवेशले. अच्युतानंदला त्याची चटक लागली. फेसबुक आणि व्हाट्सअॅप गट यासारख्या समाजमाध्यमांनी अच्युतानंद याच्यासारख्या कोट्यवधी अभावग्रस्तांच्या आयुष्यात एक वेगळीच क्रांती घडवली आहे. एरवी ज्यांना सामाजिक दर्जा नाही, ओळख नाही, अशांनाही या माध्यमांनी ‘आपल्याला पण समाजात किंमत आहे’ असा भाव दिला. त्यावरील मैत्री विनंत्या, ते लाईक्स, आपल्या छायाचित्रांना मिळणारी ती वाहवा... सारेच आभासी ते. पण त्यातून अनेकांचा स्वप्रतिष्ठेचा अभाव भरून निघत आहे. फेसबुकवरील बहुतेकांत दिसणारी फ्रेंड रिक्वेस्टांची आणि लाइक्सची हाव ही त्यातूनच आलेली.

अच्युतानंदला तर एके दिवशी एका मुलीनेच मैत्रीविनंती पाठवली. काजोल शर्मा हे तिचे नाव. संरक्षणविषयक पत्रकार होती ती. पाकिस्तानात काम करायची. तशात रुपवती ती. तिच्यासारख्या तरूणीने मैत्रीची विनंती पाठवावी म्हणजे भारीच. अच्युतानंदने ती स्वीकारली. बीएसएफचा हा जवान तिलाही आवडू लागला होता. त्यामुळे तिने त्याला आपला व्हाट्सअॅप नंबर पाठविला. ‘पाकिस्तानी दोस्त’ या नावाने त्याने तो आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवला. त्यावरून आता त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. अश्लील चित्रफितींची देवाणघेवाण सुरू झाली. तो तिला आपली गणवेशातली छायाचित्रे पाठवायचा. तीही कुतूहलाने त्याला बीएसएफची, त्यांच्या प्रशिक्षणाची माहिती विचारायची. तो त्याच्या पथकाचा तळ, तेथील छायाचित्रे, चित्रफिती, सीमेवरील बीएसएफ जवानांकडे असलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती सांगायचा. ती संरक्षणविषयक पत्रकार. त्यामुळे तिला त्या माहितीची गरज होती. त्याबदल्यात ती पैसेही पाठवायची त्याला.

त्याच्या या चाळ्यांची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली आणि सप्टेंबर 2018 मध्ये त्यांनी त्याला नॉयडातील सेक्टर 18 मधून उचलले. त्याच्या फेसबुक खात्याची, त्याच्या फेसबुक फ्रेंड महिलांच्या प्रोफाईलची तपासणी करण्यात आली. त्यातून सेजल कपूरची माहिती मिळाली. तिच्या आणि निशांत अगरवालच्या संबंधांची माहिती मिळाली आणि अखेर गुप्तचर त्या तरुण शास्त्रज्ञाच्या दारात पोचले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com