
Palestine Recognition
esakal
इस्राईलनं ज्या रीतीनं गाझा पट्टीत आक्रमण सुरू केलं आहे आणि इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी गाझा पट्टीच ताब्यात घ्यायचे इरादे दाखवले आहेत, ते पाहता संयुक्त राष्ट्रांनी इस्राईलप्रमाणंच पॅलेस्टाईनच्या अस्तित्वाची जी हमी दिली होती, त्यापुढं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पॅलेस्टाईनला संपूर्ण राष्ट्र असा दर्जा आणि संयुक्त राष्ट्राचं पूर्ण सदस्यत्व आतापर्यंत मिळू शकलेलं नाही, यामागं अर्थातच इस्राईलचा दबाव आणि त्याला अमेरिकेची साथ हेच कारण आहे. आतापर्यंत यात पाश्चात्त्य देशही अमेरिकेची री ओढत आले आहेत, मात्र आता गाझातील नागरिकांचे मृत्यू आणि त्याला आलेलं नरसंहाराचं रूप पाहून काही पाश्चात्त्य देशही इस्राईलच्या विरोधात आणि पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी, या बाजूनं उभे राहत आहेत. या निमित्तांने पुन्हा एकदा पॅलेस्टाईनंच मूळ दुखणं जगासमोर आलं आहे. तसं ते आलं म्हणून आणि जगातून पॅलेस्टाईनला पाठिंबा देणाऱ्यांचा आवाज वाढला म्हणून तो देश अस्तित्वात येईल ही शक्यता नाही. याचं कारण अमेरिका त्यात आपला नकाराधिकार वापरत राहील.