
पंढरीचा श्रीपांडुरंग हे महाराष्ट्राचे उपास्य दैवत. वारकरी पंथाच्या सकल संतांनी विठ्ठलभक्तीचा हा ज्ञानदीप घराघरांत प्रज्वलित केला. पिढ्यान् पिढ्या पंढरीची वारी करणारी घराणी आज भक्तिमार्गप्रदीप ठरली आहेत. पांडुरंग ठाऊक नाही असा मराठी माणूस सापडणे विरळाच. जात्यावरच्या ओवीपासून संतांच्या अभंगांपर्यंत, श्रृंगाररसाच्या लावणीपासून वीररसाच्या पोवाड्यापर्यंत श्रीविठ्ठलाचे स्थान अढळ आहे. श्रीपांडुरंगाप्रती अशी अतूट आणि अकृत्रिम श्रद्धा असण्याचे कारण काय असावे, या प्रश्नाचे उत्तर संतवचनातच सापडते. पहिले कारण पंढरीचा पांडुरंग भक्तांची आतुरतेने वाट पाहणारा देव आहे. दुसरे कारण त्याची अनन्यभावे सेवा करणाऱ्या भक्तांची तो कामे न सांगता करतो.
भक्त समागमे सर्वभावे हरि।
न सांगता करी सर्व काम।।
वाट पाहे उभा भेटीची आवडी।
कृपाळू तातडी उतावीळ।।
जगभरात अनेक तीर्थक्षेत्रे आणि देव आहेत. मात्र त्यांच्या भक्तांना देवाची वाट पाहावी लागते आणि देवाची सेवा करावी लागते. येथे पंढरीचा देव भक्तांची वाट पाहतो आणि भक्तांचीच सेवा करतो, हे वैलक्षण्य आहे. त्यामुळे अन्य तीर्थांची पंढरीशी आणि पांडुरंगाची तुलना करता येणार नाही. पंढरीसारखे तीर्थक्षेत्र नाही आणि पांडुरंगासारखा देव नाही.