
परीक्षेत मार्क कमी पडल्यानं एका मुलीचा दुर्देवी अंत झालेला पाहून संपूर्ण शिक्षणप्रक्रिया, शाळांनी मुलांना दिलेली वागणूक, पालकांच्या अवास्तव अपेक्षा आणि मुलांचे वाढणारे मानसिक, शारीरिक ताण यांचं मूल्यमापन तज्ज्ञांनी पुन्हा एकदा करायला हवं. एका हुशार मुलीचा बळी गेल्यावर आजच्या ‘पालकत्वाची यत्ता कंची’ हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही...
नीट’च्या सराव परीक्षेत पुरेसे मार्क न मिळाल्यामुळे १६-१७ वर्षाच्या मुलीला वडील बेदम मारहाण करतात आणि मुलीचा दुसऱ्या दिवशी मृत्यू होतो, ही हिंसक घटना मन सुन्न करणारी आहे. यातून मनात शंभर प्रश्न निर्माण झाले. मिळाले कमी मार्क, म्हणून मूल गुन्हेगार ठरत नाही ना? आणि खर्चाचे कसले हिशोब करताय? मुलं जन्माला घातली की शिक्षणाचा खर्च करणं ही जबाबदारी आहेच पालकांची. मुलगी वडिलांना उलट बोलली म्हणून एवढा राग येतो कसा? ते टीनएजमधलं मूल आहे, त्याचा रागावर ताबा नसणं, भावना व्यक्त करण्याच्या तीव्र पद्धती वापरणं, पालकांना उलट बोलणं हे सर्व अपेक्षितच आहे, हे शिक्षक असणाऱ्या बापाला लक्षात नव्हतं? एवढं मारणाऱ्या बापानं पूर्वीही अनेकदा मुलीला मारहाण केलेली असणार.