

Child reading habits
esakal
संपूर्ण घर बघून झाल्यावर मी मित्राला म्हणालो, ‘‘वा, घर खूपच सुंदर बांधलं आहे! आता हॉलमध्ये काही पुस्तकं आणून ठेव म्हणजे झालं परिपूर्ण घर.’’ असं म्हणत मीच माझ्या सूचनेवर हसलो. त्यावर माझा मित्र म्हणाला, ‘‘अरे घरात पुस्तकं नाहीत असं कसं होईल? पुस्तक म्हणजे माझं प्रेम, तुला तर माहीतच आहे.’’ मी पुन्हा हॉलमध्ये नजर टाकत त्याला विचारलं, ‘‘कुठं ठेवली आहेत पुस्तकं... दिसत नाहीत?’’ तो म्हणाला, ‘‘अरे मुलगा तीन वर्षांचा झाला आहे म्हणून वरच्या माळ्यावर ठेवली आहेत.’’ मी म्हणालो, ‘‘माळ्यावर का ठेवली आहेत?’’ ‘‘कारण पुस्तक दिसलं, की मुलगा खेळायला घेतो,’’ असं तो म्हणाला. ‘‘मग खेळू दे की’’ मी... तो म्हणाला, ‘‘अरे खेळण्यापर्यंत ठीक आहे. तो फाडतो पुस्तकं.’’ ‘‘मग फाडू दे की’’ मी... त्यावर तो माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाला, ‘‘अरे काय बोलतोस तू! पुस्तक फाडू दे म्हणजे? पुस्तक हा विषय माझ्या किती जवळचा आहे तुला माहीत आहे ना. मी किती जपतो पुस्तकाला तुला माहीत आहे. मग मी कसा फाडू देईल पुस्तक कोणाला? मग तो माझा मुलगा का असेना?’’
खरं तर मला माझ्या मित्राचं पुस्तकप्रेम माहीत होतं. आमच्या सगळ्या मित्रांपैकी अफाट वाचन असलेला तो. त्यानेच ग्रुपमधील आम्हा मुला-मुलींना वाचनाची आवड लावली. एखाद्या पुस्तकाचा लेखक, प्रकाशक, त्याची किंमत सगळं काही त्याला माहीत असायचं. चालतं-बोलतं वाचनालय होता तो. आम्हाला पुस्तकाबद्दल काहीही अडचण आली, की आम्ही त्याला विचारायचो... त्याचं उत्तर त्याच्याकडे हमखास असायचं; परंतु आता माझ्या लक्षात आलं होतं, की त्याचं हेच पुस्तकप्रेम त्याच्या मुलाच्या वाचनामध्ये अडथळा ठरू शकतं. तो पुस्तक जपू पाहत होता; वाचन संस्कृती नव्हे...