
फक्त धार किंवा टोक असलेल्या आयुधांनाच ‘शस्त्र’ म्हणायचे का? समोरची व्यक्ती, पशुपक्षी, वस्तू यांना कोणत्याही प्रकारे हानी पोचवू शकणारी आयुधं हीसुद्धा ‘शस्त्रं’च! युद्धांत वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांमध्ये तलवारी, भाले, धनुष्यबाण अशा काही शस्त्रांनी चित्रे, लिखाण, समकालीन नोंदी यांच्यात प्रसिद्धी मिळवली. मात्र, काही शस्त्रे युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाऊनही दुर्लक्षित राहिली.
युद्धांमधले मर्यादित स्थान, काळानुरूप कमी होत गेलेला वापर, शस्त्राला असणाऱ्या वापर-कौशल्याच्या मर्यादा यांमुळे काही शस्त्रे प्रकाशझोतात आली नाहीत. अर्थात, यातल्या काही शस्त्रांचे अनेक पौराणिक, धार्मिक संदर्भ आपल्याला हिंदू देवतांची आयुधे म्हणून प्राचीन काळापासून आढळतात. ‘पाश’ आणि ‘अंकुश’ ही अशीच दोन दुर्लक्षित तरीही वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रे!