

Reading Habits
esakal
काळानुसार अनेक बदल आपल्या जीवनाचा भाग बनतात; पण सर्व बदल प्रगतीच्या बरोबरीचे नसतात. मानवाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे बदल नव्हे; तर प्रगती करणं. जगातील अव्वल व्यवस्थापन गुरूंपैकी एक टोनी रॉबिन्स म्हणतात, की वाढ तुमच्या वैयक्तिक ओळखीवर अवलंबून असते. तर खरा प्रश्न म्हणजे ‘तुम्ही स्वतःची व्याख्या कशी करता?’
तुम्ही तुमच्या समस्यांवर उपाय शोधणारे आहात का? की हार मानणारे आहात? तुम्ही ध्येयाच्या मागे धावणारे ‘गो-गेटर’ आहात, उत्तम शिकणारे आहात? संधीचं सोनं करणारे आहात?
जसं मित्र तुमच्या समस्यांवर उपाय शोधण्यास मदत करतात, तशीच पुस्तकंदेखील तुम्हाला मदत करतात. आयुष्यातील कोणतीही समस्या असो, तिचं उत्तर अनेकदा पुस्तकांच्या पानांमध्ये सापडू शकतं. मग ते कादंबऱ्यांमधील काल्पनिक नायकांचे अनुभव असोत किंवा प्रत्यक्ष जीवनातील अनुभवातून मिळणारी शिकवण असो... जेव्हा कधी उत्तम व्यक्ती म्हणून स्वतःला घडवत असताना समृद्ध होण्याच्या प्रवासात शहाणपणाची गरज भासते, तेव्हा पुस्तकंच आपला खरा मार्गदर्शक म्हणून उभी राहतात. पुस्तकं आपल्याला सांगतात, की आपण आहोत त्या परिस्थितीत त्या काल्पनिक नायकांनी काय केलं हे वाचून त्यातून शिकत आपण एक अधिक कणखर व्यक्ती म्हणून उभे राहतो. अशीच ‘चांगली पुस्तकं’ आपल्या आयुष्यात बदलाचं, परिवर्तनाचं बीज पेरण्यासाठी निमित्त ठरत असतात.