
1954 Indian cinema
esakal
सुलभा तेरणीकर
saptrang@esakal.com
‘दो बिघा जमीन’ आणि ‘परिणीता’च्या नेत्रदीपक यशानंतर बिमल रॉय यांच्या भावी चित्रपटांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. मोठा दबदबा निर्माण झाला होता त्यांच्या नावाचा; पण १९५४ या वर्षात ‘बिमल रॉय प्रॉडक्शन्स’चा एकच चित्रपट आला ‘नौकरी!’ विषय होता सुशिक्षित बेरोजगार युवकाचा. सुबोध बोस यांच्या एका कथेवर आधारित होता. त्यात खेड्यातील युवकाची स्वप्नं होती. क्षयग्रस्त धाकट्या बहिणीचा उपचार करायचा होता. कोलकत्यात, मुंबईत नोकरी मिळवायची, आपल्या प्रिय मैत्रिणीशी लग्न करायचं होतं. मुख्य भूमिका केली होती किशोर कुमारने! त्या वेळी स्वतः किशोर कुमार कामाच्या शोधात असलेल्या युवकांसारखेच होते; मात्र हास्यविनोद, नकला, गमतीजमती यांची मैफल रंगवत असत. मितभाषी बिमलदा सेटवर आल्यावर वातावरण एकदम गंभीर असे. एकदा किशोरदांनी छान मैफल रंगवली होती आणि बिमलदा मागे येऊन उभे राहिले. मग मात्र सगळीकडे शांतता पसरली; पण बिमलदा पुढे येऊन म्हणाले, ‘‘चालू दे किशोर...’’ ‘नौकरी’ची कथा बिमलदांनी संवेदनशीलतेने रंगवली होती. आज काळाच्या ओघात ती हरवून गेली. पुढे किशोर कुमार हे नाव गाजलं, झळकलं आणि तळपत राहिलं; पण सुशिक्षित, संवेदनशील बेरोजगार युवकाचं स्वप्न ‘छोटासा घर होगा, बादलोंकी छाँव में’ मात्र आजही जिवंत आहे. संगीतकार सलील चौधरी सांगतात, की ‘छोटासा घर होगा...’ हे गाणं एका नेपाळी राखणदाराच्या गुणगुणण्यावरून केलं.
याच वर्षात बिमल रॉय यांनी ढाक्क्याचा परममित्र हितेन चौधरी यांच्या ‘बिराज बहू’चे दिग्दर्शन केलं. कथा शरच्चंद्र चटर्जी यांची होती. चित्रपट इंडस्ट्रीत बिमल रॉय ‘बिराज बहू’ करत आहेत हे कळताच अनेक अभिनेत्रींनी आपली वर्णी लागावी, असे प्रयत्न केले. त्या इच्छुक अभिनेत्रींत एक नाव मधुबालाचंही होतं असं म्हणतात; पण अभि भट्टाचार्य यांनी कामिनी कौशलचं नाव पुढे केलं. अभिनेत्री कामिनी कौशल आपल्या आठवणीत सांगतात, ‘‘मी अगदी हुरळून गेले; पण एक सूचना कोणीतरी केलीच - ही भूमिका एकदा केलीस की तुझ्या रोमँटिक भूमिकेतून तुझी सुट्टी झालीच असं समज.’’ पुढे त्या सांगतात, ‘राज कपूरच्या दुसऱ्याच चित्रपटात ‘जेलयात्रा’मध्ये मी त्याची नायिका होते. त्याच्या १९४८ या वर्षातल्या ‘आग’मध्येही होते. ‘शहीद’पासून दिलीप कुमारशी जोडी जमली होती. ‘नदिया के पार’, ‘शबनम’, ‘आरजू’मध्ये लोकांनी आम्हाला पसंत केलं होतं. १९४८ मध्ये ‘जिद्दी’मध्ये देव आनंद माझे नायक होते.’ ऐन बहरात लोकप्रिय नायकांबरोबरची नायिका म्हणून गाजत असलेल्या कामिनी कौशल यांच्या जीवनकथेनंही एक वळण घेतलं होतं. त्यांच्या मोठ्या बहिणीचं अकालीच अपघाती निधन झालं होतं आणि तिच्या दोन लहानग्या मुलींच्या संगोपनाची जबाबदारी आली होती. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे मेहुण्यांशी लग्न करावे लागले होते. सांसारिक जबाबदाऱ्या होत्या... पण बिमल रॉय यांच्याकडे काम करण्याची संधी चालून आली होती. कामिनी कौशल सांगतात, ‘बिमलदांनी मला ‘बिराज बहू’ ही कादंबरी वीस वेळा वाचायला लावली होती... ते फारसे बोलत नसत; पण नेमके बोलत असत. ‘बिराज बहू’मध्ये तुला भारी साड्या नेसायला मिळणार नाहीत, की चेहऱ्याला रंग लावायला मिळणार नाही असं म्हणत.’
कामिनी कौशल खरोखर रोमँटिक जोडीतून दूर गेल्या. ‘बिराज बहूँ बिमलदांच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक समजला जातो; पण त्याला ‘परिणीता’चं यश मिळालं नाही. याच वर्षी १९५४ मध्ये बिमल रॉय यांनी ‘बापबेटी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. मोपाँसा यांच्या ‘सिमॉन्सपापा’ या सुप्रसिद्ध कथेवर आधारित होता. यात छोट्या मुलीची भूमिका केली होती बेबी तबत्सुम यांनी! त्या आपल्या आठवणीत सांगतात, ‘‘अत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट होता; पण नायक, नायिका, नृत्य, गाणी असं काहीच नसल्याने रसिकांनी पाठ फिरवली.’’ याच वेळी बिमल रॉय त्यांच्या आणखी एका स्वप्नाचा पाठलाग करत होते. बहुधा ‘देवदास...’
मेहबूब खान या वेळी एक आगळ्यावेगळ्या कथेवर आधारित चित्रपट घेऊन आले होते ‘अमर!’ मधुबाला, निम्मी आणि दिलीप कुमार. संगीत नौशाद! ‘अमर’चा नायक असतो एक उच्चभ्रू, सुशिक्षित वकील. त्याच्याकडून खेड्यातल्या एका तरुण गवळणीवर बलात्काराचा गुन्हा घडतो. त्या तरुणाची प्रेयसी, सामाजिक न्याय हक्क क्षेत्रात काम करणारी पुढे येऊन त्या गरीब गवळणीचा न्याय करते. हा अतिशय संवेदनशील विषय मेहबूब खान यांनी मांडला असला, तरी सिनेरसिकांना तो मुळीच रुचला नाही. नायक दिलीप कुमार यांची अपराधी भावनेने घुसमटलेली प्रतिमा बिखरून गेल्यासारखी झाल्यानं त्यांच्या चाहत्यांना आवडली नाही. नायकाला एकही गाणं नसलं तरी नौशाद-शकील यांनी ‘अमर’ची मैफल सुरेल केली होती. नौशादसाहेबांनी प्रथम निम्म्साठी आशा भोसले यांचा आवाज वापरला. बाकी ‘जानेवाले से मुलाकात ना होने पायी’, ‘तेरे सद के बलम’, ‘न मिलना गम तो’, ‘खामोश है खेवनहार भेरा’, ‘न शिकवा है कोई’ अशी लता गीतांची मैफल आजही अमर आहे. रफींचं एकमेव गाणं - ‘इन्साफ का मंदिर है ये भगवान का घर है’ चित्रपटाचा कळस गाठतं. सुंदर सेट, मधुर संगीत, कसलेले कलावंत असं सगळं जमून आलं तरी भारतीय सुजाण, सहृदय सिनेरसिकांनी ‘अमर’ डावलला. नौशादसाहेब आपल्या आठवणीत लिहितात, की ‘अमर’च्या अपयशाने मेहबूब खानच नव्हे, तर चित्रपटाचे सर्व युनिट मोठे व्यथित झाले होते; पण मेहबूब खान पुढच्या तयारीला लवकरच लागले. १९४० मध्ये केलेल्या ‘औरत’ या
चित्रपटाचा विषय पुन्हा एकदा नव्या संचात मांडावा अशा विचाराने उचल खाल्ली आणि मेहबूब खान उत्साहानं कामाला लागले असावेत ‘मदर इंडिया’साठी...
पुण्यात सुरू झालेल्या देव आनंद-गुरुदत्त यांच्या मैत्रीची गोष्ट एका सुंदर टप्प्यावर आली होती. ‘आरपार’च्या यशानं गुरुदत्त, तर ‘टॅक्सी ड्रायव्हर’ने देव आनंद बहरात आले. विशी-बाविशीच्या विजय आनंद या आनंद परिवाराच्या छोट्या भावानं एक कथा लिहिली होती. उमा आनंद या त्याच्या मोठ्या वहिनीनं ती कथा थोडी आणखी पुढे नेली. बडे भाई चेतन आनंद यांनी पटकथा लिहिली. नायक देव आनंद, नायिका कल्पना कार्तिक, संगीत एस. डी. बर्मन आणि त्यांचे सहाय्यक संगीतकार जयदेव! गुरुदत्त ‘आरपार’मध्ये गॅरेजवाला झाला होता आणि इकडे देव आनंद टॅक्सी ड्रायव्हर. या दोन्ही चित्रपटांत मुंबईचे सुंदर दर्शन घडतं. जणू या दोन्ही चित्रपटांची प्रमुख नायिका नित्य नववधूचा शृंगार करणारी मुंबईनगरीच! पण गुन्हेगारी विश्वाचं कवाड हलकेच उघडलं हे खरं!
देव आनंदच्या ‘टॅक्सी ड्रायव्हर’साठी बर्मनदा आणि साहिर यांनी मात्र ‘आरपार’सारखं मस्तीभरे संगीत नाही, तर हळुवार सुंदर ‘जाये तो जाये कहाँ’ हे तलतच्या आवाजातलं गीत दिलं. क्लब साँग्स इथं लता गाते - ‘दिल से मिला के दिल प्यार कीजिये’, ‘दिल जले तो जले’, ‘ऐ मेरी जिंदगी, आज रात झूम ले’ अर्थासह भिडणारी गाणी कथा पुढे नेणारी. ‘चाहे कोई खुश हो चाहे गालियाँ हजार’ हे खास किशोर कुमारसाठी! चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन आनंद यांनी पहिल्या काही अपयशानंतर ‘नवकेतन’चा ध्वज उंचावला. ‘टॅक्सी ड्रायव्हर’च्या सेटवर कल्पना कार्तिक-देव आनंद विवाहबद्ध झाले. चेतन आनंद यांच्या पत्नी उमा आनंद यांची सुस्वरूप, ‘मिस् सिमला’ म्हणून गाजलेली भाची आनंद परिवारात दाखल झाली. ‘नवकेतन’च्या वाटचालीत एक यशस्वी पडाव आला. भारतीय चित्रपटाच्या पटकथेत रंग भरू लागले... ‘टॅक्सी ड्रायव्हर’ने ‘नवकेतन’ची गाडी जोरात सुरू झाली. मालाडच्या काजू-आंब्यांची बाग असलेला, आशियातील सुसज्ज ‘बॉम्बे टॉकीज’चा स्टुडिओ मात्र कर्तृत्ववान माणसं निघून गेल्यानं, हस्तांतरणामुळे सुनासुना झाला होता. ‘बॉम्बे टॉकीज वर्कर्स इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ने एक धाडस करून ‘बादबान’ची निर्मिती केली. अशोक कुमार, देव आनंद, मीना कुमारी, उषा किरण, जयराज अशी कलावंत मंडळी, फणी मुजुमदारसारखे दिग्दर्शक, ‘न्यू थिएटर्स’च्या ‘देवदास’चे मातब्बर संगीतकार तिमिर बरन आणि एस. के. पाल असूनही चित्रपट गर्दी खेचू शकला नाही. ‘बादबान’चा अर्थ शिडाची होडी, लक्ष्यार्थाने वादळ, तुफान रोखणारे आश्रयस्थान! पण ‘बॉम्बे टॉकीज’चं तारू वादळात हरवलं ते हरवलंच. ‘बादबान’ने त्यावर अखेरचा पडदा पडला. गीता दत्तचं ‘कैसे कोई जिये’ हे गाणं मात्र रसिकांच्या मनात रुंजी घातलं. आजही. कोळणीच्या भूमिकेत मराठी उषा किरणने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. काळाच्या विस्तीर्ण वाळवंटात ‘बॉम्बे टॉकीज’चा इतिहास हरवला खरा, तरी काही पावलांच्या खुणा शोधायला हव्यात...
(लेखिका ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आहेत.)
..
‘बॉम्बे टॉकीज’, ‘न्यू थिएटर्स’, ‘प्रभात’ अशा एकेकाळी अभेद्य किल्ल्यासारख्या संस्थांचा एकेक चिरा ढळत होता; पण व्ही. शांताराम, मेहबूब खान, सोहराव मोदी, बिमल रॉय अशी मातब्बर माणसं मैदानात होती. राज कपूर, गुरुदत्तही आपली जागा शोधून उभे होते. ‘फिल्मीस्तान’ची दौड सुरू होती. खूप मनुष्यबळ हवे, अशा चित्रनिर्मिती उद्योगासाठी देशभरातून इच्छुक युवक-युवती, कलावंत, संगीतकार, कवी, लेखक यांची रीघ मात्र लागलेलीच होती... त्यांच्या संघर्षाच्या कथा चित्रपटाइतक्याच सुरम्य...
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.