
पोप लिओ चौदावे यांचे नेतृत्व चर्चमध्ये परिवर्तन घडवून आणू शकते आणि भविष्यासाठी आशेचा किरण निर्माण करू शकते. परंपरा आणि आधुनिक विचारसरणी यांची सांगड त्यांना घालावी लागणार आहे. पोप लिओ यांच्यापुढे बरीच आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी ते काय करतात, हे पाहावे लागणार आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून साऱ्या जगाचे लक्ष रोमवर लागून राहिले होते. ६९ वर्षीय स्पॅनिश वंशाच्या अमेरिकन कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांच्या निवडीमुळे कॅथोलिक धर्मीयांनी इतिहास घडविला आहे. ते सेंट पीटरच्या ‘सिंहासना’वर विराजमान होणारे २६७वे पोप ठरले आहेत. कॅथोलिक चर्चच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखादी अमेरिकी व्यक्ती पोपपदावर बसली असून, ही एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण घटना ठरली आहे. पोप यांच्या निवडीनंतर पोप लिओ चौदावे या नावाने ते ओळखले जाऊ लागले. नवीन पोप जगातील प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. दीर्घकाळानंतर कॅथोलिक चर्चला तळागाळात काम करायचा अनुभव असलेला एक मिशनरी पोप मिळाला आहे.