

Positive thinking
esakal
विचारांची दिशा महत्त्वाची आहे. सकारात्मक विचार ही आपोआप होणारी गोष्ट नाही. त्याचा सराव करावा लागतो. तुमच्या नकारात्मक विचारांत तुम्ही अडकून न पडता ते कागदावर लिहून काढा. म्हणजे तुम्हाला ठरवता येईल, की त्यातले कुठले घ्यायचे-कुठले काढायचे. मनातला कचरा साफ झाल्याने सकारात्मक विचारांना जागा तयार होते. मग कुठलीही समस्या आली तरी आपण खात्रीने म्हणू शकतो, ‘ऑल इज वेल!’
माणसाची बुद्धी आणि त्याची विचार करण्याची क्षमता त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं ठरवते. विचार करणं ही एक मानसिक प्रक्रिया आहे. आपल्या बुद्धीला किंवा मनाला ती एका विशिष्ट मार्गाने चालवते. मेंदूत जेव्हा विचार येतो, तेव्हा मेंदूतल्या मज्जापेशी (neurons) सक्रिय होतात. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूतल्या मज्जापेशी विद्युत आवेग तयार करतात जे एका मज्जापेशीमधून दुसऱ्या मज्जापेशीमध्ये सायनॅप्सच्या जोडणीद्वारे जातात. या प्रक्रियेदरम्यान, न्यूरोट्रान्समीटर नावाचे रासायनिक संदेशवाहक सोडले जातात, जे पुढील मज्जापेशीला उत्तेजित करतात आणि विचारांचे किंवा भावनांचे मार्ग तयार करतात. मेंदूमध्ये जवळपास १०० अब्ज मज्जापेशी असतात. ज्या लाखो कनेक्शन्सद्वारे जोडलेल्या असतात. या जोडलेल्या ‘नेटवर्क’द्वारे विचार आणि क्रियांचं नियमन केलं जातं.