

Divyang Rights Movement Maharashtra
esakal
बच्चू - Bacchuprahar41@gmail.com
एका आईने विचारलं, ‘साहेब, दिव्यांग मुलगा जन्माला घालणं आमचा गुन्हा आहे का?’ त्या माउलीच्या प्रश्नाने आमच्या मनात संघर्षाची आग पेटली आणि दिव्यांगांच्या स्वाभिमानाचा लढा सुरू झाला. पुढे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने मंत्रालयावर राज्यातील हजारो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं. प्रहारने दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या संघर्षाचा तो परिपाक होता...
महाराष्ट्रातील दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी, निराधार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी उभी राहिलेली प्रहारची चळवळ ही केवळ आंदोलनांची मालिका नव्हती; तर ती व्यवस्थेविरोधातील जळजळीत जनआक्रोशाची जिवंत क्रांती आहे. सत्ता मिळवण्यासाठी आंदोलनं कधीच केली नाहीत... तर ही आंदोलनं होती त्या दिव्यांग बांधवांसाठी, ज्यांना सरकारी कार्यालयांच्या पायऱ्यांवर अपमान, अन्याय सहन करावा लागत होता... त्या आईसाठी, जिने आपल्या दिव्यांग मुलाच्या प्रमाणपत्रासाठी वर्षानुवर्षं उंबरठे झिजवले. त्या तरुणांसाठी, ज्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते आणि त्या हजारो कुटुंबांसाठी, ज्यांच्याकरिता शासनाचं पेन्शन हीच जगण्याची शेवटची आशा होती...
गावोगावी फिरताना मी दिव्यांगांच्या असंख्य वेदना पाहिल्या. कुणी तीनचाकी खुर्चीवरून तहसील कार्यालयात पोहोचत होतं; पण अधिकारी त्याला ‘उद्या या’ असं सांगत होते... तर कुणी शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी तीन मजले चढत होते. एका आईने रडत विचारलं, ‘साहेब, दिव्यांग मुलगा जन्माला घालणं हा आमचा गुन्हा आहे का?’ त्या माउलीच्या प्रश्नाने आमच्या मनात संघर्षाची आग पेटली. त्या दिवसापासून ठरवलं, ‘दिव्यांगांच्या डोळ्यातील अश्रू आता पडू द्यायचे नाहीत... त्या दिव्यांगांचा हक्काचा आवाज बनायचा.