

Child Abuse Awareness India
esakal
आज सर्वसामान्य माणूस बाललैंगिक अत्याचाराने भयभीत आहे, गुन्हेगारीने त्रस्त आहे आणि समाजातील संवेदनशीलता हरवल्याने हतबल आहे. म्हणूनच प्रश्न पडतो, ‘हर शख्स परेशान सा क्यूँ है?’ त्याचं उत्तर केवळ शासनव्यवस्थेत किंवा धोरणांमध्ये शोधून चालणार नाही. ते आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या वागणुकीत अन् प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये दडलं आहे.
असं म्हणतात, की आयुष्यातील सर्वाधिक आनंद देणारा अन् कानाला सुखावणारा आवाज म्हणजे स्व-कर्तृत्वाचं कौतुक म्हणून आपल्यासाठी वाजणाऱ्या टाळ्यांचा कडकडाट आणि सर्वात वेदनादायी आक्रोश म्हणजे कारुण्यरुदन... जे अत्यंत दुःखद असतं. ते जर स्वतःच्या लेकराच्या वियोगाचं असेल, तर ती वेदना शब्दातही मांडता येणार नाही. मन सुन्न अन् मती गुंग करणाऱ्या बाललैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. प्रत्येक आईच्या काळजात धस्स होतंय. तिचं मन रोज एकाच प्रश्नाने रडतंय, माझं मूल सुरक्षित असेल ना?
मे महिन्याचा दुसरा रविवार जवळ आला, की जगभर ‘मदर्स डे’ साजरा करण्याची तयारी सुरू होते. आईच्या मायेचा, त्यागाचा आणि संस्कारांचा गौरव केला जातो; पण आजची आई कमालीची अस्वस्थ आहे. धास्तावलेली आहे. त्याला निमित्त झालीय ती भोर तालुक्यातील नसरापूरची घटना. तिथल्या एका ६५ वर्षांच्या विकृत म्हाताऱ्याने अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. आजी-आजोबा आपल्या नाती-नातवावर संस्कार करतात; मात्र नसरापूरच्या घटनेत ‘भीमराव कांबळे’ नामक नराधम आजोबाने आपल्या नातीच्या वयाच्या चिमुकलीला आपल्या आसुरी वासनेसाठी संपवलं. नात्याबाबतच्या तिच्या विश्वासाची राखरांगोळी झाली... एका निरागस कळीला कुस्करून टाकणारा नराधम आज तुरुंगात खितपत असला तरी त्याच्यासारखे काही सैतान वखवखलेल्या नजरेने मानवी रूपात राजरोस फिरताहेत. अत्याचारांच्या घटनांमध्ये कडक कायदे आणि कठोर शिक्षा आवश्यक आहेच; पण त्याहीपलीकडे एक गोष्ट अधिक महत्त्वाची आहे ती म्हणजे, संस्कार आणि संवेदनशीलता. ती कुठून येणार? लहानपणापासून मुलांना आपण शिकवतो, स्त्रीचा सन्मान करा. मर्यादा पाळा; पण ते कृतीत येतंय का? आईला खऱ्या अर्थाने सन्मान द्यायचा असेल, तर तिच्या मुलासाठी सुरक्षित समाज निर्माण करावा लागेल.