

Prahar Yuva Shakti
esakal
प्रहार युवाशक्तीची पहिली शाखा गांधी पुलावर काढायचं ठरलं. ‘प्रहार’ नावाला साजेसं काम आम्हाला करून दाखवायचं होतं. रक्तदानाचा एक महायज्ञ घडवण्याचा निर्धार आम्ही केला आणि ग्रामीण भागात एका दिवशी तब्बल १,१०० बाटल्या रक्त जमा झालं. एका विक्रमाची नोंद झाली. याच महायज्ञातून ‘प्रहार’ची पहिली झलक महाराष्ट्राला दिसली.
हार... हे नाव आमच्या जिभेवर आलं त्या दिवशी जणू अंगातल्या अंगात एक ठिणगी पडली. हे नाव उच्चारलं, की छाती ताठ व्हायची, अंगात एक वेगळीच जिद्द उभी राहायची. कारण या नावात आक्रमकता होती, अन्यायाच्या विरोधात उभे ठाकण्याची ताकद होती आणि गावागावातल्या दु:खाला, त्रासाला प्रहार करून फाडून काढण्याचा बाणा होता; पण नाव ठरलं म्हणून काम संपलं नव्हतं. उलट खरी सुरुवात त्या दिवशी झालेली. हे नाव आम्ही लावलं; पण आता ते नाव आम्हाला ‘साजेसं’ काम करूनच जगाला दाखवायचं होतं. नाहीतर नावाला काही अर्थ नव्हता.