
Ramayan
esakal
असं म्हटलं जातं, की देशाच्या आजच्या राजकारणासाठी, विशेषतः काँगेसच्या ओहोटीसाठी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेने निर्णायक भूमिका बजावली. १९८७ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेली ‘रामायण’ ही केवळ एक धार्मिक मालिका नव्हती; तर तिने त्या काळचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक माहोल बदलवून टाकला होता; पण या मालिकेचं स्वप्न प्रत्यक्षात आणणं अजिबात सोपं नव्हतं. अडथळ्यांचा डोंगर होता, उपहास होता, आर्थिक टंचाई होती आणि असंख्य राजकीय अडचणी होत्या. या सर्व अडचणींवर मात करून हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मार्ग दाखवणारे रामानंद सागर यांचे हनुमान ठरले तो त्यांचा मुलगा - प्रेम सागर. नुकतंच त्यांचं निधन झालं. ‘रामायण’ची कहाणी प्रेम सागर यांच्या योगदानाशिवाय अपुरीच ठरते.
रामानंद सागर यांना चार मुलं आणि एक मुलगी. त्यात प्रेम हा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा. पुण्याच्या फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेतले होते. रामानंद सागर हे १९७०च्या दशकात मोठ्या पडद्यावरील अत्यंत यशस्वी सिनेमा दिग्दर्शक, कथालेखक होते. स्वित्झर्लंडमध्ये ‘चरस’ चित्रपटाचं चित्रीकरण करताना रामानंद सागर यांनी पहिल्यांदा कलर टीव्ही पाहिला आणि त्या क्षणीच ठरवलं, आता मी मोठ्या नाही, तर छोट्या पडद्यावर काम करणार. हा निर्णय ऐकून कुटुंब हादरलं. अनेकांनी त्यांना वेडं ठरवलं; मात्र प्रेम सागर यांनी वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी वडिलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्धार केला. त्या काळात भारतात अजून कलर टीव्ही आलेलाच नव्हता. रामानंद सागर यांच्या कल्पनेला कुणी पाठिंबा दिला नाही.