बिटकॉईन आणि आभासी चलनांचे विश्व! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिटकॉईन आणि आभासी चलनांचे विश्व!}

ऑनलाइन आर्थिक व्यवहार आणि बिटकॉइन यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे.

बिटकॉईन आणि आभासी चलनांचे विश्व!

बऱ्याच काळापासून आपले बरेचसे आर्थिक व्यवहार संगणकांच्या माध्यमातून व्हायला लागतील, अशी भाकितं केली जात होती. इंटरनेट बॅंकिंग, ऑनलाइन पेमेंट अशांसारख्या सुविधा उपलब्ध होत गेल्यामुळे ही भाकितं सत्यातही उतरली. काही जणांना बिटकॉइन हे याचंच पुढचं पाऊल आहे, असं वाटत असलं तरी ऑनलाइन आर्थिक व्यवहार आणि बिटकॉइन यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. आपले सगळे ऑनलाइन आर्थिक व्यवहार आपल्या चलनाच्या माध्यमातून, म्हणजे रुपयातून होतात. अमेरिकेमध्ये हेच व्यवहार डॉलरच्या रूपात होतात. बिटकॉइन मात्र रुपया, डॉलर, पौंड, युरो यांच्यासारखं एक स्वतंत्र चलनच आहे. म्हणजेच एखादी वस्तू खरेदी केल्यावर तिचा मोबदला आपण बिटकॉइनच्या रूपात देऊ शकू, अशी त्यामागची संकल्पना आहे.

बिटकॉइन हे एक स्वतंत्र चलन असेल, तर त्याविषयी एवढी चर्चा व्हायचं कारण काय? मुळात चलन हे एका ठरावीक देशाचं असतं. उदाहरणार्थ, आपल्याला उद्या वाटलं म्हणून आपण आपलं स्वत:चं चलन सुरू करू शकणार नाही आणि जरी समजा ते कुणी काढलं तरी त्याला मान्यता कोण देणार? म्हणूनच राष्ट्रीय पातळीवर संबंधित देशाची मध्यवर्ती बॅंक त्या-त्या देशाच्या चलनाचं नियमन करते. बिटकॉइनचं मात्र असं नाही. बिटकॉइन हे कुठल्याच देशाचं चलन नाही. ते स्वयंभू आहे. कुठलंही सरकार, कुठलीही मध्यवर्ती बॅंक त्यावर नियम लादू शकत नाही. साहजिकच या चलनाची किंमत किती असावी हेसुद्धा पारंपारिक अर्थशास्त्राचे निकष लावून ठरवता येत नाही.

हेही वाचा: क्रिकेटमध्ये पुन्हा येतंय गोलंदाजांचं राज्य?

संपूर्णपणे स्वयंभू चलन

‘बिटकॉइन’ हा शब्द संगणकामधला ‘बिट’ आणि चलनामधला ‘कॉइन’ या दोन शब्दांपासून बनलेला आहे. सारांश म्हणजे संगणकीय जगातली नाणी म्हणजे ‘बिटकॉइन’ असं आपण ढोबळपणे म्हणू शकतो. याचाच अर्थ ही नाणी प्रत्यक्षात नसतातच; त्यांचं अस्तित्व फक्त संगणकांमध्यंच असतं. बिटकॉइन या चलनाचा जनक अज्ञातच असला तरी सातोशी नाकोमोटो नावाच्या माणसानं हे चलन प्रथम अस्तित्वात आणलं, असं मानलं जातं. या चलनाची सगळी व्यवस्था संगणकीय यंत्रणा सांभाळतात. तसंच आपल्या परंपरागत चलनात असतात तसं यात कुठलंही सरकार, कुठलीही न्यायव्यवस्था, कुठलीही बॅंक वगैरे काहीही नसतं. बिटकॉइन हे त्या अर्थाने संपूर्णपणे स्वयंभू चलन आहे.

बिटकॉइनचा भाव गगनाला

सुरवातीला डॉलर, पौंड, युरो, रुपया अशांसारख्या पारंपरिक चलनांना पर्याय म्हणून लोक बिटकॉइनकडे बघत. ही चलनं आणि बिटकॉइन यांच्यामधला एक प्रमुख फरक म्हणजे आपल्या पारंपारिक चलनांचं अर्थव्यवस्थेमधलं प्रमाण किती असावं, हे सद्यपरिस्थितीनुसार त्या-त्या देशाची मध्यवर्ती बॅंक ठरवते; पण बिटकॉइनच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. उदाहरणार्थ, अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असताना तिला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंक अर्थव्यवस्थेमधल्या रुपयांचं प्रमाण वाढवते; तर तेजीच्या वेळी हेच प्रमाण ती महागाई आटोक्यात आणण्यासाठी कमी करते. बिटकॉइनच्या निर्मात्यांनी मात्र या चलनाच्या आरंभीच जास्तीत जास्त २.१० कोटी बिटकॉइनच अस्तित्वात येऊ शकतील, असा नियम घालून दिला आणि त्यामधल्या फक्त २६ लाख बिटकॉइन अजून यायच्या बाकी आहेत. याचा परिणाम म्हणजे बिटकॉइनचा तुटवडा निर्माण होईल, या भीतीपोटी लोकांनी आपल्याकडच्या बिटकॉइन आपल्याकडेच राखून ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे बिटकॉइनचा भाव गगनाला जाऊन भिडला.

हेही वाचा: ‘लालपरी’चा गळा घोटला कुणी?

‘क्रिप्टोकरन्सी’ शब्द चर्चेत

बिटकॉइनच्या संदर्भात ‘क्रिप्टोकरन्सी’ हा शब्द वारंवार वापरला जातो. फक्त संगणकीय यंत्रणा वापरून केले जाणारे चलनाचे व्यवहार म्हणजे ‘क्रिप्टोकरन्सी’ असं आपण ढोबळमानानं म्हणू शकतो. हे चलन आणि त्यामधले सगळे व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी ‘च’ ची भाषा अर्थात ‘क्रिप्टोग्राफी’चा वापर होत असल्यामुळे ‘क्रिप्टो’ (सुरक्षा) आणि ‘करन्सी’ (चलन) या दोन शब्दांमधून ‘क्रिप्टोकरन्सी’ हा शब्द तयार झाला आहे. म्हणजेच बिटकॉइनची निर्मिती आभासीच असते. जसं आपण आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये निरनिराळ्या मूल्यांच्या रुपयांच्या नोटा बाळगू शकतो, तसं बिटकॉइनचं होत नाही. त्यांचं अस्तित्व फक्त संगणकांमध्येच असतं. सर्वसामान्यपणे ‘पैसा’ हा शब्द ऐकल्यावर आपल्या नजरेसमोर नाणी, नोटा, बॅंक खाते, चेकबुक अशा गोष्टी येतात. आताच्या या आधुनिक संगणकीय चलनामध्ये मात्र यातलं काहीच नसतं. म्हणूनच हे आभासी चलन असतं.

कामकाज चालतं तरी कसं?

साहजिकच आपण एक बिटकॉइन विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला संगणकीय यंत्रणाच वापरावी लागेल. जसं आपण नोटा आणि नाणी आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा पर्समध्ये बाळगतो; त्याच धर्तीवर आपण हे आभासी चलन आभासी पाकिटात बाळगतो. हे आभासी चलन म्हणजे संगणकीय यंत्रणांमधलं ‘वॉलेट’ असतं. जसा आपण आपला इ-मेल आयडी तयार करून आपलं इंटरनेटवरचं आभासी अस्तित्व निर्माण करतो, तसंच आपलं वॉलेट ही आपली आभासी चलनाच्या दुनियेतली ओळख असते. आपले आभासी पैसे याच वॉलेटमध्ये असतात. असं प्रत्येकाचं स्वतंत्र वॉलेट असतं आणि आपण दुसऱ्याला आभासी पैसे पाठवले तर त्या माणसाच्या वॉलेटच्या शिल्लक रकमेत भर पडते. बिटकॉइनवर जर कुठल्या सरकारचं नियंत्रण नसेल तर त्याचं कामकाज चालतं तरी कसं? यासाठी बिटकॉइनच्या निर्मात्यांनी त्याचं कामकाज बिटकॉइनचा वापर करणाऱ्या लोकांनीच करावं यासाठीची व्यवस्था केलेली आहे. ही व्यवस्था बिटकॉइनसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये असते. त्यानुसार कुठले व्यवहार योग्य समजावेत, कुठले व्यवहार घोटाळ्यांसारखे समजावेत, नव्या बिटकॉइन किती दरानं तयार व्हाव्यात, या सगळ्यांसाठीचे नियम असतात. साहजिकच कुठल्याही बाह्य नियंत्रणाविनाच बिटकॉइनचं काम व्यवस्थितपणे सुरू राहू शकतं. किंबहुना सरकारी व्यवस्था, चलन आणि मध्यवर्ती बॅंका यांच्यावरचा विश्वास हे सगळं उडून गेल्यामुळेच बिटकॉइनची निर्मिती झाली. साहजिकच कुठल्याही सरकारची किंवा मध्यवर्ती बॅंकेची ढवळाढवळ बिटकॉइनचं सॉफ्टवेअर चालवून घेत नाही.

हेही वाचा: कामगार संहिता : भविष्यवेधी पाऊल

सरकारसमोरची डोकेदुखी

बिटकॉइनच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सरकार आणि मध्यवर्ती बॅंका यांच्यासमोरची डोकेदुखी शिगेला जाऊन पोहोचली आहे. मुळात नोटाबंदीनंतर भारतामधला काळा पैसा मोठ्या प्रमाणावर बिटकॉइनमध्ये गुंतवला गेला, असं मानलं जातं. याच्या जोडीला जर लोकांनी आपले पैसे अशा नियंत्रणविरहित चलनामध्ये गुंतवून ठेवले तर अर्थव्यवस्थेमधले खेळते पैसे आटतील. तसंच महागाई, बेकारी अशा प्रश्नांवर उपाय म्हणून रिझर्व्ह बॅंकेनं केलेल्या उपाययोजना कितपत उपयुक्त ठरतील, अशा शंका येतात. कारण अर्थव्यवस्थेमधले पैसे मोठ्या प्रमाणावर बिटकॉइनमध्ये असतील तर रिझर्व्ह बॅंकेनं व्याजदर कमी केले म्हणून कर्जं घेऊन उद्योग करायला कोण तयार होईल? त्यापेक्षा बिटकॉइनमधल्या गुंतवणुकीवर त्यांना खूप जास्त नफा मिळत राहील.

अशा कारणांसाठीच भारतामध्ये बिटकॉइनवर बंदी घालण्यात आली आहे. अनेक तज्ज्ञांनी मात्र भारताचं हे पाऊल चुकीचं असल्याचा इशारा दिला आहे. बिटकॉइनवर बंदी न घालतासुद्धा लोकांनी पारंपरिक चलनांचाच वापर करावा, यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा व्हायला हव्यात, असं त्यांचं म्हणणं आहे. याला उत्तर म्हणून भारतासह अनेक देशांनी आपली स्वत:ची ‘क्रिप्टोकरन्सी’ सुरू करायचं ठरवलं आहे. असं झालं तरी बिटकॉइन आणि अशा चलनामध्ये मूलभूत फरक असेल; कारण हे नवं चलन सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेच्या मालकीचं असल्यामुळे ते रुपयाचं निव्वळ संगणकीय रूप ठरेल.

एकूण काय, तर संपूर्णपणे मुक्त असलेल्या बिटकॉइननं जगभरात सनसनाटी निर्माण केलेली आहे. अर्थव्यवस्था, तिचं व्यवस्थापन, मध्यवर्ती बॅंका, चलन आणि त्याचं नियमन अशा मूलभूत संकल्पनांना मुळापासून हादरवण्याची किमया बिटकॉइननं केली आहे. इंटरनेट हे मुक्त माध्यम असल्यामुळे भौगोलिक सीमा ओलांडून इंटरनेटनं निरनिराळ्या प्रकारची क्रांती घडवून आणली आहे. बिटकॉइन हा तिचा आधुनिक आविष्कारच आहे. फायदे आणि तोटे अशा दोन्ही अंगांनी बिटकॉइनकडे बघितलं जातं. आपण कुठल्या नजरेतून त्याकडे बघतो, यावर सगळं अवलंबून आहे. काही जण बिटकॉइनला आधुनिक काळामधला वेडपटपणा म्हणतात; तर एखाद्या वर्षातच एका बिटकॉइनची किंमत कोटी रुपयांच्या घरात जाणार, असं काही जण छातीठोकपणे म्हणतात.

हेही वाचा: शहाणी गुंतवणूक : माझ्या 'मनी' चे प्रश्न!

ब्लॉकचेन तंत्रज्ञान क्रांतिकारी

‘ब्लॉकचेन’ हे अत्यंत क्रांतिकारी स्वरूपाचं तंत्रज्ञान म्हणून ओळखलं जातं. बिटकॉईनसारख्या आभासी चलनाचं कामकाज ब्लॉकचेन तंत्रज्ञानाशिवाय चालूच शकत नाही. कुठलीही माहिती एके ठिकाणी साठवून ठेवण्याऐवजी ती अनेक ठिकाणी विभागून ठेवायची; पण हे सूत्रबद्धरीत्या करायचं अशी या तंत्रज्ञानामधी महत्त्वाची संकल्पना आहे. जणू आपल्याकडे ठेवल्या जाणाऱ्या हिशेबांची नोंद अनेक ठिकाणी विभागून करायची अशा प्रकारे हे तंत्रज्ञान चालतं. या नोंदी जगभरातल्या हजारो किंवा लाखो संगणकांवर केल्या जातात. यामधला कळीचा मुद्दा म्हणजे या हिशेबाच्या नोंदींमध्ये नंतर फेरफार करता येत नाहीत. म्हणजेच एकदा एखाद्या व्यवहाराची किंवा हिशेबाची नोंद झाली की त्यानंतर त्यात कुणालाही अनधिकृतपणे बदल करणं अशक्य होऊन बसतं. आपोआपच ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाबद्दल विश्वासार्हता निर्माण होते. म्हणूनच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचं वर्णन अनेकदा ‘डिजिटल व्यवहारांची नोंद असलेला माहितीचा सार्वजनिक साठा’ अशा शब्दांमध्ये केलं जातं. सातोशी नाकामोटो नावाच्या माणसानं किंवा हे टोपणनाव धारण केलेल्या लोकांच्या एका समूहानं ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे. निनावी असलेल्या; पण खात्रीशीर प्रकारच्या माहितीच्या नोंदी जगभर विभागून टाकणं यामुळे शक्य झालं आहे. बिटकॉईन आणि ब्लॉकचेन यांची निर्मिती साधारणपणे एकाच वेळी झाली असं आपण म्हणू शकतो. याचं कारण म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाशिवाय बिटकॉईन हे चलन अस्तित्वात येणंच शक्य नव्हतं.

आता तर बिटकॉइनखेरीस इतरही शेकडो आभासी चलने अस्तित्वात आली आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. रिझर्व्ह बँकेनेही भारताचे अधिकृत आभासी चलन लवकरच जारी करण्याची घोषणा केली आहे. हा सगळा प्रकार म्हणूनच अतिशय रंजक आणि महत्त्वाचा आहे!

हेही वाचा: ‘अर्थ’भान ते ‘समाज’भान

ब्लॉकचेन तंत्रज्ञान नसतं तर...

बिटकॉईन हे आभासी चलन आहे. म्हणजेच आपल्या नेहमीच्या व्यवहारातल्या नाणी आणि नोटा यांच्यासारख्या चलनासारखं आपल्याला बिटकॉईन हे चलन दिसत नाही; हाताळता येत नाही. अर्थात बिटकॉईनची नाणी तयार करण्याची सुविधा नंतर उपलब्ध करून देण्यात आली होती; पण आपण त्या मुद्दयाकडे इथे जरा दुर्लक्ष करू. आता बिटकॉईन हे चलन जर आभासी असेल तर त्यावर लोकांचा विश्वास कसा बसणार? हे चलन सुरक्षित आहे का नाही हे कसं समजणार? या चलनाचा वापर व्यवहारात करत असताना त्याविषयीची खात्री कोण देणार? उदाहरणार्थ, आपल्याकडे असलेल्या कागदी नोटांवर रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांची सही असते. कागदी नोट हे अधिकृत चलन असल्याचा तो पुरावा असतो. उद्या काही अडचण निर्माण झाली तर आपण रिझर्व्ह बॅंकेकडे किंवा रिझर्व्ह बॅंकेकडून संबंधित अधिकार मिळवलेल्या आपल्या बॅंकेकडे जाऊन त्यातून मार्ग काढू शकतो. बिटकॉईन हे आभासी चलन असल्यामुळे आणि कुठल्याही सरकारचं किंवा मध्यवर्ती बॅंकेचं त्यावर नियंत्रण नसल्यामुळे तिथे विश्वासार्हतेचे किंवा सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले तर काय करायचं? त्यात कुणाला तरी मध्यस्थी करावी लागणार. पण मुळात बिटकॉईनचा कुणी ‘मालक’ किंवा ‘कर्ता’ नसल्यामुळे ही जबाबदारी कुणावर टाकायची? तसंच अशा माणसावर किंवा संस्थेवर बिटकॉईन वापरणारे विश्वास कसा ठेवतील? म्हणूनच ही कटकट टाळण्यासाठी मुळातच बिटकॉईन हे चलन विश्वासार्ह असावं आणि त्या चलनाच्या कामकाजातच ही विश्वासार्हता रुजवलेली असावी, अशा हेतूनं ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करायचं ठरलं.

(लेखक आर्थिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :Bitcoin
go to top