पैसे छापून देणारे यंत्र मिळाले तर...? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैसे छापून देणारे यंत्र मिळाले तर...?}
पैसे छापून देणारे यंत्र मिळाले तर...?

पैसे छापून देणारे यंत्र मिळाले तर...?

खरोखरच जर आपल्याला कोणी पैसे छापून देणारे यंत्र विकत देणार असेल तर... अरे व्वा! किती मज्जा येईल ना? असे होणार असेल तर हे यंत्र घेण्यासाठी अनेक जण आनंदाने उड्या मारत तयार होतील. विकत घ्यावे लागणार असले तरी पैसेच छापून देणार असल्याने किमतीचा प्रश्न उरतो कोठे?

वॉरेन बफे म्हणतात, Price is what you pay; value is what you get.

एखाद्या व्यवहारात खरेदीसाठी आपण देतो ती किंमत असते. मात्र, मोबदल्यात आपल्याला किमतीच्या तुलनेत किती फायदा होत आहे, हे त्याचे खरे मूल्य असते. पैसे छापून देणारे यंत्र मिळाले तर काही जण विचार करतील, की कितीही महाग असले तरी हे यंत्र पैसेच छापून देणार असल्याने किमतीपेक्षा अशा संधीचा फायदा घेणे महत्त्वाचे आहे. पण अशा गडबडीने केलेल्या व्यवहारात मोठे नुकसान होऊ शकते. कारण व्यवहार करण्याआधी असे यंत्र किती काळ आणि कशा पद्धतीने काम करू शकते, हे पण लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. समजा, या यंत्राची किंमत १० लाख रुपये आहे, अशी कल्पना करा. हे मशीन १० वर्षे काम करू शकते आणि दर महिन्याला १० हजार रुपये छापून देऊ शकते. अरेच्या!... म्हणजे वर्षाला केवळ १ लाख २० हजार असे दहा वर्ष म्हणजेच १० वर्षांत १२ लाख रुपये मिळणार. १० लाख रुपयांचे यंत्र घेऊन केवळ २ लाख रुपये वाढून मिळणार आहेत आणि ते सुद्धा १० वर्षांत! हा काही फार मोठ्या फायद्याचा सौदा नाही.

समजा हेच यंत्र २ लाख रुपयांमध्ये मिळाले, तर मात्र दरमहा १० हजार म्हणजे २० महिन्यांतच आपली मुद्दल आपल्याला परत मिळून पुढील अनेक वर्षे उत्तम परतावा मिळू शकेल. अशा प्रकारे भविष्यात मिळणारी रक्कम आणि यंत्र विकत घेण्यासाठी लागणाऱ्या किमतीचा विचार केल्याने सौदा फायद्याचा का तोट्याचा, हे लक्षात येऊ शकते.

हेही वाचा: आळंदीतील अपरिचित धार्मिक स्थळे आणि पर्यटन केंद्र

शेअर बाजारातील विचार

शेअर बाजारात व्यवहार करताना देखील अशा प्रकारे विचार करणे योग्य ठरू शकेल. पीटर लिंच म्हणतात, शेअर मार्केटमधील शेअर म्हणजे लॉटरीचे तिकीट नसते.
शेअर मार्केटमधील प्रत्येक शेअरमागे एक कंपनी असते. अनेक प्रकारच्या कंपन्यांचे शेअर बाजारात आपण खरेदी करू शकतो. आता समजा प्रत्येक कंपनी म्हणजे एक यंत्र आहे आणि या कंपनीला होणारा फायदा म्हणजे यंत्रातून बाहेर येणारा पैसा आहे. ज्याप्रमाणे कितीही किंमत मोजून अगदी पैसा छापून देणारे यंत्र विकत घेणे देखील नुकसानदायक ठरू शकते, त्याचप्रमाणे कोणत्याही कंपनीचा शेअर कोणत्याही किमतीला केवळ भावनेच्या भरात खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. यामुळे कोणतीही कंपनी ही तिने स्वतः केलेल्या गुंतवणुकीवर सध्या किती परतावा मिळवत आहे; तसेच भविष्यात उत्पनामध्ये किंवा मिळकतीमध्ये वाढ किंवा सातत्य ठेवण्यासाठी कंपनीकडे कोणती वैशिष्ठ्ये आहेत, यावरून त्या कंपनीच्या शेअरची खरेदी करण्याच्या विचार करणे फायदेशीर ठरू शकते.


In the short run, the market is like a voting machine, but in the long run, it's like a weighing machine.


गुंतवणूक गुरु बेंजामिन ग्रॅहम म्हणतात, की अल्पावधीमध्ये कोणत्याही कंपनीच्या शेअरचे भाव हे भावनाप्रधान होऊन मोठ्या प्रमाणात चढ-उतार दर्शवू शकतात. मात्र, दीर्घावधीमध्ये कंपनीच्या गुणवत्तेवर आणि कंपनीने केलेल्या आर्थिक प्रगतीचा बाजार वेध घेत असतो. एखादी कंपनी कर्जबाजारी होऊन त्या कंपनीला दीर्घकाळ व्यवसायातून नुकसानच होत राहिले, तर त्या कंपनीच्या शेअरमध्ये देखील घसरण होऊन गुंतवणूकदारांचे नुकसान झालेले दिसते.

हेही वाचा: आपली आर्थिक सुरक्षा आपल्याच हाती!

कोणत्या कंपन्या निवडाल?

वॉरेन बफे यांच्या सूत्रानुसार, शेअर बाजारात कोणत्याही कंपनीचा एक शेअर खरेदी करतानादेखील आपण ती कंपनीच विकत घेत आहोत, अशा पद्धतीने विचार करणे योग्य ठरते. ज्या कंपन्यांवर कर्जाचे प्रमाण कमी आहे; तसेच ज्या कंपन्या सातत्याने धंद्यातून उत्तम परतावा मिळवत आहेत आणि ज्या भविष्यात देखील प्रगती करणे अपेक्षित आहे, अशा उत्तम संचालकांकडून संचलित होत असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घावधीसाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.


भारतीय शेअर बाजारात देखील गेल्या १० वर्षांचा विचार करता सहज समजू शकणारा व्यवसाय करणाऱ्या; तसेच कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन धंद्यात उत्तम परतावा मिळविणाऱ्या अनेक कंपन्यांच्या शेअरनी गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. अशा कंपन्यांच्या यादीत फेव्हीकॉलची विक्री करणारी पिडिलाइट इंडस्ट्रीज, पेंट क्षेत्रातील बर्जर पेंटस, पादत्राणांच्या क्षेत्रातील रिलॅक्सो फूट वेअर अशा अनेक कंपन्यांची नावे याठिकाणी नमूद करता येतील.

हेही वाचा: गोमूत्रातील घटकांचे प्रमाण विविध स्थितीत वेगवेगळे; संशोधनाचा निष्कर्ष

खरेदीची संधी कधी साधावी?

धंद्यातून उत्तम परतावा मिळवून मिळकतीमधील लक्षणीय हिस्सा पुन्हा धंद्यात गुंतवून धंद्याची उत्तम वाढ करू शकणाऱ्या कंपन्यांना वॉरेन बफे ‘कंपाउंडिंग मशिन्स’ म्हणतात. अशा प्रकारे ‘कंपाउंडिंग मशिन्स’ किंवा जणू पैसा वाढविणाऱ्या यंत्रासारख्या काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदीची संधी कधी साधायची?

गुंतवणूक गुरु बेंजामिन ग्रॅहम म्हणतात त्याप्रमाणे एकूण शेअर बाजार म्हणजे ‘मिस्टर मार्केट’ आहे. ‘मिस्टर मार्केट’ हे अत्यंत भावनाप्रधान असते. तेजीच्या काळात बाजारात व्यवहार करणारे अनेक जण हुरळून जाऊन चढ्या भावाला व्यवहार करीत असतात. तेजीच्या काळात ‘मिस्टर मार्केट’ हे आपल्याला कंपनीच्या मिळकतीच्या क्षमतेपेक्षा देखील खूप जास्त भाव सांगत असते; तसेच बाजारात जेव्हा मंदीची लाट असते, तेव्हा बाजारात भावनाप्रधान होऊन लोक विक्रीचे व्यवहार करीत असल्याने कंपनीच्या गुणवत्तेपेक्षा आणि मिळकतीच्या क्षमतेपेक्षा देखील कंपनीच्या शेअरचे भाव घसरतात. अशा वेळेस उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदीची नामी संधी मिळते. म्हणूनच वॉरेन बफे यांच्या तत्वानुसार, तेजीच्या काळात जेव्हा भाव कंपनीच्या क्षमतेपेक्षा खूप वाढलेले असून देखील सर्वजण जेव्हा केवळ बाजारातील तेजीमुळे लोभी झालेले असतात, तेव्हा आपण सावध झाले पाहिजे आणि मंदीच्या काळात कंपनीच्या क्षमतेपेक्षा शेअरचे भाव जेव्हा घसरलेले असतात; तसेच बाजारातील पडझडीमुळे सर्वजण भयभीत असतात, तेव्हा आपण खरेदीची संधी साधली पाहिजे.


२०२० मध्ये कोरोनाच्या भीतीपोटी बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. मार्च २०२० मध्ये एकूण शेअर बाजार ‘व्हॅल्युएशन’नुसार पूर्वीपेक्षा स्वस्त झाला होता. अशा वेळेस उत्तम व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदीची संधी मिळाली होती.

तात्पुरते संकट ही संधी

एखाद्या उत्तम व्यवसायावर आलेले तात्पुरते संकट देखील गुंतवणुकीची मोठी संधी निर्माण करते. कोरोना महासाथीच्या काळात झालेल्या पडझडीत ट्रॅव्हल-टुरिझम क्षेत्राशी निगडित इंडियन रेल्वे टुरिझम अँड केटरिंग कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली. कोरोनामुळे पर्यटन बंद असल्याने या शेअरचा भाव रु. १९७७ वरून घसरून रु. ७७४ झाला होता. कोरोनाचे संकट हे कायमस्वरूपी टिकणारे नव्हते. अशा वेळेस ‘मिस्टर मार्केट’ने संधीच दिली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये या कंपनीच्या शेअरचा भाव रु. ५५०० झाला.
अशा प्रकारे संधी ओळखून गुंतवणूक गुरु बेंजामिन ग्रॅहम यांच्या ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ तत्वानुसार उत्तम व्यवसाय करणाऱ्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये कंपनीच्या आगामी काळात होणारी मिळकत; तसेच व्यवसायवृद्धीच्या क्षमेतेपेक्षा तुलनेने कमी वाढ लक्षात घेऊन देखील जर उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे शेअरचे भाव स्वस्त किमतीस मिळत असतील, तर अशा ‘कंपाउंडिंग मशिन्स’ची खरेदी करणे दीर्घावधीमध्ये फायदेशीर ठरू शकते. संधी लक्षात घेऊन अशा विविध १० ते २० कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घावधीसाठी टप्प्याटप्प्याने खरेदी केल्याने काही कंपन्यांच्या बाबतीत अंदाज चुकला तरी एकंदरीत धोक्याचे प्रमाण कमी होते.

एकंदरीत ज्या प्रमाणे पैसे छापणारे यंत्र देखील कोणत्याही किमतीला घेण्याऐवजी योग्य किमतीला खरेदी करणे योग्य ठरते; त्याच प्रमाणे उत्तम व्यवसाय करणाऱ्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील योग्य संधी ओळखून दीर्घावधीसाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :money
go to top