
ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...
औद्योगिकीकरणाबाबत वेगाने प्रगती करणाऱ्या गुजरातमध्ये तब्बल ९२० चौरस किलोमीटर क्षेत्रावर अवाढव्य अशी ढोलेरा (ग्रीनफील्ड प्लग अँड प्ले) इंडस्ट्रियल स्मार्टसिटी उभारली जात आहे. काय आहेत तिची वैशिष्ट्ये...
९२० चौरस किलोमीटर क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या ढोलेरा (Dholera) इंडस्ट्रियल सिटीमध्ये उद्योग उभारण्याची पर्यावरण संमती आधीच एकगठ्ठा घेण्यात आली आहे. येथे जगातील उत्तम पायाभूत व नागरी सुविधा असून त्या रस्त्याखाली विशेष डक्टमध्ये असल्याने भविष्यात रस्ते खोदावे लागणार नाहीत. ही सर्व व्यवस्था भारतात कोठेही नाही, भविष्यात हे शहर जगाचे उत्पादन आणि व्यापारी हब होईल, असे सांगितले जाते. (Dholera New Huge Industrial Hub in Gujarat)
औद्योगिकीकरणाबाबत वेगाने प्रगती करणाऱ्या गुजरातमध्ये (Gujarat) तब्बल ९२० चौरस किलोमीटर क्षेत्रावर अवाढव्य अशी ढोलेरा (ग्रीनफील्ड प्लग अँड प्ले) इंडस्ट्रियल स्मार्टसिटी उभारली जात आहे. ही चंडीगड किंवा नवी मुंबईसारखी (Navi Mumbai) प्लान्ड सिटी आहे. सध्या तिच्या २२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर सुसज्ज पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या असून त्यास अंदाजे तीन हजार कोटी रुपये खर्च येईल. त्यावरून संपूर्ण प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाज बांधता येतो.
आता तेथे उद्योगधंदे (industries) येण्यास सुरुवात झाली आहे. ३० ते ४० वर्षांनी जेव्हा-केव्हा या संपूर्ण ९२० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रावरील उद्योगधंदे सुरू होतील, तेव्हा येथील लोकसंख्या किमान २० लाख असेल व त्यातील पंचाहत्तर टक्के लोक येथेच नोकरी करीत असतील, असा अंदाज आहे.
खरेतर ही एमआयडीसीप्रमाणे फक्त औद्योगिक वसाहत नसेल, तर नेहमीसारखे शहरच असेल. यात उद्योगांबरोबरच निवासी वसाहती, शाळा, रुग्णालये, बससेवा आदी सर्व बाबी असतील. फक्त हे शहर उभारताना उद्योगांना प्राधान्य देऊन उद्योगांसाठी शेजारील सर्व सुविधा उभारण्यात येणार आहेत.
अर्थात ही ग्रीनफील्ड सिटी, म्हणजेच मोकळ्या माळरानावर शून्यातून उभारलेली आहे; मात्र ती प्लग अँड प्ले इंडस्ट्रीयल सिटी असेल, म्हणजेच येथे आपल्या गरजेनुसार उद्योगधंद्याची इमारत उभारणाऱ्या उद्योजकाला नंतर पायाभूत व अन्य सोयीसुविधांसाठी वेगळी धडपड करावी लागणार नाही. त्या सर्व सुविधांच्या केबल-वाहिन्या त्या इमारतीच्या बाहेर सज्ज असून त्यांना फक्त आपले कनेक्शन जोडले की उद्योग तत्काळ सुरू होईल.
हे देखिल वाचा-
येथे प्रदूषणकारी उद्योगांना परवानगी नाही, डिफेन्स-एरोस्पेस, फार्मा व बायोटेक्नॉलॉजी, सौरऊर्जानिर्मिती, वाहननिर्मिती व त्यांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक्स, अॅग्रो व फूड प्रोसेसिंग, हेवी इंजिनिअरिंग व आयटी हे उद्योग येथे येऊ शकतील. येणाऱ्या उद्योगांना प्रमुख फायदा म्हणजे जर ते प्रदूषणकारी नसतील, तर परवानग्या घेण्याची कटकट त्यांच्यामागे नाही. या संपूर्ण ९२० चौरस किलोमीटर क्षेत्रात उद्योग उभारण्यासाठी पर्यावरणविषयक व अन्य एकगठ्ठा परवानग्या सरसकट आधीच घेण्यात आल्या आहेत. (हे देशात प्रथमच झाल्याचा त्यांचा दावा आहे) त्यामुळे येथे येण्यासाठी अर्ज करणाऱ्या उद्योगांना फक्त औपचारिक संमती घ्यावी लागेल व ती फारतर तीन महिन्यांत मिळेल. त्यामुळे पर्यावरणविषयक संमतीसाठी लागणारे एक वर्ष वाचेल.
९२० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे एवढे अवाढव्य सुनियोजित औद्योगिक शहर भारतात कोठेही नाही. चीन, युरोप, अमेरिका येथे अशी मोठी शहरे आहेत; मात्र त्यांच्या निर्मितीमधील आणि व्यवस्थेतील तोटे ढोलेरामध्ये वगळून उलट साऱ्या जगातील सर्वोत्तम व्यवस्था येथे करण्यात आल्या आहेत.
१. चीनमध्ये अनेक ठिकाणी अवाढव्य औद्योगिक शहरांमध्ये एकाच वेळी प्रचंड निवासी व औद्योगिक सुविधा उभारण्यात आल्या; पण त्या बहुतांश रिकाम्या असल्याने त्यांना घोस्ट सिटी म्हटले जाते. ढोलेरामध्ये मात्र टप्प्याटप्प्याने प्रथम उद्योग, मग निवासी घरे व मग अन्य सोयीसुविधा उभारल्या जातील. उद्योग व घरे वेगवेगळ्या क्षेत्रात असली, तरी कामासाठी फारतर एक किलोमीटरच जावे लागेल, अशी कल्पना आहे.
२. सिंगापूरप्रमाणे पाण्याचे नियोजन येथे केले जाईल. आलेल्या पाण्यापैकी ९५ टक्के पाण्याचा पुनर्वापर केला जाईल. गरज पडलीच तर राखीव साठ्यासाठी पावसाच्या पाण्याने भरलेला शंभर मीटर रुंद व सहा किमी लांबीचा कालवा येथे तयार आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगही सर्वत्र असेलच.
३. दुबईप्रमाणे समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा ५० एमएलडीचा प्रकल्प सौरऊर्जेवर चालेल.
४. दूषित पाणी शुद्धीकरण प्रकल्प व ६० एमएलडीचे सुसज्ज सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प असतील.
५. सीआरझेडमुळे मोकळ्या ठेवाव्या लागणाऱ्या साधारण पाचशे चौरस किलोमीटर जागेवर साडेचार हजार मेगावॉट ऊर्जानिर्मिती करणारे अवाढव्य सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. त्याच्या सौरपट्ट्या सूर्यफुलाप्रमाणे सूर्याच्या दिशेला वळतील, अशी व्यवस्था आहे.
६. युरोप-अमेरिकेतील अत्याधुनिक शहरांप्रमाणे पदपथाखाली व रस्त्याखाली पायाभूत सोयींसाठी उदा. केबल, इंटरनेट, गॅस, वीज, पर्जन्यवाहिन्या, जलवाहिन्या, सांडपाणीवाहिन्या असतील. मात्र त्यांच्या दुरुस्तीसाठी रस्ते खोदले जाणार नाहीत, रस्त्याच्या कडेला डक्ट असून तेथून उतरून दुरुस्ती केली जाईल. मुळात यापैकी कोणत्याही वाहिनीतून कोठेही गळती झाली, तरी भूमिगत सेन्सरमुळे कमांड अँड कंट्रोल रूममध्ये ती तत्काळ कळेल, अशीही व्यवस्था आहे. सीसीटीव्हीचे जाळे व कमांड-कंट्रोल रूममधील स्क्रीन याद्वारे शहरात सर्वत्र लक्ष ठेवले जाईल.
७. रुंद रस्त्यांच्या कडेला पदपथ व सायकल ट्रॅक असून रस्त्यांच्या मधोमध ठेवलेल्या जागेत भविष्यात मोनो-मेट्रोचे पिलरही उभारता येतील.
८. अमेरिकी औद्योगिक शहरात कर्मचाऱ्यांना प्रवासाला मोठा वेळ लागतो. येथे उद्योगांच्या शेजारीच निवासी वसाहती असल्याने फारतर एक किलोमीटर अंतराचाच प्रवास असेल, अशी कल्पना आहे. शहरात दर चारशे ते आठशे मीटरवर बाग व कम्युनिटी पार्क केले जाईल.
हे देखिल वाचा-
चौपदरी वाहतूक
चौपदरी दळणवळण व्यवस्थेचा फायदा येथे येणाऱ्या उद्योगांना होईल. सहा महिन्यांत तयार होणारा येथील एक्स्प्रेसवे राज्य महामार्ग मुंबई-अहमदाबाद-दिल्ली महामार्गाला जोडला जाईल. त्याने हे ११० किमीचे अंतर एका तासात कापले जाईल, सध्या याला दोन तास लागतात; तर रेल्वेमार्गानेही ढोलेरा देशाशी जोडला जाईल. पंधरा किमी अंतरावर ढोलेरामध्ये चार किमी लांबीच्या दोन धावपट्ट्या असलेला विमानतळ दोन-तीन वर्षांत सज्ज होईल, तर जलवाहतुकीसाठी ६५ किमी लांब अंतरावर भावनगर बंदर उभारले जात आहे.
मुख्यतः दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडोरच्या व्यवस्थेचा लाभ उठवण्यासाठी ढोलेरा सिटी उभारण्यात आल्याचे ढोलेरा इंडस्ट्रियल सिटी डेव्ह. लि.चे एमडी हरीत शुक्ला यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
‘‘गुजरातचा मोठा महसूल भविष्यात याच शहरातून येईल. ढोलेरा म्हणजे उद्याचे सिंगापूर किंवा दुबई असेल. देशात भविष्यात उभ्या राहणाऱ्या प्लान्ड सिटीसाठी ढोलेरा हे रोल मॉडेल होईल, अशी आमची व्हीजन आहे.
- दिलीप ब्रह्मभट्ट, सरव्यवस्थापक (वाणिज्य)