Finance News- स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी करा कागदपत्रांचे नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक नियोजनासाठी जपा कागदपत्रे}

स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी करा कागदपत्रांचे नियोजन

सुधाकर कुलकर्णी

(लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर-सीएफपी आहेत.)
sbkulkarni.pune@gmail.com

आपण विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार करीत असतो. काहीजणांचे अशा व्यवहारांचे प्रमाण अधिक असते, तर काहींचे कमी असते. मात्र, अशा व्यवहारांची कागदपत्रे योग्य पद्धतीने जतन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. गरजेच्या वेळी महत्त्वाची कागदपत्रे सहजगत्या उपलब्ध होतील, अशा रीतीने ठेवणे आवश्यक आहे. त्याचे काय महत्त्व आहे. याविषयी मार्गदर्शन...

आ पण आपल्या गरजेनुसार विविध आर्थिक व्यवहार (Financial Transactions) करीत असतो. यातून एका किंवा अधिक बँकेतील व्यवहार (बचत खाते, ठेव खाते, कर्ज, लॉकर आदी), पीपीएफ, शेअरमधील गुंतवणूक त्यासाठीचे डी-मॅट खाते (Demat), ब्रोकर खाते, आयुर्विमा पॉलिसी (Insurance Policy) , आरोग्य विमा, वाहन विमा, एनपीएस खाते, प्रसंगी मित्राकडून अथवा नातेवाइकाकडून घेतलेली हातउसनी रक्कम, तसेच त्यांना दिलेली रक्कम, गरजेनुसार भरलेली अनामत रक्कम, खासगी कंपन्यांमधील बाँड, डिबेंचर, ठेवी यातील गुंतवणूक (Investment), विविध म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, सोने-चांदी यामधील गुंतवणुकीच्या पावत्या, स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, व्यावसायिक येणी व देणी, प्राप्तिकरासबंधीची कागदपत्रे अशी अनेक कागदपत्रे नियमित जमा होत असतात. (Financial Documents Preservation Necessary for family Safety)

यातील वेगवेगळी कागदपत्रे आपल्याला वेळोवेळी लागत असतात. मात्र, बऱ्याचदा नेमकी हवी असलेली कागदपत्रे आपल्याला वेळेत सापडत नाहीत. काहीवेळा ती गहाळही झालेली असतात किंवा फाटल्याने अथवा भिजल्याने निरुपयोगी झाल्याचे लक्षात येते. अशा वेळी नव्याने ही कागदपत्रे मिळविणे वेळखाऊ, खर्चिक तसेच तापदायक होते.

वर्गीकरणानुसार कागदपत्रे लावा :

सर्व कागदपत्रांचे सुयोग्य नियोजन करणे गरजेचे असते; जेणेकरून हवी ती कागदपत्रे गरजेच्यावेळी सहजगत्या मिळू शकतील. यासाठी आपल्या आर्थिक व्यवहारांचे वर्गीकरण करून त्यानुसार एक वेगळी फाईल करून तारखेनुसार कागदपत्रे फाईलमधे लावून ठेवावीत. अशा प्रत्येक फाईलचे एका ठराविक कालावधीनंतर अवलोकन करून अनावश्यक कागदपत्रे काढून त्याची विल्हेवाट लावावी. यामुळे कागदपत्रांची गर्दी होणार नाही आणि आवश्यक असणारी कागदपत्रे त्वरित मिळतील. नको असेलल्या कागदपत्रांची विल्हेवाट योग्य खबरदारी घ्या. अनवधानाने आवश्यक कागदपत्रे फाडली जाणार नाहीत, याची दक्षता घ्या.

डिजिटल साठवणूक :

अगदी महत्त्वाची असणारी कागदपत्रे स्कॅन करून डिजिटली पीसी किंवा लॅपटॉपमध्ये फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा. तसेच आपल्याच ई-मेलवर पाठवून ठेवा म्हणजे कुठेही व कधीही आपल्याला आवश्यक ते पेपर्स सहजगत्या उपलब्ध असतील. (झेरॉक्स करण्याने केवळ पेपर्स वाढतात). याशिवाय कोणती महत्त्वाची कागदपत्रे कोठे ठेवली आहेत, हे आपल्या व्यतिरिक्त कुटुंबातील एक-दोन जणांना सांगून ठेवा.

मृत्युपत्राची कुटुंबीयांना कल्पना द्या :

आजकाल बरेचजण आपले मृत्युपत्र करतात, मात्र ते नेमके कोठे ठेवले आहे, याची माहिती घरच्यांना नसल्यास त्याचा उद्देश सफल होत नाही. त्यासाठी आपण मृत्युपत्र केले असल्यास त्याबाबत आपल्या कुटुंबीयांना कल्पना द्या. त्यांना मृत्युपत्रातील तपशील सांगणे गरजेचे नाही. मात्र, मृत्युपत्र कोठे ठेवले आहे व त्यासाठी साक्षीदार कोण आहेत, हे सांगणे गरजेचे आहे. आता मृत्युपत्र आपल्या डीजी लॉकरमध्ये देखील डिजिटल स्वरुपात ठेवता येते.

हेही वाचा: क्रिप्टोकरन्सी....इश्क है पर रिस्क भी है....

कागदपत्र व्यवस्थित ठेवली नसल्यास येणाऱ्या अडचणी :

१) बँकेतील ठेव पावती (डिपॉझिट रिसीट) गहाळ झाल्यास आणि आपल्याला त्या पावतीचे पैसे मुदतीपूर्व किवा मुदतीनंतर घ्यायचे असतील तर बिनापावती रक्कम मिळत नाही. त्यासाठी आपल्याला स्टॅम्प पेपरवर हमीपत्र देऊन डुप्लिकेट पावती घ्यावी लागते.

२) आपल्या बँक लॉकरची किल्ली हरवल्यास आधी बँकेस त्याबाबत कळवावे लागते. नंतर लॉकर कंपनीचा टेक्निशियन बोलविला जातो. त्यावेळी आपल्या उपस्थितीत आपला लॉकर ब्रेक-ओपन केला जाऊन त्यास नवे कुलूप लावले जाते व नवी किल्ली दिली जाते. यासाठी सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागतो; शिवाय सात ते आठ हजार इतका खर्च येतो.

३) आपण डीपी व्यवहार ऑन करत नसाल आणि आपले डीआय स्लीप बुक गहाळ झाले असेल तर आपल्याला शेअर विकणे शक्य होत नाही. त्यासाठी नव्याने डीआय स्लीप बुकची मागणी करावी लागते व नवीन डीआय स्लीप बुक मिळण्यास ४-५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. या काळात शेअरचे भाव पडले तर आपले नुकसान होते.

४) आपली मेडिक्लेम पॉलिसी गहाळ झाली असेल किंवा घरातील इतरांना सापडत नसेल व आपणही सांगण्याच्या अवस्थेत नसाल तर आणि नेमके त्याच वेळी वैद्यकीय उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले तर कॅशलेस सुविधेचा फायदा घेता येत नाही. ऐनवेळी पैसे उभे करावे लागतात व हे सहजासहजी शक्य होतेच असे नाही.

५) आयुर्विमा अर्थात लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली कुटुंबीयांना माहित नसेल किंवा पॉलिसी गहाळ झाली असेल आणि पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर वारसांकडून ‘डेथ क्लेम’ केला जाणार नाही. कालांतराने वारसांना पॉलिसी असल्याचे समजले तरी क्लेम मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

६) वाहन विमा किंवा मोटार इन्शुरन्स किंवा अन्य कोणत्याही इन्शुरन्सचा क्लेम मागण्यासाठी संबंधित पॉलिसीची प्रत सोबत जोडणे आवश्यक असते. म्हणूनच सर्व इन्शुरन्स पॉलिसींच्या मूळ प्रती व सॉफ्ट कॉपी सहज उपलब्ध होतील, अशा ठेवणे आवश्यक असते.

७) कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना संबंधित कर्जाच्या अटी समजावून घेणे आवश्यक असते व आपण सह्या केलेल्या कर्जाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रत आपल्याकडे घेणे आवश्यक असते. कर्जाच्या कागदपत्रांवर न वाचता सह्या करू नयेत. यामुळे कर्जाबाबत काही कायदेशीर प्रश्न निर्माण झाले तर त्याला उत्तर देणे सोपे होते.

८) कर्ज परतफेड झाल्यावर आपण तारणासाठी दिलेली कागदपत्रे डॉक्युमेंट्स उदा. जागेची मूळ कागदपत्रे जसेच्या तसे परत मिळत असल्याची खात्री करून घ्यावी. आपण शेअर, म्युच्युअल फंड, पोस्टातील गुंतवणूक, इन्शुरन्स पॉलिसी, आरबीआय बाँड यासारख्या तारणावर कर्ज घेतले असेल तर कर्ज रद्द झाले असल्याचे खात्री करून घ्यावी. वाहन कर्जाची परतफेड झाल्यावर आरसी बुकातील हायपॉथिकेशन चार्ज व इन्शुरन्स पॉलिसीवरील चार्ज रद्द झाल्याची खात्री करून घ्यावी. सोने तारण कर्जाची परतफेड झाल्यावर आपण तारण म्हणून ठेवलेले दागिने जसेच्या तसे असल्याची खात्री करून घ्यावी.

९) आवश्यक त्या सर्व ठिकाणी योग्य पद्धतीने नॉमिनेशन करणे गरजेचे असते. महत्त्वाचे म्हणजे नॉमिनेशनचे नियम गुंतवणुकीनुसार वेगळे असतात ते समजून घेणे आवश्यक आहे. उदा. बँक ठेवी, लॉकर यासाठी आपण एक किंवा त्याहून अधिक नॉमिनी देऊ शकता. मात्र, संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर पहिला नॉमिनी हयात असेल तर ठेवी रक्कम किंवा लॉकरमधील ऐवज पहिल्या नॉमिनीस दिला जातो. पहिला नॉमिनी हयात नसेल तरच दुसऱ्या नॉमिनीस ठेवी रक्कम किंवा लॉकरमधील ऐवज दिला जातो.

हेही वाचा: शेअर बाजार गुंतवणूक डोळ्यांवर पट्टी बांधून नको....

१०) म्युच्युअल फंड; तसेच एनपीएस, डी-मॅट खाते यासाठी आपण जास्तीतजास्त तीन नॉमिनी देऊ शकतो. आपल्या पश्चात या तिघांना किती प्रमाणात वाटा द्यायचा हेही ठरवू शकतो. उदा. आपण पत्नी, मुलगा आणि मुलगी या तिघांचे नॉमिनेशन दिले असेल, तर आपण पत्नीस ५० टक्के व मुलांना प्रत्येकी २५ टक्के किंवा तिघांना समान ३३.३३ टक्के किंवा आपल्याला हवी ती टक्केवारी ठरवू शकता. संयुक्त खाते असेल तर त्यातील प्रत्येक जण वेगळे नॉमिनेशन करू शकत नाही. तसेच नॉमिनेशन फॉर्मवर संयुक्त खात्यातील सर्व व्यक्तींनी सही करून संमती देणे आवश्यक असते.

११) आयुर्विमा अर्थात लाईफ इन्शुरन्स पॉलिसीसाठी बेनिफिशरी नॉमिनी नेमावा लागतो. जवळचा नातेवाईक उदा. पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील हेच बेनिफिशरी नॉमिनी होऊ शकतात.

१२) कोणतीही मूळ कागदपत्रे खराब होऊ नयेत या उद्देशाने लॅमिनेट करून ठेवू नयेत. अशी लॅमिनेट केलेली कागदपत्रे मूळ कागदपत्रे म्हणून स्वीकारली जात नाहीत, परिणामी पुन्हा नव्याने डुप्लिकेट डॉक्युमेंट्स संबंधित कार्यालयाकडून मिळवावी लागतात. यात वेळ व पैशाचा अपव्यय होतो.

१३) आपण आपल्या मृत्युपत्रात काही बदल करणार असाल तर अशा वेळी पुन्हा साक्षीदार; तसेच आपण मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचा वैद्यकीय दाखला घ्यावा लागेल. शक्यतो वारंवार असे बदल करू नयेत.

१४) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण करीत असलेल्या गुंतवणुकीबाबत; तसेच अन्य आर्थिक व्यवहाराबाबत कुटुंबातील जबाबदार व्यक्तीस माहिती द्यावी. गुंतवणूक करताना शक्यतो संयुक्त नावाने (पत्नी, मुलगा-मुलगी, आई-वडील, बहिण-भाऊ) करावी. तसेच कमीतकमी बँक खाती, क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्डचा वापर करावा.

१५) सध्याची सोने संग्रह मर्यादा (विवाहित स्त्री, अविवाहित मुलगा-मुलगी, पुरुष यांच्यासाठी असलेली सोने मर्यादा लक्षात घेऊन) आपल्याकडे असलेल्या सोन्याबाबतचा स्रोत व आपण खरेदी केलेल्या सोन्याच्या खरेदी पावत्या व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे.

१६) आपण फाईल केलेल्या इन्कम टॅक्स रिटर्न व त्या अनुषंगिक सर्व कागदपत्रे आर्थिक वर्षानुसार व्यवस्थित ठेवावीत; जेणेकरून इन्कम टॅक्स विभागाकडून काही विचारणा झाली तर त्याचे समाधानकारक उत्तर देणे सोपे होईल.

१७) आपण कोणास हातउसनी रक्कम दिली असल्यास किंवा कोणाकडून घेतली असल्यास त्याची नोंद करून ठेवावी व तसे कुटुंबातील जबाबदार व्यक्तीस सांगून ठेवावे.

१८) राष्ट्रीयीकृत बँक किंवा आर्थिकदृष्ट्या सुदृढ वा सक्षम बँकेत आपली ठेव व बचत खाती असणे हितावह ठरते. अगदी लहान सहकारी बँक किंवा पतपेढीमध्ये खाते असल्यास त्यात मोठ्या रकमेच्या ठेवी ठेवण्याचे टाळलेले बरे. जास्तीतजास्त दोन ते तीन बँकेतच खाती असावीत. अनावश्यक खाती वेळीच बंद करावीत; जेणेकरून ती ‘इनऑपरेटिव्ह’ होणार नाहीत.

थोडक्यात, असे म्हणता येईल, की आर्थिक व्यवहारांबाबतच्या कागदपत्रांची वेळच्यावेळी पूर्तता करून ती सहजगत्या उपलब्ध होतील, अशा रीतीने ठेवल्यास आपले किंवा वारसांचे भविष्यातील आर्थिक व्यवहार सुकर होतील.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”