आपली आर्थिक सुरक्षा आपल्याच हाती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपली आर्थिक सुरक्षा आपल्याच हाती!}

आपली आर्थिक सुरक्षा आपल्याच हाती!

- रेखा धामणकर

आर्थिक गैरव्यवहारांचे लोण आता सर्वसामान्यांच्याही दारासमोर उभे ठाकले आहे. जास्त परतावा देणाऱ्या ठेवींच्या आमिषापासून एटीएमशी संबंधित गैरप्रकारांपर्यंत अनेक प्रकारे सर्वसामान्यांना फटका बसू शकतो. आपली फसवणूक टाळणे खरे तर प्रत्येकाच्याच हातात आहे. छोट्या, सोप्या गोष्टी करून स्वतःला सुरक्षित ठेवता येते. फसवणुकीचे प्रकार कोणकोणते आहेत, त्यांच्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्‍या जातात, त्यांच्यापासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे आदी गोष्टींबाबत कानमंत्र.

आपण अलीकडे रोज नवनवीन आर्थिक गैरव्यवहारांबाबत ऐकतो, थोडी चर्चा करतो, उहापोह करतो. हे कसे चुकीचे आहे, कोणीतरी ठोस उपाय केला पाहिजे, सरकारने ठोस पावले उचलायला हवीत असे म्हणतो (आपापसांत) आणि कामाला लागतो. या आर्थिक गैरव्यवहारांचे सावट आपल्यापर्यंत कधी येणार नाही, अशी कदाचित आपली धारणा असावी. मात्र, हे सावट आपल्यापर्यंत कधीही येऊ शकते. यासाठी आपलीही काही जबाबदारी आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. मी या क्षेत्रात गेली १५ वर्षे कार्यरत आहे. अनेक मोठे आर्थिक गैरव्यवहार शोधून गुन्हेगारांना शासन देण्यात सरकारची मदत केली आहे, अजूनही करते आहे; परंतु आपल्याला अपाय करू शकणारे सर्वसामान्य गैरव्यवहार कोणत्या प्रकारचे असतात आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो, याची माहिती देणे हा या लेखाचा मानस आहे.

हेही वाचा: म्युच्युअल फंड घ्यावा, की शेअर्स?

मालमत्तेशी संबंधित गुन्हे -

एक फ्लॅट अनेक व्यक्तींना विकणे, दुसऱ्याच्या नावावर असलेला फ्लॅट परस्पर तिसऱ्या व्यक्तीला विकणे, जो फ्लॅट कर्ज घेण्यासाठी तारण ठेवला आहे, तो बँकेच्या अपरोक्ष विकून कर्ज न फेडता पैसे परस्पर वापरणे- असे मालमत्तेशी संबंधित एक न अनेक प्रकारे गैरव्यवहार केले जातात. यात वापरले जाणारे मुख्य तंत्र म्हणजे मालमत्तेच्या कागदापत्रांच्या खोट्या प्रतींचा वापर.

खबरदारीचे उपाय -

मालमत्तेचे कुठलेही व्यवहार करण्याआधी कागदपत्रे एखाद्या जाणकार वकिलामार्फत तपासून घ्या. वकिली भाषेत याला ‘सर्च’ असे म्हणतात. कर्ज घेण्यासाठी हा ‘सर्च रिपोर्ट’ घेणे आवश्यक असते. मात्र, गुन्हेगार असेच खरेदीदार शोधतात ज्यांना कर्ज घ्यायचे नसते. तुम्ही मालमत्ताविषयक व्यवहार करू इच्छित असल्यास, सर्च रिपोर्ट घेतल्याशिवाय व्यवहार करू नका.

जास्त परतावा देणाऱ्या ठेवी आणि तत्सम गुंतवणुका -

हा आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या गुन्हेगारांचा सर्वांत आवडता प्रकार आहे. याला कारणीभूत आहे कमी वेळात जास्त पैसे कमविण्याची सर्वसामान्य माणसाची इच्छा. बँका किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा खूप जास्त परताव्याचे आमिष दाखवून पैसे घेतले जातात आणि पैसे परत मिळण्याच्या वेळी हात वर केले जातात किंवा पैसे घेणारी मंडळी नाहीशी होतात. रिझर्व्ह बँक सध्या जनजागृती मोहिमेतून अशा प्रकारच्या योजनांपासून लोकांना सावधही करते आहे; पण तरीही अशा गैरव्यवहारांचे प्रमाण कमी होत नाही.

हेही वाचा: ओबीसींचे राजकीय आरक्षण अन् इम्परिकल डेटाचे काय?

खबरदारीचे उपाय -

 • कुठल्याही गुंतवणुकीच्या पर्यायाची निवड करताना सावधगिरी बाळगा.

 • कमी वेळात जास्त परतावा देणाऱ्या‍ योजनांपासून दूर राहा.

 • पैसे घेणाऱ्या‍ संस्थेचे क्रेडिट रेटिंग तपासून पाहा.

 • संस्थेशी निगडित असणाऱ्या‍ पदाधिकाऱ्यांची माहिती घ्या.

 • अशा संस्थांची फायनान्शिअल स्टेटमेंट्स तपासून बघा आणि गुंतवणूकदारांचे पैसे कशा प्रकारे आणि कुठे वापरत आहेत त्याची माहिती घ्या.

एसएमएस/ ई-मेलद्वारे फसवणूक -


या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आपल्याला आपले बँक अकाऊंट, प्राप्तिकर परतावा यांच्याशी संबंधित किंवा तत्सम आमिष दाखविणारा एखादा संदेश पाठवला जातो. वरकरणी हा संदेश अधिकृत वाटतो. अशा संदेशामध्ये आपल्याला एखादी रक्कम मिळविण्यासाठी काही माहिती मागितली जाते. ही माहिती आपल्याला कुठल्यातरी संकेतस्थळावर (वेबसाइट) जाऊन भरायची असते. प्रथमदर्शनी संदेशमध्ये दिलेली लिंक अधिकृत संकेतस्थळाची ‘दिसते’; मात्र या लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडले जाणारे पेज फसवे असते. आपण भरलेली माहिती वापरून गुन्हेगार आपल्याच बँक खात्यावर डल्ला मारतात आणि आपल्या खात्यातून पैसे गेल्यावर आपल्याला हे उमगते.

हेही वाचा: पार्सलमुळे कोरोनाला आळा मात्र, पर्यावरणीय धोका वाढला

खबरदारीचे उपाय -

 • आपण अशा प्रकारचे काही व्यवहार केले आहेत का याचा आढावा घ्या. उदाहरणार्थ, तुम्ही भरलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रात परतावा मागितलाच नसेल, तर समजून जा की तो संदेश फसवा आहे.

 • अशा फसव्या एसएमएस/ ई-मेलचा स्रोत शोधायचा प्रयत्न करा. बहुतेक वेळेला हे संदेश अनधिकृत क्रमांक/ ई-मेल आयडीवरून पाठवलेले आढळून येतात. बँक, प्राप्तिकर विभाग किंवा तत्सम संस्था त्यांच्या अधिकृत क्रमांक/ ई-मेल आयडीवरूनच संपर्क करतात. यासाठी आपल्या बँकेचे/ प्राप्तिकर विभागाचे किंवा आपल्याशी संबंधित संस्थांचे क्रमांक/ ई-मेल आयडी जाणून घ्या. आलेला संदेश इतर कुठल्याही क्रमांक/ ई-मेल आयडीवरून आलेला असेल, तर तो संशयास्पद आहे. त्यावर कुठलीही कार्यवाही करू नका.

 • स्रोत सहजपणे शोधणे शक्य नसेल, तर संदेशामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका. बहुतेक वेळा दिसणारी लिंक आणि उघडणारे संकेतस्थळ यांचा काही संबंध नसतो.

 • तुम्हाला पाहायचेच असेल, तर दिलेली लिंक स्वत: टाइप करून संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न करा.

 • संकेतस्थळाच्या नावाच्या आधी ‘https:\\’ आहे की नाही ते तपासून घ्या. तसे नसेल, तर ते सुरक्षित नाही.

 • असे संदेश सोशल मीडियावर टाकून इतरांना सावध करा.

दूरध्वनी कॉलद्वारे फसवणूक -


आजकाल अनेक वेळा आपल्याला लाइफ इन्शुरन्स पॉलिसी किंवा बँक अकाऊंट केवायसीबद्दल दूरध्वनी येत असतात. काही वेळा आपल्याला काही बक्षीस मिळाले आहे असे सांगून ते क्लेम करण्यासाठी काही माहिती मागितली जाते, तर काही वेळा आपले एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, असे सांगून माहिती मागितली जाते. ही फक्त काही उदाहरणे आहेत आणि अशी फसवणूक करणारे लोक नित्यनवे बहाणे शोधत असतात. असे दूरध्वनी करणारे लोक आपल्याला पॉलिसी, बँक अकाऊंट किंवा एटीएम कार्ड बंद होण्याची भीती दाखवून आपल्याकडून आपल्या बँक अकाऊंट किंवा केवायसीशी संबंधित माहिती मागतात आणि मग अशा माहितीच्या आधारे आपली आर्थिक फसवणूक होण्याचा धोका असतो.

खबरदारीचे उपाय -

 • ज्या क्रमांकावरून दूरध्वनी आला तो तपासून बघा. तो बँकेचा किंवा विमा कंपनीचा अधिकृत क्रमांक नसतो. तसे नसेल तर कोणतीही माहिती देऊ नका.

 • बऱ्याच वेळा आपले अकाऊंट ज्या बँकेत नाही किंवा ज्या विमा कंपनीबरोबर आपण कधीही व्यवहार केलेला नाही अशा बँक किंवा कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले जाते. तेव्हाच सावध व्हा.

 • तरीही खात्री नसेल, तर काही चुकीची माहिती (उदाहरणार्थ, जन्मतारीख, कार्ड नंबर, इ.) देऊन बघा. जर ती स्वीकृत झाली तर गडबड आहे हे समजून जा. संभाषण ताबडतोब बंद करा.

 • कुठल्याही परिस्थितीत ओटीपी, सीव्हीव्ही सांगू नका.

हेही वाचा: अजून किती क्षितिजांचे आयुष्य फुलण्याअगोदरच कोमेजणार?

सोशल मीडियाद्वारे फसवणूक -

आपल्याला कधी आपल्या एखाद्या नातलगाकडून किंवा मित्राकडून मदतीसाठी सोशल मीडियावर (फेसबुक, व्हॉट्सॲप इत्यादी) संदेश आला आहे का? हा एक प्रकारचा सापळा असू शकतो. आपल्या नातलगाचे/ मित्राचे खाते हॅक झाले असू शकते. हॅक करणारी व्यक्ती अशा खातेधारकाच्या खात्याशी संबधित व्यक्तींकडून आपण अडचणीत असल्याचे भासवून पैशाची मागणी करते. मागणी करणारी व्यक्ती आपल्या परिचयाची असल्याने आपण विश्वासाने मदत करायला जातो आणि फसतो.अशा प्रकारची फसवणूक केवळ ओळखीच्याच नव्हे, तर अनोळखी व्यक्तीकडूनही होऊ शकते. अशा वेळी हॅकर आपल्याला पासपोर्ट किंवा तत्सम ओळखपत्रही पाठवू शकतो. अर्थातच हे ओळखपत्र बनावट असते.


खबरदारीचे उपाय -

 • जिच्याकडून मागणी आली आहे, त्या व्यक्तीला इतर मार्गाने संपर्क साधा (उदाहरणार्थ, दूरध्वनी). ती व्यक्ती खरेच अडचणीत असेल तर तुम्ही मदत करू शकता.

 • ज्या मीडियावरून संदेश आला, त्याच मीडियावर उत्तर दिले, तर हॅकर एक तर सावध होईल किंवा तो मागणी का करत आहे आणि ती कशी रास्त आहे हे तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करेल.

 • तुम्ही सावधपणे हे करत असाल, तर एखादा वैयक्तिक प्रश्न विचारून पाहा. उत्तर चुकीचे आले किंवा टाळले गेले तर समजून जा, की तुम्ही चुकीच्या माणसाबरोबर संवाद साधत आहात.

 • संदेश अनोळखी व्यक्तीकडून आला असेल, तर शक्यतो संवाद साधू नका. मात्र, सावध असाल, तर संवाद उगाचच वाढवून त्या व्यक्तीला जास्त बोलायला उद्युक्त करा, ज्यायोगे त्या संभाषणातून त्या व्यक्तीचा खोटेपणा उघडकीस येईल. समोरची व्यक्ती जास्त हुशार असेल, तर तो ज्या प्रकारे मागत आहे त्या प्रकारे मदत देण्याचे टाळून त्याला इतर असे मार्ग सुचवा, की जे फक्त खरा अडचणीत असलेला माणूसच वापरू शकेल. उदाहरणार्थ, जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधणे इत्यादी.

  एटीएमशी संबंधित गुन्हे

 • एटीएम कार्डचा वापर आजकाल सगळेच करतात. मात्र हे एटीएम कार्ड एक डेबिट कार्डही असते, हे बऱ्याच जणांना ठाऊक नसते. या कार्डाद्वारे एटीएमवरून पैसे काढता येतात, तसेच इंटरनेटवरून व्यवहार करता येतात किंवा दुकानामधून खरेदीही करता येते. ज्याच्या हाती हे कार्ड आणि तुमचा पिन लागेल, त्याला तुमच्या बँक अकाऊंटचा संपूर्ण ताबा मिळतो. आपल्या अकाऊंटमध्ये असलेली सारी रक्कम तो काढून घेऊ शकतो किंवा खर्च करू शकतो.

 • खबरदारीचे उपाय -

 • एटीएम कार्डचा पिन कुणालाही देऊ नका किंवा कार्डच्या मागे किंवा कव्हरवर लिहून ठेवू नका.

 • कोणी आपल्याला बँकेतून बोलत आहोत असे सांगून आपला पिन मागितला तरी देऊ नका- कोणतीही बँक अशा प्रकारे आपला पिन मागत नाही, मागू शकत नाही.

 • एटीएममध्ये कार्ड वापरत असताना दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपल्याजवळ उभेसुद्धा राहू देऊ नका.

 • आपले कार्ड चुकूनसुद्धा कुणाच्या ताब्यात देऊ नका.

 • इंटरनेटवरील व्यवहारासाठी एक वेगळा ओटीपी येतो. हा ओटीपी कुणालाही देऊ नका.

 • संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून कार्ड ब्लॉक करायला सांगा.

 • शक्य असल्यास कार्डचा विमा (कार्ड प्रोटेक्शन प्लॅन) काढून घ्या.

  मोबाईल बँकिंगशी संबंधित गुन्हे -
  बहुतेक बँका आपल्या ग्राहकांना मोबाईल बँकिंगची सुविधा देतात. यामध्ये यूपीआय व्यवहार, पैसे पाठवण्याची सुविधा, एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा अशा बऱ्याच सुविधा दिल्या जातात. हे सर्व व्यवहार मोबाईल प्रणालीद्वारे केले जातात. आपला मोबाईल चुकून दुसऱ्याच्या हातात लागला किंवा हॅक झाला, तर ती व्यक्ती या सुविधा वापरून काय करू शकेल याचा विचारही धडकी भरवणारा आहे, कारण मोबाईल आणि बँक अकाऊंट, दोन्हीचा ताबा त्या व्यक्तीकडे जातो.

हेही वाचा: नोबेल पुरस्कारांची अशी झाली सुरुवात...!

खबरदारीचे उपाय -

 • आपल्या मोबाईलला सुरक्षित करण्यासाठी पिन किंवा पॅटर्न लॉक ठेवा.

 • बँकेची मोबाईल प्रणाली उघडण्यासाठी आणि व्यवहारासाठी जे पिन असतील ते अतर्क्य आणि वेगवेगळे ठेवा.

 • मोबाईल व्यवहाराची मर्यादा कमीत कमी सेट करा, शक्यतो मोठे व्यवहार इंटरनेट बँकिंगद्वारे करा.

 • मोबाईल हरवल्यास सिम कार्ड तात्काळ ब्लॉक करा, बँकेशी संपर्क साधून मोबाईल बँकिंग सुविधा बंद करा.

 • यूपीआय व्यवहारांची मर्यादाही सेट करून ठेवा. ज्यायोगे मोठे नुकसान टाळता येईल. कुठल्याही परिस्थितीत आपली फसवणूक होते आहे असे वाटल्यास सावधपणे वागा, घाबरून जाऊ नका. नुकसान टाळता येऊ शकते. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :ATM
go to top