भारतीयांना विम्याचे महत्त्व! तुम्ही विमा घेतला आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीयांना विम्याचे महत्त्व! तुम्ही विमा घेतला आहे?}

विम्याचा मुख्य उद्देश जोखमीपासून संरक्षण हा असला, तरी असंख्य भारतीय अजूनही त्याकडे गुंतवणूक म्हणूनच बघतात. विमा कंपन्या आणि कर्मचारीही अनेकदा त्याला पूरक कार्य करताना दिसतात. विमा हे गुंतवणुकीचे साधन नसून, जोखमीपासून संरक्षण या दृष्टीनेच त्याकडे बघणे गरजेचे आहे, हे सर्वसामान्यांना आणि इतरांनाही पटवून देण्याची गरज आहे.

भारतीयांना विम्याचे महत्त्व! तुम्ही विमा घेतला आहे?

तुम्ही आणि तुमचे कुटुंबातील सदस्य कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीपासून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहात, हे तुम्हाला माहीत असते, तेव्हा यापेक्षा मोठा आनंद आणि शांती नसते. जीवनात दुर्दैवी मृत्यू किंवा वैद्यकीय आणीबाणी, अपघात किंवा आपले वाहन, मालमत्ता इत्यादींचे नुकसान अशी अनिश्चितता कोणत्याही क्षणी उद्‍भवू शकते. अशी अनिश्चित परिस्थिती किंवा घटनेचा आर्थिक परिणाम म्हणजे आपली आर्थिक स्थिरता नष्ट होऊ शकते. तुम्हाला तुमची सर्व बचत किंवा तुमच्या कुटुंबाचे कष्टाने कमावलेले पैसे खर्च करावे लागू शकतात. म्हणूनच, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या जीवनाशी, आरोग्याशी आणि मालमत्तेशी निगडित सर्व जोखमींविरूद्ध योग्य कव्हरेज आणि आर्थिक मदतीसाठी विम्याची गरज आहे.

विम्याची गरज का आहे?

- वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, रुग्णालयात दाखल होणे, कोणत्याही आजारांचे उपचार आणि भविष्यात आवश्यक वैद्यकीय सेवा यासाठी विमा योजना तुम्हाला मदत करेल.

- एकमेव कमावत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबाला होणारे आर्थिक नुकसान विमा योजनांद्वारे पूर्ण केले जाऊ शकते.

- विमाधारकाने त्याच्या/तिच्या हयातीत घेतलेले गृहकर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज, विमा योजनाच्या मदतीने कुटुंबातील सदस्य परतफेड करू शकतो.

- आपण भविष्यात नसल्यास विमा योजना आपल्या कुटुंबाचे जीवनमान राखण्यास आणि घर चालवण्याचा खर्च भरण्यास मदत करेल.

- विमा योजना आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या दृष्टीने त्याच्या भविष्याचे संरक्षण करण्यास मदत करेल. तुमची मुले स्वप्नांचा आणि महत्त्वाकांक्षांचा पाठपुरावा करत असताना, कोणतीही तडजोड न करता, तुम्ही आजूबाजूला नसतानाही ती आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्याची खात्री विमा योजना करेल.

- कोणतीही अनपेक्षित आपत्ती आल्यास किंवा नुकसान झाल्यास विमा तुमच्या घराचे संरक्षण करण्यास मदत करतो. तुमची होम इन्शुरन्स योजना तुम्हाला तुमच्या घराच्या नुकसानीसाठी कव्हरेज मिळवण्यात आणि दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीच्या खर्चासाठी, जे आवश्यक असेल ते देण्यास मदत करेल. तुम्ही मौल्यवान वस्तू आणि वस्तूंसाठी जोखीम संरक्षण घेतले असेल, तर तुम्ही विम्याच्या पैशाने बदली वस्तू खरेदी करू शकता.

हेही वाचा: चोरीला गेलेला मोबाईल परत मिळेल, पण...

विम्याचे बरेच फायदे आहेत; पण तरीही भारतात विम्याचे महत्त्व लोकांना समजत नाही. त्यासाठी अनेक कारणे जबाबदार आहेत. हे केवळ भारतीय गुंतवणूकदारांच्या मानसिकतेमुळेच नाही, तर भारतातील विविध विमा कंपन्यांच्या विक्री पद्धतींमुळेदेखील आहे.

जागरुकता वाढवण्याची गरज

- भारतीय विमा बाजार अजून वाढत आहे आणि त्याला आणखी वाढीसाठीही भरपूर संधी आहे; पण आता अधिक आवश्यक आहे ते म्हणजे विम्याच्या महत्त्वविषयी गुंतवणूकदारांमध्ये जागरुकता वाढवणे.

- गुंतवणूकदार/लोकांसह, विमा कंपन्या, विमा एजंट, बँका (जे विमा पॉलिसीचे मुख्य वितरक आहेत) यांच्याकडून आर्थिक जागरुकता वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. विमा गुंतवणुकीसाठी नाही, तर भविष्यातील अनिश्चिततेपासून संरक्षणासाठी जास्त महत्त्वाचा आहे, हे लोकांना समजेल, तेव्हा ते गुंतवणुकीसह येणारी कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी ते अधिक जागरुक राहतील.

- आज लोक अजूनही युलिप पॉलिसी किंवा एंडॉमेंट पॉलिसीकडे जातात- कारण यासारख्या विमा पॉलिसी गुंतवणुकीच्या पर्यायांसह येतात. तसेच, अशा पॉलिसी ‘टॅक्स सेव्हिंग प्रॉडक्ट’च्या नावाखाली सहज विकल्या जातात. विमा हे बहुतेक भारतीयांसाठी केवळ गुंतवणुकीचे उत्पादन आहे. पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाने ‘रिटायरमेंट रेडीनेस सर्व्हे २०२०’ हे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार, भारतीय निवृत्तीसाठी प्रामुख्याने जीवन विमा आणि एफडीमध्ये गुंतवणूक करतात.

- या सर्वेक्षणात ४१ टक्के लोक म्हणाले, की त्यांनी निवृत्तीसाठीची गुंतवणूक जीवन विम्यावर केंद्रित केली, तर ३७ टक्के लोकांनी मुदतठेवींना प्राधान्य दिले.

हेही वाचा: तुफान, बादल, वादळ! इंजिने धावणार कधी?

जोखमीसाठी संरक्षण

विमा उतरवण्याचा मूलभूत हेतू जोखमीसाठी संरक्षण आहे, हे माहीत असूनही भारतीय हे क्वचितच समजून घेतात किंवा दुर्लक्ष करतात. ‘लेक्सिसनेक्सिस रिस्क सोल्युशन्स इंडिया’ २०१७ मध्ये ने मेट्रो शहर आणि टायर १ शहरांमधील जवळपास २ हजार ग्राहकांचे सर्वेक्षण केले. त्यांना ग्राहकांची मानसिकता जाणून घ्यायची होती आणि विमा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यासाठी ते कोणती माहिती शोधतात, हे समजून घ्यायचे होते, म्हणून त्यांनी हे सर्वेक्षण केले.

लेक्सिसनेक्सिस संशोधनाच्या निष्कर्षांत असे दिसून आले, की पुष्कळ लोकांना वाटते :

- त्यांना विम्याची गरज नाही.

- विमा त्यांच्या आयुष्याशी संबंधित नाही.

- विमा म्हणजे काय ते त्यांना समजत नाही.

संशोधनात असेही आढळले, की बरेच लोक जीवन किंवा आरोग्य विमा आवश्यक मानत नाहीत.

भारतीयांची भूमिका आणि मानसिकता

भारतातील लोक ज्या ठिकाणी पैसे ठेवतात तेथे परताव्याची अपेक्षा करतात, हे साहाजिक आहे, मान्य आहे; परंतु कोणत्याही आर्थिक उत्पादनाचा हेतू समजून घेणे आवश्यक आहे. येथे लक्षात घेण्यासारखी एक मूलभूत गोष्ट म्हणजे- विमा ही परतावा किंवा नफा मिळवण्यासाठी केलेली गुंतवणूक नाही आणि विम्याच्या बाबतीत लोकांना नेमके हेच समजत नाही. लोक नेहमी अधिक पैसे किंवा नफा मिळवण्याच्या शोधात असतात. तुम्ही पाहिले असेल, तर ‘कोरा’; अनेक फेसबुक फायनान्शियल ग्रुप्स हे ‘जास्त नफा मिळविण्यासाठी उत्तम गुंतवणूक?’, ‘संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणुकीचे सर्वोच्च पर्याय,’ अशा चर्चांनी भरून गेले आहेत. लोकांना अल्पावधीत पैसे किंवा नफा कमवायचा आहे. पर्सनल फायनान्स, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड इत्यादींबद्दल फारच थोड्या लोकांना शिकण्याची इच्छा आहे. भारतात बहुतेक लोक गुंतवणूक म्हणून किंवा करबचतीसाठी विमा खरेदी करतात.

हेही वाचा: गुंतवणुकीतील नवे प्रवाह! ‘सूर तेच छेडिता, गीत उमटले नवे’

विमा कंपन्यांची भूमिका

- भारतीयांच्या मानसिकतेत विमा कंपन्यांचादेखील वाटा आहे. ‘विम्याचे महत्त्व’ याविषयी जागरुकता आणण्याऐवजी युलिप्स, एन्डॉवमेंट पॉलिसी इत्यादींसारख्या विमा उत्पादनांची विक्री करण्यावर भर दिला जातो.

- बँक हे भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे ‘हृदय’आहे. बकांच्या साखळीमुळे, ग्रामीण भारत ते शहरी भारतातील लोक जोडले जातात. लोक नेहमी पैशांच्या व्यवस्थापनासाठी बँकेतील लोकांवर विश्वास ठेवतात आणि त्यांचा पैसा त्यांच्याकडे सुरक्षित आहे असा विचार करतात. म्हणूनच विमा कंपन्यांनी भारतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा प्रमुख पर्याय म्हणून बँकांची निवड केली. बँकांनंतर एजंट्स आणि इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी हे ग्राहकांपर्यंत पोचण्याचे इतर मार्ग आहेत. विमा आणि संबंधित माहिती मिळविण्यासाठी बँका, एजंट आणि दलाल हे मुख्य स्रोत किंवा संपर्क आहेत.

- भारतातील विमा कंपन्या शुद्ध विम्यापेक्षा बचत-जोड असलेली उत्पादने अधिक विकतात. कारण एकच आहे, की त्यांनीही हे मान्य केले आहे, की सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदार त्यांच्या पैशातून ‘परतावा/ नफा’ मिळविण्याची अपेक्षा करतात. खरे तर, अशा गुंतवणुका आणि विमा पॉलिसी इन्शुरन्स कंपन्यांसाठी अधिक फायदेशीर असतात- कारण त्या त्यातून जास्त कमाई करू शकतात आणि एजंट/वितरकांनाही या पॉलिसींद्वारे त्यांचे सर्वोच्च कमिशन मिळते.

हेही वाचा: चाहूल ‘डिजिटल करन्सी’ची!

मोहांपासून सावध राहा

तुम्ही पाहिले असेल, तर तुम्ही कोणत्याही व्यवहारासाठी बँकेत जाता, तेव्हा बँक आरएम किंवा कर्मचारी गुंतवणुकीसह विमा पॉलिसींबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतात. अशा पॉलिसींनी काही वर्षांत नफा कसा मिळवला आणि आपल्या गुंतवणुकीवर ती पॉलिसी चांगला परतावा कसा देईल, याचे सादरीकरण ते तुम्हाला दाखवतात. त्यामुळे लोकांनी अशा मोहांबाबत खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. लोकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बँक कर्मचारी किंवा एजंटाने सादर केलेली माहिती क्रॉस चेक करणे आवश्यक आहे. तसेच, अशा प्रकारच्या योजनेची खरोखर गरज आहे की नाही हे तपासणेही आवश्यक आहे. कोरोनाच्या सध्याच्या साथीच्या आजारामुळे भारतीय लोकांना आरोग्य विमा आणि मुदत विमा ठेवण्याचे महत्त्व कळू लागले आहे. विमा आणि त्यांची गरज याविषयी आर्थिक जागरुकता/ साक्षरता वाढविणे ही गरज आहे. जेव्हा लोकांना समजेल, की विमा ही केवळ गरजेच्या वेळीच खरेदी केली जाऊ शकणारी वस्तू नाही, तेव्हा ते विम्याला गांभीर्याने घेतील. प्रत्येकाला त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा आवश्यक आहे, हे त्यांना पटवून दिले पाहिजे. तसेच, विमा उद्योगानेदेखील ग्राहकांपर्यंत पोचण्याचे मार्ग तपासले पाहिजेत आणि ग्राहकांचे ‘विमा उद्दिष्ट’ पूर्ण करायला मदत केली पाहिजे.

शुद्ध विम्याचे प्रमाण कमीच

भारतातील विमा उद्योगाचा विकास दर लक्षणीय आहे आणि तो आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. शेअर बाजारात बऱ्याच खासगी विमा कंपन्यांचे शेअर्स चांगली कामगिरी करत असल्याचे दिसून येते; तसेच त्यांचा व्यवसायही वाढत आहे. मात्र, आतापर्यंतच्या निष्कर्षांवर आणि हिशेबांवर विश्वास ठेवल्यास, जीवन विमा कंपन्या प्रामुख्याने बचत-संबंधित उत्पादने विकतात. भारतीय जीवन विमा व्यवसायात केवळ १० ते २० टक्के भाग शुद्ध विमा आहे.

go to top