सोन्याच्या व्यवसायात मराठी माणसाची अटकेपार मजल ! | Premium Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How Business of Marathi artisans who run gold refineries reached in Amritsar}

सोन्याच्या व्यवसायात मराठी माणसाची अटकेपार मजल !

मराठी माणूस उद्यमशील आहे. तो बाहेरच्या प्रांतात जाऊन व्यवसाय- धंदा करीत नाही, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. परंतु, तो गैरसमज ठरावा, अशी माहिती पुढे आली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांतील सोनं आटवणारे कारागिर देशाच्या अनेक राज्यांतील प्रमुख शहरांत जाऊन व्यवसाय करीत आहेत. अगदी ३०-४० वर्षांपासून ते तेथे आहेत. पंजाबमधील अमृतसरमध्ये या तीन जिल्ह्यांतील सुमारे १५० कुटंबे तेथे राहत आहेत. ते तेथे कसे पोचले, व्यवसाय कसा करीत आहेत, स्थानिक संस्कृतीत ते कसे एकरूप झाले आहेत, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ताज.

पुणे : सोनं आटवणारे म्हणजेच गोल्ड रिफायनरी(gold refineries)चालविणाऱ्या मराठी कारागिरांनी (Marathi artisans) व्यवसाय - धंद्यासाठी केवळ राज्याचीच सीमा ओलांडली नाही तर देशाच्याही बाहेर ते पोचले आहेत. इतकेच नव्हे तर, देशातील प्रमुख राज्यांतील बहुतेक जिल्ह्यांत हे कारागिर पोचले आहेत. अगदी चंदीगड(Chandigarh), अमृतसरमध्येच ( Amritsar ) नव्हे तर, श्रीलंकेतही (Sri Lanka) त्यांची भेट होते. एखाद्या व्यवसायात कुशलता मिळवून परप्रांतात जाऊन काम करण्याची या मराठी हातांच्या जिद्दीची कथा लक्षणीय आहे. (How Business of Marathi artisans who run gold refineries reached in Amritsar)

हेही वाचा: अमृत कलशातील सुमधुर स्वर...!

सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी तर सातारा जिल्ह्यातील पुसेगाव, खटाव, वडूज आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात सोनं शुद्ध करण्याचा व्यवसाय आहे. काही कुटुंबं पिढीजात हे काम करतात. तेथून प्रवीण झालेली मुले परप्रांतात जातात. अमृतसरमध्ये गेल्यावर सुलतानपिंड रस्त्यावरील कित्ताबाजारात यांची दुकानं दिसतात. तेथे भेट दिल्यावर दुकानांच्या दर्शनी भागातच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा लिहिलेल्या दिसतात. तेथेच मराठी जनांचे अस्तित्त्व जाणवते. या बाजारपेठेतील कारागिरांशी चर्चा केल्यावर तेथे मराठी कारागिरांची सुमारे 150 कुटुंबे असल्याचे समजले.

गोल्ड रिफायनरी म्हणजे मोडीतून आलेल्या दागिन्यांतून किंवा वस्तूंमधून शुद्ध सोने बाजूला काढायचे आणि मूळ मालकाला परत द्यायचे. त्यासाठी भट्टीवर काम करावे लागते. प्रसंगी आधुनिक साधने आणि रसायनांचा वापर करून शुद्ध सोने बाजूला काढले जाते. आरोग्याची काळजी घेत हा व्यवसाय करावा लागतो. त्यात जर कधी अपघात झाला तर, जबर दुखापत होऊ शकते. परंतु, पारंगत झालेल्या हातांमध्येत सोन्याचे दागिने किंवा वस्तू सोपविल्या जातात, हे यांच्या व्यवसायाचं एक वैशिष्ट्य. गोल्ड रिफायनरी चालविणाऱ्या या मराठी कारागिरांचे ग्राहक कोण, असा प्रश्न पडतो. पण, बाजारपेठेतील सराफ व्यावसायिक हे या कारागिरांचे ग्राहक असतात. भाषा, प्रांत, संस्कृती वेगवेगळी असली तरी, विश्वास हा धागा त्यांच्यात कायम असतो. त्याच्याच बळावर ते व्यवसाय करतात. शुद्ध सोने परत देताना काही प्रमाणात मजुरीही मिळते आणि त्यातून यांना मोबदला मिळतो. कोणत्याही परिस्थितीत हे कारागिर अनोळखी व्यक्तिकडून मोड घेऊन त्यांना सोनं काढून देत नाहीत की, अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवसाय करीत नाहीत. पोलिसांचा ससेमिरा चुकविणे, हे त्याचे कारण नसून इतकी वर्षे मिळविलेली विश्वासाहार्यता जपण्यासाठी व्यवसायाची काही निती-मूल्यं त्यांनी जपली असून त्यानुसारच ते व्यवसाय करतात.

हेही वाचा: मातृत्वाला तिसरा पर्याय; आईनेच दिले लेकीला गर्भाशय

अमृतसरमधील मराठी कारागिरांनी गणपती उत्सव मंडळ हा ट्रस्टही स्थापन केला आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष पोपट यादव म्हणाले, ‘‘आमचे ज्येष्ठ सहकारी नागेश देवकर सांगली जिल्ह्यातून सुमारे 40 वर्षांपूर्वी अमृतसरमध्ये आले. पाठोपाठ आम्ही आलो. पंजाबमधील सगळ्या जिल्ह्यांतच नव्हे तर, देशातील सर्व प्रमुख शहरांत मराठी मुले गोल्ड रिफायनरीच्या व्यवसायात आहेत. काही जण तर, श्रीलंकेतही पोचले आहेत. येथे सगळे मराठी सण आम्ही उत्साहात साजरे करतो.’’ सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून मुले या व्यवसायात येतात. तिन्ही जिल्ह्यांतील काही तालुक्यांत हा व्यवसाय आहे. तेथे व्यवसायाचे प्राथमिक शिक्षण घेतले जाते. सुमारे दोन- तीन वर्षे झाल्यावर कारागिराचा ‘हात’ तयार झाल्यावर तो बाहेर पडतो. परराज्यात गेल्यावर तेथील कारागिर कुटुंबात त्याचा समावेश होतो. त्यांच्याच घरात तो कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे राहतो. त्याला वरखर्चाला रक्कम त्या कुटुंबाकडून दिली जाते. वर्षातून एखाद्या वेळी गावी जायचे असेल तर, त्या कागिराला प्रवासाचे तिकिट आणि वर कुटुंबासाठी सव्वा ते दीड लाख रुपये सोबत दिले जातात. अर्थात प्रत्येकाच्या ठरलेल्या व्यवहारानुसारच हिशेब पूर्ण केला जातो. एखाद्या कारागिरीला तातडीची गरज म्हणून गावी जावे लागले तरी त्याला पुरेशी मदत केली जाते. तसेच एखाद्या कुटुंबात दोन - तीन वर्षे झाल्यावर त्याला त्या प्रदेशाची आणि तेथे कशा पद्धतीने व्यवहार होतो, याची माहिती समजते. त्यानंतर तो स्वतःचे दुकान थाटतो. लग्न करून कुटुंब परप्रांतात आणतो आणि नव्या पिढीची वाटचाल सुरू होते, असेही यादव यांनी सांगितले.

इतर प्रदेशातील कारागिर या व्यवसायात आहेत का, असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘बंगाली कारागिरही देशभर आहेत. परंतु, ते फक्त सोन्याचे दागिने घडवितात. परंतु, शुद्ध सोने बाजूला काढण्याचे काम कष्टप्रद आणि जोखमीचे आहे. त्याला कौशल्यही लागते. आमचे कारागिर घडतात म्हणजे एखाद्या कुटुंबातील मुलाची जशी जडणघडण होते, तशाच पद्धतीने हा कारागिर घडतो. तसेच दिवसाचे १०-१२ तास तो काम करतो. त्यामुळे पूर्ण लक्ष देऊन तो काम शिकतो. इतर प्रांतातील कारागिर असे करीत असतील, असे नाही. तसेच देशातील कोणत्याही राज्यात सोनं आटवणारे कारागिर हे महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातीलच असतात. देशातील सर्व प्रमुख सराफी पेढ्यांना आमची माहिती झाली आहे. फसवणुकीचा कोठेही प्रकार आजवर झालेला नाही. त्यामुळे सराफी पेढ्या आमच्यावर विश्वास टाकतात, हेच आमच्या यशाचे गमक आहे.’’

हेही वाचा: सोनेरी सरक्षित गुंतवणूक - गोल्ड सॉव्हरिन बाँड आणि गोल्ड इटीएफ

अमृतसमरध्येच गेल्या २० वर्षांपासून कारागिर म्हणून सुरवात करणारे आणि आता स्वतंत्रपणे व्यवसाय करणाऱ्या विजय जाधव यांच्याकडे चार युवक कारागिरी म्हणून काम करतात. आम्ही जसे घडलो, त्या पद्धतीनेच नवी पिढी घडते. ते म्हणाले, ‘‘लग्न झाल्यावर आमचे कुटुंब आम्ही सोबत आणतो. आमच्या मुलांना येथील शाळेतच पाठवितो. त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजीसह पंजाबी भाषाही त्यांना चांगली येते. स्थानिक सण- रितीरिवाज आम्हाला समजतात आणि त्यात आम्ही सहभागीही होतो. तसेच आमच्या उत्सवात पंजाबी नागरिकही सहभागी होतात. मराठी कुटुंब आणि पंजाबी कुटुंब यांच्यात सलोखा आहे. काही वेळा आपल्याही कुटुंबात अडचणी येतात तशाच अडचणी येथे येतात. तेव्हा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी एकत्र बसून त्या अडचणी सोडवतात. अगदी वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी, अडचणीही आम्ही सोडवितो. त्यामुळे परस्परांशी आमचे संबंध चांगले असून सगळे एकमेकांना धरून राहतात.’’ आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, गोवा, केरळ तसेच पूर्व भारतातील राज्यांमधील प्रमुख शहांतही मराठी कारागिर पोचले असल्याचेही जाधव यांनी नमूद केले.

गणपती मंदिरासाठी जमविले 40 लाख

मराठी माणूस जातो, तेथे आपली संस्कृती, सण-समारंब जपतो. गणेशोत्सव आणि शिवजयंती, हे मराठी अस्मितेचे केंद्रबिंदू समजले जातात. अमृतसरमधील मराठी समाजही त्याला अपवाद ठरलेला नाही. येथील कित्ता बाजारात मराठी गणपती मंदिर उभारण्यासाठी येथील मराठी कारागिरांनी सुमारे 400 चौरस फुटांची जागा 15 वर्षांपूर्वी विकत घेतली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तेथे गणपतीचे मंदिर उभारले. त्यासाठी वर्गणी काढून सुमारे 40 लाख रुपये खर्च केले. या मंदिरात आता शीख नागरिकही मोठ्या संख्येने येतात. चर्तुर्थी, गणेश जन्म, गणेश याग, गणेशोत्सव आदी उत्सवही या मंदिरात उत्साहने केले जातात. विविध धर्मांचे स्थानिक नागरिकही त्यात उत्साहाने भाग घेतात. तसेच अमृतसमरमध्ये महाराष्ट्रातून अनेक पर्यटक येतात. त्यातील अनेक जण येथे शोध घेऊन या मंदिरापर्यंत पोचतात, असे जाधव यांनी सांगितले. पंजाबमध्ये प्रशासनात महाराष्ट्रातून आलेले ‘आयएएस’, ‘आयपीएस’ अधिकारीही आहेत. ते अधिकारीही आलेले आम्हाला खूप सहकार्य करतात, असे काशिद यांनी आवर्जुन सांगितले. आमच्या बैठकांनाही काही वेळेस ते येतात आणि आमच्या काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठीही त्यांचे मोलाचे सहकार्य होते, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”