‘सेन्सेक्स’ने विक्रमी पातळी गाठली; पुढे काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सेन्सेक्स’ने विक्रमी पातळी गाठली; पुढे काय?}

‘सेन्सेक्स’ने विक्रमी पातळी गाठली; पुढे काय?

सर्वसामान्यपणे असे म्हटले जाते, की वयाच्या साठीनंतरच्या आयुष्यात माणसाने सावध दृष्टीकोन बाळगावा. पण हीच संकल्पना शेअर बाजार निर्देशांकाला लागू ठरते का? आपल्याला यावरच विचार करायचा असून, या लेखाच्या अखेरीस अनुमानात्मक कृती निश्चित करायची आहे. त्यासाठी आपण शेअर बाजाराचे मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण करणे गरजेचे आहे. त्यातूनच एकसष्टीनंतरची ‘सेन्सेक्स’ची वाटचाल कशी राहील, हे समजू शकेल.

हेही वाचा: जगभरातील नागरिकांना मायदेशी पाठविणारा ‘कतार'!

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने अलीकडेच ६१ हजार अंशांची विक्रमी पातळी गाठली. एका बाजूला ही आनंदाची बातमी असली तरी सध्या गुंतवणूकदारांत भीतीचे किंवा काळजीचे वातावरण पण दिसत आहे. शेअर बाजारातील वातावरण जास्तच तापले असल्याची सर्वसाधारण भावना त्यांच्यामध्ये दिसते. बाजार वाजवीपेक्षा जास्त वाढला आहे की नाही, हे ओळखायचे असेल तर एक मूलभूत निकष म्हणजे ‘सेन्सेक्स’चा पीई रेशो (शेअरची किंमत आणि प्रतिशेअर उत्पन्न यांचे गुणोत्तर). गेल्या दोन दशकांसाठी या पीई रेशोची मर्यादा १३ आणि २८ राहिली आहे. १३ म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिविक्री आणि २८ म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिखरेदी. याआधीचे सर्व तेजीवाले बाजार पीई रेशो हा १३ च्या आसपास असताना तयार झाले आहेत. दुसऱ्या बाजूला मंदीवाले बाजार हाच पीई रेशो २५ हून अधिक पातळीला गेल्यावर तयार झाले आहेत. ताजे उदाहरण वर्ष २००३ चे आहे, जेव्हा पीई रेशो १३ च्या पातळीच्या आसपास होता आणि त्यानंतर आपण एक प्रबळ तेजी पाहिली. वर्ष २००८ मध्ये पीई रेशो २५ पर्यंत पोचला आणि बाजाराने आपटी खाल्ली. परिणामी, पीई पुन्हा १५ च्या पातळीला पोचला. वर्ष २०१० पासून पीई रेशो कमी असल्याने बाजारात तेजी सुरू झाली. चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी पीई २५ वर आहे. पण यावेळी घडामोडी वेगळ्या घडत आहेत का? आपण हे बदलते वास्तव समजून घेऊया, जे अधिक महत्त्वाचे आहे आणि सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या नजरेपासून अदृश्य आहे.

चलनवाढ व व्याजाचे दर वर्ष २००८ ते २०१५ या कालावधीसाठी सरासरी ९ टक्क्यांच्या आसपास होते. ते आता ५ टक्क्यांवर आले आहेत. याचाच अर्थ कंपन्यांसाठी कर्ज उचलणे स्वस्त झाले आहे, ज्याचा थेट फायदा त्यांच्या नफाक्षमतेत होतो. म्हणूनच हा एक मुद्दा झाला, जो पीईचे पुनर्मूल्यांकन सुचवतो. अर्थात निराशावादी दृष्टीकोनातून बघताना आपण २५ चा पीई रेशो म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिखरेदी मानली तरी पुढील काही वर्षांसाठी आगामी उत्पन्न (अर्निंग्ज) पुढीलप्रमाणे असेल.

हेही वाचा: सामान्य माणसांची असामान्य श्रीमंती!

‘सेन्सेक्स’ची झेप कुठवर?

याचा स्पष्ट अर्थ असा आहे, की २०२९-३० पर्यंत पीई रेशो २५ सह निर्देशांक १,५०,७६६ अंशांपर्यंत राहावा. हा अंदाज कंपन्यांच्या उत्पन्नातील अपेक्षित वाढ १२ टक्के राहण्याच्या सनातनी दृष्टीकोनातून वर्तवला आहे. अर्थात व्याजदरातील घसरणीच्या गेल्या ५ ते ७ वर्षांच्या काळात आणि यापुढेही ते घसरत जातील, अशी अपेक्षा बाळगल्यास पीई पुनर्मूल्यांकन खात्रीने घडून येईल. पीई पुनर्मूल्यांकनाच्या वरील संकल्पनेच्या आधारे माझा अंदाज असा आहे, की अतिविक्रीचे पीई गुणोत्तर १८ पातळीला असावे आणि अतिखरेदीचे पीई गुणोत्तर ३५ असावे. जर परिचित गुंतवणूकदारांनी (परकी संस्थात्मक गुंतवणूकदार, स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार, उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्ती) या मुद्यांवर विचार केला तर निर्देशांक सहजपणे १,५०,००० अंश पातळीचे उद्दिष्ट २०२८ मध्ये स्वतःच गाठेल.

आता हे उद्दिष्ट दिसताना प्रचंड दिसते. नाही का? म्हणून आपण गेल्या खेपेच्या तेजीच्या लाटेचे उदाहरण घेऊ. ही लाट २००३ पासून वर्ष २००८ पर्य़ंत चालली. २००३ मध्ये बीएसई सेन्सेक्स ३००० अंश होता, जो वर्ष २००८ मध्ये तब्बल २१,००० अंशांवर जाऊन पोचला म्हणजेच निर्देशांकात सात पटींनी वाढ झाली. २०२० मध्ये आपण शेअर बाजार कोसळला तो कोविड साथीच्या संकटामुळे. या घसरणीमुळे निर्देशांक २५,६४० अंशापर्य़ंत आला. ऐतिहासिक तेजीच्या लाटेच्या माहितीची आकडेवारी बघितली, तर २५,६४० च्या सातपट म्हणजे १,७९,४८० ही पातळी येते. आता हे उद्दिष्ट थोडा अधिक काळ घेईल म्हणजेच ते वर्ष २०३० मध्ये गाठले जावे. कृपया नोंद घ्या, की हे उद्दिष्ट गाठतानाही पीई तेव्हा केवळ २८ राहील.

आता यात भर म्हणून...

 • भारताने आजघडीला ८४.१५ कोटी लसींचे व्यवस्थापन केले असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते १०० कोटी लसींचे आहे. भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी २४ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत, तर ६६ टक्के लोकसंख्येला किमान एक डोस मिळाला आहे. यातून ही खात्री पटेल, की भारतात कोविडची तिसरी गंभीर लाट येणार नाही.

 • जगभरातील आणि भारतातील सरकारी धोरणांचे उत्तेजन भक्कम असल्याने त्याची मदत बृहद् आर्थिक प्रगतीच्या वेगाला प्रेरणा मिळण्यात होईल. सरकारने स्थानिक उत्पादन उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादनाधारित सवलतींच्या (पीएलआय) विविध योजना जाहीर केल्या आहेत.

 • मध्यवर्ती बँका सामावून घेणाऱ्या आहेत. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने आपली उत्तेजनात्मक व सामावून घेणारी भूमिका कायम ठेवली असून व्याजदरही कमीच राखले आहेत. कंपन्यांसाठी भांडवलाची किंमत कमी राहिल्याने त्या नवा भांडवली खर्च करीत आहेत व आर्थिक घडी पुन्हा बसविण्यात मदत करीत आहेत.

 • पुढील २-३ वर्षांत पायाभूत सुविधांवर होणारा मोठा खर्च - अमेरिकी सरकारने ६ ट्रिलीयन डॉलर इतके पायाभूत सुविधा उत्तेजन पॅकेज जाहीर केले आहे. भारतात अजून दोन वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. या बाबी ध्यानात घेऊन भारत सरकारही पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी प्रचंड खर्च करण्याची शक्यता आहे. अमेरिका व भारतातील कॅपिटल गुड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांच्या ऑर्डर बुकमध्ये प्रगती होण्यासाठी याची मदत होईल.

 • जीएसटी करवसुली, ई-वे बिल निर्मिती, पिक पॉवर डिमांड या गोष्टी अपेक्षित आर्थिक पुनरुज्जीवनाकडे दिशानिर्देश करतात.

 • अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन झाल्याने बँकिंग कर्जांत वृद्धी होईल आणि पुढील वर्षी कोविडसाठी तरतुदी अगदी कमी करायला लागल्याने बँकिंग व वित्तपुरवठा क्षेत्रातील उत्पन्नात भरीव वाढ होईल. सध्या हे प्रमाण बेंचमार्क इंडेक्सच्या ३५ टक्क्यांच्या आसपास आहे.

 • पुढील ३ ते ५ वर्षांत उच्च दराने प्रगती करणाऱ्या वित्तीय तंत्रज्ञान कंपन्या, शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्या आणि नव्या युगातील कंपन्यांची नोंदणी होईल आणि याच कंपन्या पारंपरिक व्यवसायांच्या तुलनेत विशेष मूल्यांकनात वर्चस्व गाजवतील. या कंपन्या मोठ्या होऊन निर्देशांकाचा भाग बनतील, तेव्हा मूल्यांकनाचे पुनर्मानांकन घडेल आणि तेव्हा निर्देशांकाचे पीई गुणोत्तर दीर्घकाळात गेल्या दहा वर्षांतील मूल्यांकनाचा तुलनेत विशेष मूल्यांकन पातळीला राहील.

 • भारतीय अर्थव्यवस्था पुढील दशकभरात विकसित अर्थव्यवस्था बनल्याने व्याजदर खाली येतील आणि निर्देशांकासाठीचे विशेष मूल्यांकनही फेरआढाव्यानंतर वरच्या पातळीला जाईल.

हेही वाचा: ''स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराला प्रेम करण्याचा अधिकार नाही?''

तांत्रिक दृष्टीकोन

तांत्रिक विश्लेषण म्हणजे आलेखांचा अभ्यास असून किंमत हे त्याचे प्राथमिक साधन असते. तांत्रिक विश्लेषणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती. प्रत्येक तेजीवाल्या बाजारात आणि मंदीवाल्या बाजारात तेजी व मंदीच्या लाटेमागील कारणे वेगवेगळी असली तरी आकृतिबंध (पॅटर्न्स) समानच असतात. हे आकृतिबंध तरंगांच्या (वेव्ह) रुपांत स्पष्ट केले जातात, जे जगभर गेल्या १०० हून अधिक वर्षांपासून अस्तित्वात आहेत आणि आकृतिबंधाची अचूकता खूप भक्कम आहे.

तांत्रिकदृष्ट्या दीर्घकालीन बाजार नेहमीच तरंगांत वळलेले आहेत आणि या सुधारित सिद्धांतावरुन मी असा अंदाज वर्तवला होता की २००३ मध्ये निर्देशांकाचे उद्दिष्ट २०,००० अंशांचे राहील. याच सिद्धांताने माझे भाकित खरे ठरवले जेव्हा २००८ मध्ये मी निर्देशांकाचे उद्दिष्ट ८००० अंशांचे दिले होते. पुन्हा निर्देशांक २००९ मध्ये जेव्हा ८००० अंशांवर होता, तेव्हा मी ४०,००० अंशांचे उद्दिष्ट वर्तवले होते, जे थोडे उशिरा म्हणजे आणखी काही वर्षांनी गाठले गेले. सध्या तरंग सिद्धांत स्पष्टपणे सूचित करीत आहे, की २०२८ मध्ये मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाचे उद्दिष्ट १,५०,००० अंशांचे असेल. हा तरंग सिद्धांत प्रदर्शित झाला आहे.

FIG 1. (Period 2003 – 2008)

FIG 2 (Period 2009 – 2019)

FIG 3 (Period 2003 till date – Start of the next 1st wave)

तेजीच्या लाटेची सुरवात

आकडेवारी स्पष्टपणे दाखवते, की आपण सध्या प्रमुख तेजीच्या नुकत्याच सुरू झालेल्या पहिल्या लाटेत आहोत. पूर्वीच्या तेजीच्या लाटांत अनुभवल्याप्रमाणे ‘करेक्शन्स’ येत राहतील आणि या ‘करेक्शन्स’ तुमच्या दीर्घकालीन पोर्टफोलिओत खरेदीची भर पडण्यासाठी संधी ठरतील.

आता तुम्हाला या मोठ्या लाटेचा आर्थिक फायदा साधायचा असेल तर कोणते घटक तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत?

 • जसे गेल्या खेपेस २००३ ते २००८ या तेजीवाल्या काळात आपण ‘करेक्शन्स’ बघितल्या, तशाच त्या आपल्याला यापुढेही नियमितपणे बघायला मिळतील. अशा ‘करेक्शन्स’मध्ये खरेदी करायला लागेल.

 • वर्ष १९९०-९२, १९९९-२०००, २००३-२००८ आणि सध्याची तेजी याची रचना वेगवेगळी आहे. सोप्या शब्दांत याआधीच्या तेजींमध्ये जे शेअर आणि क्षेत्रे निर्देशांकात होती, ती पुढील तेजीत तशीच राहणार नाहीत. याचा थेट अर्थ म्हणजे जुन्या युगातील शेअर व क्षेत्रांची जागा नव्या युगातील शेअर व क्षेत्रे घेतील आणि तेजीची लाट सुरूच राहील. कामगिरी न करणाऱ्या शेअरची निर्देशांकातून हकालपट्टी होईल आणि जे कामगिरी करुन दाखवतील, त्यांचा निर्देशांकात समावेश होईल. शेअरची हे घुसळण आधीही झाली होती आणि यापुढेही सुरू राहील.

 • यातून स्पष्टपणे सूचित होते, की गुंतवणूकदारांनी त्यांच्या शेअरवर नजर ठेवावी, कारण निर्देशांक वधारला तरी त्याचा अर्थ असा नसतो, की सगळेच शेअर चांगली कामगिरी बजावतील. अशा वेळी निराशाजनक कामगिरी करणारे शेअर संग्रहातून काढून टाकावेत व त्या जागी नव्या युगातील शेअर व क्षेत्रे समाविष्ट करावीत.

 • वर्ष २०२८ ते २०३० चा दृष्टीकोन ठेऊन निर्देशांकात ‘करेक्शन्स’ येतील, त्यावेळी खरेदी करायला हवी. या घुसळणीचा अर्थ योग्य शेअर आणि योग्य क्षेत्रांचा संग्रहात समावेश करणे.

 • सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी ‘राइट मनी मॅनेजमेंट’ व ‘रिस्क मॅनेजमेंट टेक्निक’ या तंत्रांची माहिती करुन घ्यायला हवी. या तंत्रांनी नेहमीच गुंतवणूकदारांचे भांडवल वाचवले आहे.

 • ऑगस्ट २०२१ पर्यंतच्या एनएसई अर्थवर्ष २२ माहितीसाठा सूत्रानुसार असे दिसून आले आहे, की वैयक्तिक गुंतवणूकदारांचे एकूण व्यवहार उलाढालीतील शेअरचे प्रमाण २०१६ मध्ये ३३ टक्के होते, तेच २०२१ मध्ये क्रमाक्रमाने वाढून ४५ टक्क्यांवर गेले आहे. हे प्रथमच बाजारात प्रवेश करणारे गुंतवणूकदार स्वस्त, कमी मूल्याचे शेअर खरेदी करीत असून, त्यावर त्यांना अनेकपटींनी परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र वास्तव हेच आहे, की स्वस्त शेअर अधिकच स्वस्त होत जातात आणि असे गुंतवणूकदार वाईट गुंतवणुकीत स्वतःला अडकवून घेतात.

 • गुंतवणूकदार योग्य ती माहिती घेतल्याखेरीज इंट्रा डे ट्रेडिंगकडे वळत असल्याचे आढळून आले आहे. त्याचा तीव्र दुष्परिणाम या व्यक्तींच्या वित्तीय आरोग्यावर झाला आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. सेबी नोंदणी क्रमांक - आयएनएच००००००९५८)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top