गॅस : एलपीजी की पीएनजी? | LPG and PNG Gas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LPG and PNG Gas}

एलपीजीचा सिलिंडर घरात आल्यानं लोकांचं जीवन खूपच सुकर झालं, मात्र त्यात वाहतूक आणि सुरक्षेचा धोका खूपच मोठा आहे. सिलिंडररुपी जिवंत बॉम्बच आपण आपल्या घरात ठेवत असतो. त्या तुलनेत एमएनजीएलचा पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) अधिक सुरक्षित, सहज उपलब्ध आणि स्वस्तही आहे. हा गॅस वापरल्यास तुम्ही देशाची साधनसंपत्ती वाया जाण्यापासून वाचवता आणि एकप्रकारे देशाच्या प्रगतीस हातभारच लावता....कसे ते वाच...

गॅस : एलपीजी की पीएनजी?

भारतामध्ये(India) एलपीजी गॅस(LPG Gas) सिलिंडर पोचण्यास ८०चे दशक उजाडले होते. अर्थात, हे कनेक्शन मोठ्या मिंनतवाऱ्या केल्यानंतर आणि तेही काही महानगरांमध्येच मिळत असत. त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं, रेशन कार्ड (Ration Card) आणि रहिवासाचे इतर दाखले देणं आदी सोपस्कर पूर्ण केल्यानंतर काही महिन्यांनी तुमच्या हातात एक रेग्युलेटर ठेवला जाई. तो मिळाल्यानंतर पुन्हा काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पहिला सिलिंडर(Cylinder) तुमच्या दारात पोचवला जाई. पुढचा सिलिंडर घेण्यासाठी थेट दुकानात जाऊन नंबर लावणं, तुमच्या नंबरची तारीख मिळाल्यानंतर थेट दुकानात जाऊन, रांगेत उभं राहून तो सिलिंडर मिळवणं आणि कधी दुचाकीला बांधून अत्यंत धोकादायक पद्धतीनं घरी घेऊन जाणं किंवा खिशाला चाट मारत रिक्षात टाकून घेऊन जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. होम डिलिव्हरी (Home Delivery) हा प्रकार नियमित सुरू होण्यासाठी २००० साल उजाडावं लागलं होतं. या सिलिंडरची नाटकंही खूप असतात. तो नोंदवल्यानंतर नक्की कधी व कोणत्या वेळी तुमच्या घरात येईल हे सांगण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळं सिलिंडर आल्यावर तुमच्या घरात कोणीच नसल्यास तो पुन्हा जात असे. पुन्हा नाव नोंदणीची प्रक्रिया आणि वाट पाहणंही आलंच.

सिलिंडर घरी येताय असं समजल्यावर (सिलिंडरीची नोंदणी खूप आधीच करून ठेवल्यानं) आधाचा उरलेला गॅस काहीतरी करून पटकन संपवून टाकण्यासाठी घरच्या गृहिणीला पॅनिक बटन दाबून काम सुरू करावं लागे. दाणे भाजून घे, रवा किंवा तांदूळ भाजून घे असे प्रकार करीत शक्य तेवढा गॅस संपवणं आणि घरी आलेल्या कंपनीच्या माणसाला तो गॅस सोपवणं ही कसरत महाभयंकर असे. सिलिंडरवाला गॅस घरी देऊन गेल्यानंतर त्याचं सील तोडणं आणि रेग्युलेटर कोणताही धोका न होऊ देता बसवणं हे पुढचं दिव्य. सिलिंडर घरात आल्यानंतर तो बसवण्यासाठी तरुण व्यक्ती घरात नसल्यास वृद्धांची त्यांची वाट पाहणं किंवा शेजाऱ्या-पाजाऱ्याकडं विनवणी करण्याशिवाय पर्याय राहायचा नाही.

हेही वाचा: खवय्यांनो! चला खाऊ या! खान्देशी मांडे, भरीत-पुर....बरचं काही!

खरी गंमत यायची ती दिवाळीच्या काळात. दिवाळीचा महिना सुरू होतात गॅसचा तुटवडा असल्याच्या बातम्या सुरू व्हायच्या आणि गृहिणींच्या काळजाचा ठोका चुकायचा. ऐन फरळाचे पदार्थ करायला घेताच सिलिंडर जाणार नाही ना, या काळजीनं तिचा जीव कासावीस व्हायचा. वेळ बरोबर साधली जायची आणि फराळाचे पदार्थ सुरू होताच सिलिंडर मान टाकायचा. आता घरच्या पुरुषाला वेगवेगळे जुगाड करून, कधी मित्राला, नातेवाइकांना पटवून तर कधी गॅस कंपनीची मनधरणी करीत एखादा सिलिंडर पैदा करावाच लागायचा. अन्यथा, सर्व दिवाळसणाचं दिवाळं निघण्याची भीती असायची!


या सर्व संसारिक अडचणीच्या जोडीला सिलिंडरची सुरक्षा हा आणखी एक कळीचा मुद्दा ठरायचा. एका वेळी दोन सिलिंडर मिळायला लागल्यावर ही समस्या आणखीनच गंभीर बनली. एक सिलिंडर गॅसच्या शेगडी खाली आणि दुसरा माळ्यावर असा प्रत्येक घरातील शिकस्ता. हा सिलिंडर मुलांच्या खेळण्यांपासून, आग किंवा शॉर्ट सर्किटपासून दूर ठेवण्याचं टेन्शन प्रत्येकच घरात दिसायचं. सिलिंडरमध्ये सुमारे २ लिटर द्रवरूप इंधनावर दाब देऊन १४.२ किलो गॅस बनवला जातो. मोठ्या दाबाखाली ठेवल्यानं सिलिंडरला आगीचा धोका निर्माण झाल्यास मोठ्या स्फोटाची भीती कायमच असते. गॅसच्या स्फोटामुळं घरदारासह जीव गमावलेली अनेक उदाहरणं तुम्हाला देशभरात सापडतील. (अर्थात, रॉकेलच्या स्टोव्हला लागलेल्या आगीत महिलेचा पदर पेटल्यानं मृत्यू या बातम्यांपेक्षा सिलिंडर स्फोटाच्या बातम्या कमीच दिसतील. याचं कारण काय हे सुज्ञांस सांगणे न लगे!)

हेही वाचा: गृहकर्ज फेडावे, की गुंतवणूक करावी?

गॅस एमएनजीएलचा..


तर हे सर्व सिलिंडर आख्यान सांगण्याचं कारण सध्या मुंबई-पुण्यासह अनेक शहरांत सुरू असलेली महानगर गॅस लिमिटेडची (एमएनजीएल) पाइप्ड नॅचरल गॅस ही सुविधा. अनेकांना एमएनजीएलचा हा गॅस म्हणजे नक्की काय प्रकरण आहे, हेच लक्षात येत नाही. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणं एलपीजी हा द्रवरूप इंधनावर दाब टाकून तयार केलेला गॅस असतो. मात्र, पीएनजी हा एमएनजीएलचा गॅसबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेली एक आठवण सांगितल्यास तो नक्की कोणता गॅस आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आपण बॉम्बे हायमध्ये कायम पेटत असलेला गॅस आपल्या लहानपणापासूनच पाहतो, हाच तो गॅस आहे. केवळ पाइपलाइन न टाकल्याने गेली ६० वर्षे तो गॅस तसाच जळत होता. बॉम्बे हायमधील तेलांच्या विहिरींमधील बायप्रॉडक्ट म्हणजे हा गॅस. एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गॅस देशाच्या १२५ कोटी जनतेला पुढील ९०० वर्षं पुरेल एवढा आहे. अर्थात, हा आकडा एकाच विहिरीचा असून, बॉम्बे हायमध्ये अशा चार विहिरी आहेत. थोडक्यात, ही देशाची साधनसंपत्ती आहे आणि आपण ती वाया घालवत होतो, तेही केवळ गॅस बाहेर वाहून आणण्यासाठीची पाइपलाइन न टाकल्यानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हा गॅस समुद्रात पाइपलाइन टाकून गुजरातमध्ये नेला व वाया जाणाऱ्या गॅसचा सदुपयोग काही प्रमाणात सुरू झाला. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी हा गॅस संपूर्ण देशभरात पोचवण्याची योजना आखली आणि त्यासाठी प्रथम महाराष्ट्रात काम सुरू झाले. मुंबईमध्ये काही प्रमाणात पोचलेला हा गॅस चाकणमध्ये मोठे सेंटर उभे करून तेथे आणला गेला व हा गॅस आता पुण्यात पोचला असून, नाशिक, औरंगाबादसारख्या शहरांत तो पोचत आहे. तुम्ही सिलिंडरऐवजी एमएनजीएलचा गॅस घेतल्यास तुमचा सिलिंडर फ्री होईल व तो राज्यासह देशातील दुर्गम भागातील नागरिकांना उज्ज्वला या सरकारच्या योजनेंतर्गत पुरवला जाईल. त्यामुळं दुर्गम भागातील लोकांना इंधनासाठी सरपणावर अवलंबून राहावे लागणार नाही, जंगलतोड वाचेल व गृहिणींचा धुरापासून होणाऱ्या आजारांपासून बचाव होईल.

हेही वाचा: कुस्तीला घरघर!

सहज आणि सुरक्षित


पीएनजी हा गॅस कोणत्याही द्रवरूप इंधनावर दाब देऊन बनवलेला गॅस नाही. तो हवेपेक्षा हलका आहे आणि त्यामुळे त्याची गळती झाल्यास तो हवेत उडून जातो व स्फोटाची शक्यता खूपच कमी असते. हा गॅस स्वतंत्र पाइपलाइनद्वारे शहरातून फिरवला जातो. तुमच्या सोसायटीमध्ये एका डक्टमध्ये आणून प्रत्येक स्वयंपाकघरात फिरवला जातो. एमएनजीएच्या तुमच्या सोसायटीमधील डक्टमध्ये एक सुरक्षा प्रणाली असते. त्याच्या जोडीला तुमच्या स्वयंपाकघराच्या बाहेर एका कॉकच्या मदतीने घरात येणारा गॅस बंद करता येतो व तसेच तुमच्या गॅस शेगडीच्या बाजूलाच असलेल्या कॉकच्या मदतीने तुम्ही काम झाल्यावर लगेचच गॅस बंद करू शकता. त्यासाठी सिलिंडरच्या रेग्युलेटरपर्यंत जाऊन कॉक बंद करण्याचे द्रविडी प्राणायाम करावे लागत नाही. अनेकांना गॅसच्या पाइपलाइनमुळे घराच्या सौंदर्यात बाधा येईल, अशी भीती वाटते, मात्र, घरामध्ये एक मीटर व त्यातून कॉपरची एक नळी टाकली जाते, जी तुमच्या गॅस शेगडीला जोडली जाते. त्यामुळे घराच्या सौंदर्यात कोणतीही बाधा येत नाही. किचन ओट्याखाली सिलिंडर ठेवण्यासाठी वेगळी जागा, त्या जागेची स्वच्छता या गोष्टींपासून मुक्तता होतो, हा अधिक फायदा.

हेही वाचा: सरस्वतीच्या दारी अखेर "लक्ष्मी दर्शन"!

आर्थिक बचत


एमएनजीएलचा गॅस घेण्यासाठी सुरवातीला ६५०० रुपये खर्च येत असला तरी त्यातील ५५०० रुपये डिपॉझिट आहे, ते तुम्हाला परत मिळणार आहे. ( तुम्ही एलपीजीचे कनेक्शन सरेंडर करून ते पैसे इकडे वापरू शकता,) दुसरीकडे, पीएनजीचा खर्च एलपीजीच्या तुलनेत जवळपास ३० टक्के कमी आहे. हा अनुभव गेली काही वर्षं पीएनजीचा गॅस वापरणारे ग्राहक तुम्हाला नक्कीच सांगतील. पुन्हा गॅस गेल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीपासून, सिलिंडरवाला नक्की कधी घरी येणार याची काळजी, तो घरात आल्यानंतर पैसे व त्याला बक्षिसी देणे यांपासून मुक्तता होते. दर दोन महिन्यांनी गॅसचे पैसे एमएनजीएलच्या साइटवर जाऊन भरण्याची सोय असते. त्यासाठीचे रीडिंग कंपनीचा माणूस घरात येऊन घेऊन जातो किंवा कोरोनासारखा काळ असताना तुम्हाला मीटरचा फोटो काढून तो एमएनजीएलच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर शेअर करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तुमच्या शहरापर्यंत, तुमच्या परिसरात आणि सोसायटीच्या दारात एमएनजीएलचा गॅस पोचल्यास तो नक्की घ्या, एवढेच सांगणे...

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top