
योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेपर्यंतच करा इच्छापत्र
गौरी रास्ते
इच्छापत्र बनविताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र! हे वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय इच्छापत्र दस्ताला पूर्णत्व येत नाही. विल करणारी व्यक्ती विलचा दस्त करण्यास सक्षम आहे, असे डॉक्टरने प्रमाणित करणे फारच गरजेचे आहे...
इच्छापत्र करणे म्हणजे आपली स्वकष्टार्जित आणि वाटणीस आलेली वडिलोपार्जित स्थावर व जंगम संपत्ती आपल्या वारसांना, आपल्या इच्छेप्रमाणे सुपूर्द करणे. वरिष्ठांच्या मनात एक भीती असते, की आपण आताच इच्छापत्र केले, तर आपल्याला आपली संपत्ती मनाप्रमाणे खर्च करता येईल ना? मृत्युपत्रात लिहिलेल्या रकमेत बदल अथवा घट झाली तर मुलांना काय वाटेल? ही भीती अगदी अनाठायी आहे. आपण इच्छापत्र आपल्या उर्वरित (आपण खर्च करून उरलेल्या) मालमत्तेसाठी करीत असतो, हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा. विल करताना आपले मन कार्यक्षम असेल, तर योग्य वारसाला योग्य हिस्सा देऊन आपण न्याय करू शकतो. विवेकबुद्धी, म्हणजेच योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे, तोपर्यंत हे महत्त्वाचे दस्त बनविले पाहिजेत. (Medical Certificate necessary for Legal will)
इच्छापत्र बनविताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र! हे वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय इच्छापत्र दस्ताला पूर्णत्व येत नाही. विल करणारी व्यक्ती विलचा दस्त करण्यास सक्षम आहे, असे डॉक्टरने प्रमाणित करणे फारच गरजेचे आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्याशिवाय रजिस्ट्रेशन कार्यालयात विल नोंदणीकृत होत नाही. डॉक्टरांनी दिलेले प्रमाणपत्र असे प्रमाणित करते, की विल करणाऱ्या व्यक्तीला मी आज रोजी इतक्या वाजता तपासले असून, विल करणारी व्यक्ती विल करण्यासाठी सक्षम आहे.
अर्थात हे प्रमाणपत्र देताना डॉक्टर, त्या व्यक्तीचे वय, त्या त्या वयात असणारे आजार, वयपरत्वे असणारी शारीरिक स्थिती लक्षात घेतात. उतरत्या वयात असणारी मनाची असणारी स्थिती, विस्मरणाचे असलेले प्रमाण या साऱ्यांचा विचार करून प्रमाणपत्र देतात. विल करण्यासाठी ही व्यक्ती पुरेशी सक्षम आहे, असे प्रमाणपत्र डॉक्टर देतात. दस्ताचा एक प्रमुख भाग म्हणून वैद्यकीय प्रमाणपत्रास महत्त्व आहे. तसेच पुढे वादविवाद, कोर्ट-कचेरी झाल्यास डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची असते.
सक्षमतेचे प्रमाणपत्र देताना डॉक्टरांनासुद्धा नीट तपासणी करावी लागते. विल करणाऱ्या व्यक्तीची, इच्छापत्रामध्ये लिहिलेला मजकूर समजण्यासाठी सक्षम मानसिक स्थिती गरजेची असते. प्रमाणपत्र देण्याच्या आधी डॉक्टर एक छोटी मुलाखत घेतात; काही प्रश्न विचारतात, तपासण्या सुद्धा करतात. विल करणाऱ्या व्यक्ती विलचा दस्त समजून-उमजून, चांगल्या मानसिक स्थितीत करते आहे, हे डॉक्टरांच्या लक्षात आल्यावरच डॉक्टर प्रमाणपत्र देतात.
अर्थात विलमध्ये काय मजकूर लिहिला आहे, हे सारे तपशील डॉक्टरांना सांगण्याची अजिबात गरज नाही, नव्हे, तो तपशील फक्त विल करणाऱ्या व्यक्ती आणि सल्लागार वकील यांनाच माहित असतो. डॉक्टरांचे प्रमाणपत्र हा इच्छ्पत्राच्या दस्तऐवजाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणीकृत केलेल्या दस्तेवाजाद्वारे, वारसांना आपल्या आई-वडिलांच्या निधनानंतर, त्यांच्या पश्चात इच्छापत्रात लिहिल्याप्रमाणे मालकीहक्क हस्तांतरित करून घेताना पुढील योजना करण्यासाठी सुलभ होते. योग्य वयात, योग्य वेळी, विल नोंदविणे किती गरजेचे आहे, ते पुढील उदाहरणे वाचून नक्की पटेल.
१) मोहिनीताईंना संधीवाताचा त्रास होता. काही शेतजमीन, एक मोठा बंगला त्यांच्या मालकीचा होता. इच्छापत्र करणे, ते दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करणे अनिवार्य होते. त्यांचा संधिवात इतका बळावला होता, की दस्तावर सही करणे अशक्य होते. त्या बोलू शकत होत्या, सर्व गोष्टी नीट समजत होत्या; पण त्यांच्या आजारामुळे त्यांना फक्त चाकाच्या खुर्चीत बसून हालचाली करणे प्राप्त होते. सही करणे शक्य नसल्यामुळे इच्छापत्र दस्तावर त्यांचा डाव्या हाताचा अंगठा घ्यावा लागला. अंगठ्याचा ठसा दोन साक्षीदारांच्या सह्या घेऊन प्रमाणित करणे गरजेचे होते. कार्यालयात जाणे, तिकडे प्रत्यक्ष जाऊन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणे त्यांच्यासाठी वेदनादायी होते. पण ते अत्यंत महत्त्वाचे होते. विल करणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर स्थावर संपत्ती वारसांच्या नावे होण्यासाठी/मालकी हक्क विलद्वारे हस्तांतरित होण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे जरुरीचे असते. मोहिनीताई विल करण्यासाठी मानसिकदृष्टीने सक्षम आहेत, असे प्रमाणपत्र विलच्या दस्तास जोडले, दोन साक्षीदार, स्वतः मोहिनीताई रजिस्टर कार्यालयात हजर राहिल्या व इच्छापत्र रीतसर नोंदणीकृत झाले.
२) सुरेशकाका ऐंशी वर्षांचे होते. वयोमानानुसार त्यांना ऐकू येत नव्हते. परंतु ऐकण्यासाठी असलेले यंत्र लावले, की ते व्यवस्थित ऐकू शकत होते. त्यांची पत्नी मालतीताई, त्यांचे डोळे अधू होते. परंतु चष्मा लावून, त्या वाचू शकत असत. इच्छापत्र दस्त त्या दोघांनी वाचला होता, नीट समजून-उमजून घेतला. प्रमाणपत्र देताना डॉक्टरांनी दोघांना तपासले, काही प्रश्न विचारले व नंतरच, दोघेही इच्छापत्र दस्त करण्यास सक्षम आहेत, असे प्रमाणपत्र दिले. विल नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन कार्यालयामध्ये जाताना सुरेशकाकांनी ऐकण्याचे यंत्र लावून जाण्यास विसरू नये, तसेच मालतीताईनी त्यांचा चष्मा, भिंग आदी बरोबर न्यावे, असे आवर्जून सांगितले. एवढी काळजी घेतल्यानंतर त्या दोघांचे इच्छापत्र कार्यालयामध्ये नोंदणीकृत झाले.
३) नव्वद वर्षांचे रघुनाथकाका पायरीवरून पडले आणि त्यांचे खुब्याचे हाड मोडले. ऑपेरेशन करावे लागले आणि किमान सहा महिने चलता येणे शक्य नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. काकांचे गावातील मोठे घर, गावाकडे शेती आणि घर अशी मोठी स्थावर संपत्ती काकांच्या मालकीची होती. रजिस्ट्रेशन कचेरीमध्ये जाऊन विल नोंदणीकृत करणे महत्त्वाचे होते. जरी शारीरिकदृष्ट्या काका परस्वाधीन झाले होते, तरी त्यांचे मन आणि बुद्धी कार्यक्षम होती. त्यामुळे डॉक्टरांनी रघुनाथकाका इच्छापत्र करण्यासाठी सक्षम आहेत, असे प्रमाणपत्र दिले. रुग्णवाहिकेमधून निबंधक कार्यालयात जाऊन, इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून, काकांना इच्छापत्र-दस्त पूर्ण करावा लागला. खूपच मानसिक-शारीरिक त्रास झाला. एवढी वर्षे आपण विल का केले नाही, याचा पश्चाताप सुद्धा झाला.
हे देखिल वाचा-
आपण नुकतेच एका महासाथीचे संकट अनुभवले आहे. डॉक्टरांनी प्रमाणपत्र देण्यासाठी घरी येणे अवघड गोष्ट झाली आहे. शरीर गलितगात्र झाल्यावर, विविध आजारांनी मन कमकुवत झाल्यावर, स्मृती क्षीण झाल्यावर इच्छापत्र दस्त करणे किती कठीण होते, याचा विचार ज्येष्ठ नागरिकांनी केलाच पाहिजे. स्थावर संपत्ती वारसांना मृत्युपत्राद्वारे मिळण्यासाठी विल बनविणे, ते विल नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत करणे, कार्यालयात स्वतः उपस्थित राहणे, या सर्व पूर्तता करण्यासाठी शरीर मन आणि बुद्धी सक्षम हवी. वाढत्या वयात आजार बळावतात. स्मरण-विस्मरण या उंबरठ्यावर उभे असताना इतक्या महत्त्वाचे दस्तऐवज करणे दुरापास्त होते.
इच्छापत्र करणे म्हणजे आपली स्वकष्टार्जित आणि वाटणीस आलेली वडिलोपार्जित स्थावर व जंगम संपत्ती आपल्या वारसांना, आपल्या इच्छेप्रमाणे सुपूर्द करणे. वरिष्ठांच्या मनात एक भीती असते, की आपण आताच इच्छापत्र केले, तर आपल्याला आपली संपत्ती मनाप्रमाणे खर्च करता येईल ना? मृत्युपत्रात लिहिलेल्या रकमेत बदल अथवा घट झाली तर मुलांना काय वाटेल? ही भीती अगदी अनाठायी आहे. आपण इच्छापत्र आपल्या उर्वरित (आपण खर्च करून उरलेल्या) मालमत्तेसाठी करीत असतो, हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा.
विल करताना आपले मन कार्यक्षम असेल, तर योग्य वारसाला योग्य हिस्सा देऊन आपण न्याय करू शकतो. एकदा शरीर थकले, की मन आणि बुद्धी सुद्धा क्षीण होतात. अशा अवस्थेत योग्य निर्णय कसे घेणार? अशा अवस्थेत कोणाच्याही दबावाखाली मन आणि बुद्धी चुकीचे निर्णय घेऊ शकते. विस्मृतीचा आजार, मेंदूला कमी-जास्त रक्तपुरवठा झाल्यामुळे होणारे आजार, रक्तदाब कमी-जास्त असताना होणारी मनाची घालमेल...अशा अवस्थेत डॉक्टरांचे प्रमाणपत्र मिळणे किती अवघड बाब आहे! विवेकबुद्धी, म्हणजेच योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे, तोपर्यंत हे महत्त्वाचे दस्त बनविले पाहिजेत.
सुखाचा श्वास घ्यायचा असेल तर...
स्वतः सुखाचा श्वास घ्यायचा असेल आणि वारसांच्या हाती आपली कष्टाची संपत्ती सुपूर्द करायची असेल, तर सुजाण ज्येष्ठ नागरिक आता नक्कीच निर्णय घेतील आणि आपल्या विवेकबुद्धीने दिलेला सल्ला ऐकून वेळीच इच्छापत्र दस्त करतील. विलमध्ये कोणता मजकूर लिहायचा आहे?, कोणत्या वारसाला किती हिस्सा द्यायचा आहे, तो मजकूर समजून-उमजून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दस्त बनवतील. डॉक्टर प्रमाणपत्र त्या दस्तऐवजाला जोडतील. दोन साक्षीदार आणि स्वतः विल करणाऱ्या व्यक्ती रजिस्ट्रार कचेरीत उपस्थित राहून नोंदणी कार्यालयात दस्तनोंदणी करतील. असे नोंदणीकृत केलेले इच्छापत्र वारसांना आणि स्वतः विल करणाऱ्या व्यक्तीना नक्कीच चिंतामुक्त करेल!
(लेखिका निवृत्त बँक कर्मचारी असून, गेली अनेक वर्षे इच्छापत्र या विषयावर जनजागृतीसाठी कार्यरत आहेत.)