‘पीपीएफ - करबचतीबरोबरच करमुक्त उत्पन्नाची जननी | PPF Tax Benefits & Features | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PPF is Simple Way of tax-free income along with tax savings snk94}
‘पीपीएफ - करबचतीबरोबरच करमुक्त उत्पन्नाची जननी

‘पीपीएफ - करबचतीबरोबरच करमुक्त उत्पन्नाची जननी

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत वेध लागतात ते प्राप्तिकर अर्थात इन्कम टॅक्स वाचवण्याचे! सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) ही योजना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘पीपीएफ’मधील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम ८० सी अंतर्गत वजावटही मिळते; तसंच यातील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज (सध्या ७.१ टक्के) अजून तरी करमुक्त आहे. या गोष्टींमुळे या योजनेची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. या योजनेबाबत जाणून घेऊया.

गुंतवणुकीचे कितीही नवनवीन पर्याय आले तरीही जुने विश्‍वासार्ह पर्याय गुंतवणूकदारांना कायमच जवळचे वाटतात. दीर्घकालीन गुंतवणूक, करमुक्त परतावा, सर्वोच्च सुरक्षितता, कर्जाची सोय, प्राप्तिकरातून सवलत हे सर्व फायदे असलेला सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी अर्थात ‘पीपीएफ’ हा असाच एक भरवशाचा गुंतवणूक पर्याय आहे. सुरक्षिततेच्या भक्कम कवचामुळे लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर बाजारातील व्याजदरांशी सुसंगत ठेवण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे दर तीन महिन्यांनी त्यांचा आढावा घेतला जातो. चालू आर्थिक वर्षात सरकारने या व्याजदरात बदल केलेले नाहीत. बॅंकांतील ठेवींचे व्याजदरही कमीच झालेले आहेत. त्यातुलनेत विचार करता, अल्पबचत योजनांचे व्याजदर थोडे बरे आहेत, असे म्हणायला हरकत नाही. (PPF Tax Benefits & Features)

हेही वाचा: मराठमोळी साधीसुदी काकी!

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मासिक प्राप्ती योजना (एमआयएस), मुदत ठेवी (टीडी) आदी योजनांच्या तुलनेत सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) ही योजना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणूनच तिची दखल स्वतंत्रपणे घेतली पाहिजे. ‘पीपीएफ’मधील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम ८० सी अंतर्गत वजावटही मिळते; तसेच यातील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज (सध्या ७.१ टक्के) अजून तरी करमुक्त आहे. या गोष्टींमुळे या योजनेची लोकप्रियता (व्याजदर कमी होऊनही) अजूनही टिकून आहे.
करमुक्त उत्पन्नाची जननी समजल्या जाणाऱ्या अशा या योजनेकडे आजच लक्ष का दिले पाहिजे, ते आपण पाहूया. निश्‍चित उत्पन्नाच्या योजनांच्या गटात, आज करमुक्त उत्पन्न आणि प्राप्तिकरबचत असा दुहेरी फायदा करून देणाऱ्या योजना क्वचितच आढळतात. त्याचमुळे चाणाक्ष गुंतवणूकदार याचा पुरेपूर फायदा करून घेतात, तर ज्यांना या योजनेचे महत्त्व पुरेसे समजलेले नाही, ते अशा लाभापासून वंचित राहतात. याच वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून आज आर्थिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात या विषयाची निवड केली आहे.

नोकरदारवर्गाला पगारातून कपात होणाऱ्या ‘पीएफ’च्या रूपाने वेगळा निधी निवृत्तीच्या वेळी मिळतो. मात्र, व्यावसायिकांसाठी अशी योजना नसते. त्यांच्यासाठी तर ‘पीपीएफ’ हा सर्वांत उत्तम मार्ग म्हणावा लागेल. त्यामुळे या मंडळींसाठी पीपीएफ म्हणजे ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ न म्हणता ‘पॅरलल प्रॉव्हिडंट फंड’ म्हणता येईल. पगारदारांनीही स्वेच्छेने सुरू केलेला ‘अतिरिक्त पीएफ’ म्हणूनच त्याकडे पाहायला हवे. ‘पीपीएफ’चा व्याजदर चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठीसुद्धा ७.१ टक्के असून, या खात्यात एका आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिल ते ३१ मार्च या काळात कमीत कमी ५०० रुपये व जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरता येतात. दर वर्षी विशिष्ट रक्कम (हप्त्यासारखे) भरण्याचे बंधन नसल्याने खातेदार आपल्या कुवतीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे वरील मर्यादेत कितीही रक्कम वर्षभरात कधीही भरू शकतो. ही रक्कम वर्षभरात कधीही भरता येते.

हेही वाचा: पालकांनो, मुले आळशी एकलकोंडी बनलीत, काय करावे?

पैसे नेमके कधी भरावेत?

बरेच जण उत्साहाने ‘पीपीएफ’चे खाते उघडतात; पण त्यात दर वर्षी पैसे भरण्यात सातत्य ठेवत नाहीत. त्यामुळे या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ त्यांना मिळत नाही. एका आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिल ते ३१ मार्च या काळात कधीही पैसे भरलेले चालतात, अशी मुभा असल्याने या खात्यात थेट मार्चमध्येच पैसे भरण्याकडे काहींचा कल असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात असे करणे शहाणपणाचे ठरत नाही. ‘पीपीएफ’च्या खात्यात आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे एप्रिलच्या सुरवातीलाच शक्‍य तेवढे (कमाल मर्यादेत) पैसे भरल्यास संपूर्ण वर्षाचे करमुक्त व्याज मिळवता येऊ शकते. शिवाय मार्च महिन्यात बॅंकांमध्ये होणाऱ्या गर्दीच्या त्रासापासून आपली सुटका होऊ शकते आणि दंडाची टांगती तलवारही राहात नाही. त्यामुळे ‘पीपीएफ’च्या खात्यात एप्रिलमध्ये शक्‍य तेवढी जास्तीत जास्त रक्कम भरायला हवी. नंतर कमाल मर्यादेपर्यंतची रक्कम गरजेनुसार वर्षभरात पुन्हा भरण्याचा पर्याय उपलब्ध असतोच. जी मंडळी आतापर्यंत असे करत नव्हती, त्यांनी नव्या आर्थिक वर्षापासून याची काळजी घेतली तरी त्यांना त्याचा अधिक लाभ मिळू शकेल.

पंधरा वर्षे कालावधी असलेल्या या खात्यात दरवर्षी कमीतकमी रु. ५०० आणि जास्तीतजास्त दीड लाख रुपये भरता येतात, हे आधी सांगितले आहेच. दरवर्षी दीड लाख रुपये याप्रमाणे रक्कम जमा केल्यास (सध्याच्या व्याजदरानुसार) मुदतीच्या शेवटी साधारणतः अंदाजे ४४ लाख रुपये मिळू शकतात. याशिवाय दरवर्षी प्राप्तिकरात होणारी बचत वेगळीच! अर्थात दरवर्षी एकरकमी दीड लाख रुपये या खात्यात जमा करणे अनेकांना अवघड जाते. अशावेळी बॅंकेतील रिकरिंग डिपॉझिटच्या (आरडी) मदतीने या अडचणीवर मात करता येऊ शकते. मार्चअखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या पाच तारखेच्या आत एक वर्ष मुदतीचे रिकरिंग डिपॉझिट सुरू करून दरमहा बारा हजार रुपये जमा केल्यास पुढील वर्षाच्या मार्चअखेरीस या खात्यावरील मुद्दल आणि व्याज धरून दीड लाख रुपये जमा होतील, जे एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच पीपीएफ खात्यात जमा करता येऊ शकतात. तसे केल्यास खात्यातील आधीच्या शिलकी रकमेबरोबरच या नव्या रकमेवरही पूर्ण आर्थिक वर्षाचे करमुक्त व्याज मिळू शकेल. दुसऱ्या बाजूला मुदत संपलेले रिकरिंग खाते एक वर्षासाठी पुन्हा नव्याने सुरू करावे. असे दरवर्षी केल्यास आपल्या पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीला शिस्त लागू शकते. आपल्याला पीपीएफ खात्यात पुढील वर्षी किती रक्कम भरायची आहे, याचा अंदाज आधीपासूनच घ्यावा आणि त्याप्रमाणे बॅंकेत एक वर्षाचे रिकरिंग खाते सुरू करावे. उदाहरणार्थ, पुढील वर्षी ‘पीपीएफ’मध्ये जर २५ हजार रुपयेच भरायचे असतील, तर दरमहा दोन हजार रुपयांचे रिकरिंग डिपॉझिट पुरेसे होईल. थोडक्‍यात, जेवढी रक्कम भरण्याची इच्छा असेल, त्याला १२ ने भागून तेवढ्या रकमेचे रिकरिंग खाते उघडल्यास पीपीएफ खात्यात मोठी रक्कम भरण्याची सोय आपोआप होऊ शकते.

हेही वाचा: चला, आंबोलीची करूया सफर!

करबचतीबरोबरच करमुक्त उत्पन्न देणारी ‘पीपीएफ’ योजना एक प्रकारे कामधेनूच म्हणावी लागेल. अशाच प्रकारे करबचत आणि करमुक्त परतावा देणाऱ्या शेअर बाजाराशी निगडित (इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग्ज स्कीम) असलेल्या योजनांमधील जोखीम ज्यांना अजिबात स्वीकारायची नसेल, त्यांना ‘पीपीएफ’चा पर्याय निश्‍चितच दिलासा आणि आधार देणारा आहे. जितक्‍या कमी वयात त्याचे खाते उघडले जाईल, तितका त्याचा फायदा अधिक आहे.

भविष्य निर्वाह निधीचे खाते (पीपीएफ) मुदतीपूर्व बंद करण्यास खातेधारकाला परवानगी मिळणार आहे. तसेच अल्पवयीन खातेधारकाला अल्प बचतीच्या योजनांमध्ये सहभागी करण्यासंबंधी अर्थ खात्याकडून धोरणांमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. बचत पत्रे आणि "पीपीएफ'संबंधीचा कायदा बचत खात्यासंदर्भातील कायद्यात विलीन केला जाणार आहे. त्यामुळे ठेवीदारांसाठी एकच कायदा राहील. नव्या नियमावलीत ठेवीदारांना पाच वर्षे मुदतीपूर्वी पीपीएफ खाते बंद करून पैसे काढून घेण्यासंबंधी शिफारस करण्यात आली आहे. वैद्यकीय खर्च, उच्च शिक्षण आणि इतर गरजांसाठी तातडीचे पैसे हवे असल्यास खातेधारकांना अल्प बचतीच्या योजना मुदतीपूर्वी बंद करून पैसे काढण्यासंबंधी नियमावली तयार केली जाणार आहे.

हेही वाचा: मराठमोळी साधीसुदी काकी!

‘पीपीएफ’कडे आजच लक्ष द्या!

 • सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी (पीपीएफ) ही एक सरकारी योजना आहे.

 • ही १५ वर्षांची दीर्घकालीन योजना आहे. त्याची मुदत पाच-पाच वर्षांसाठी कितीही वेळा वाढविता येते.

 • एका आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० रुपये व जास्तीत जास्त १.५० लाख रुपये भरता येतात.

 • ही रक्कम वर्षभरात किमान एकदा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा भरता येते.

 • ‘पीपीएफ’मध्ये आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पैसे भरल्यास संपूर्ण वर्षाचे व्याज मिळू शकते.

 • महिन्याच्या पाच तारखेपर्यंत भरलेल्या पैशावर त्याच महिन्यापासून व्याज मिळू शकते.

 • जितक्‍या कमी वयात खाते उघडले जाईल, तितका त्याचा फायदा अधिक आहे.

 • स्वतःच्या नावे, तसेच अज्ञान मुला-मुलींच्या नावे ‘पीपीएफ’चे खाते उघडता येते.

 • निवडक बॅंका आणि टपाल कार्यालयांत (पोस्ट) हे खाते उघडता येते.

 • एका व्यक्तीला एकच खाते उघडता येते.

 • हे खाते एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत किंवा पोस्टात ‘ट्रान्स्फर’ करता येऊ शकते

 • ‘पीपीएफ’मधील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम ८० सी अंतर्गत वजावट मिळते.

 • यातील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज (चालू तिमाहीत ७.१ टक्के) अजून तरी करमुक्त आहे.

 • सरकारच्या धोरणानुसार, ‘पीपीएफ’चा व्याजदर दर तिमाहीला बदलता राहू

 • शकतो.‘पीपीएफ’च्या खात्यातून नियमानुसार अंशतः पैसे काढता येतात

 • बचतीबरोबरच उत्पन्न देणारी ही सुरक्षित योजना आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top